उन्हाळ्यात लिंबांचं थंडगार सरबत मरगळलेल्या शरीराला आणि मनाला ताजेपणा देतो. जेवणात साध्या वरण भातासोबत, पोहे उपम्यासोबत लिंबाची फोड रसना तृप्त करते. लिंबू पिळून केलेलं गोड आंबट वरण जेवणात मजा आणतं. पण लिंबाचा उपयोग असा फक्त स्वयंपाकापुरता आणि खाण्या-पिण्यापुरताच नाही. लिंबू घालून केलेले पदार्थ शरीराला ताजेपणा देतात तसाच लिंबाचा उपयोग करुन त्वचा आणि केसांची निगाही राखता येते. लिंबाच्या मदतीनं शरीराची स्वच्छता राखता येते आणि सौंदर्य वृध्दीसही लिंबू मदत करतं.
चेहेऱ्यासाठी लिंबाचा लेप
लिंबातून त्वचेस क जीवनसत्त्व आणि अॅण्टिऑक्सिडण्टस मिळतात. क जीवनसत्त्वं हे त्वचेचं नुकसान होण्यापासून रोखतं आणि अवेळी चेहेऱ्यावर सुरकुत्या पडू देत नाही. लिंबाच्या रसात असलेलं आम्ल हे त्वचेसाठी अॅस्ट्रीजेण्टसचं काम करतं. लिंबाच्या उपयोगानं त्वचेचा पोत सुधारतो तसेच त्वचेवर होणारी अतिरिक्त तेलनिर्मिती रोखतं. उन्हाळ्यात घामामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात. या समस्यांपासून त्वचेचं संरक्षण करण्याचं काम लिंबू करतं. लिंबामधे अॅण्टिसेप्टिक गुणधर्म असल्यानं लिंबाच्या वापरानं चेहेऱ्यावरील मृत त्वचा निघून जाण्यास आणि चेहेरा स्वच्छ होण्यास मदत होते.
लिंबाच्या सहाय्यानं चेहेऱ्यावरचं तेज वाढवता येतं. यासाठी लिंबासोबत नारळाचं पाणी वापरावं. हे मिश्रण चेहेऱ्यास लावावं. १५ मिनिटं ते चेहेऱ्यावर सुकू द्यावं. मग चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. या लेपानं चेहेऱ्यातील रंध्र मोकळी आणि स्वच्छ होतात. त्वचा ओलसर राहाण्यास मदत होते. तेलकट त्वचेसाठी लिंबू आणि नारळ पाण्याचा एकत्रित उपयोग खूप लाभदायक ठरतो. कोरड्या त्वचेसाठी लिंबासोबत नारळाच्या पाण्याऐवजी मधाचा वापर करावा.
केसातील कोंड्यावर गुणकारी
लिंबामधील अॅण्टिसेप्टिक आणि दाहविरोधी गुणधर्म केसांच्या मुळांशी स्वच्छता राखतात. कोंडा निघून जाण्यास लिंबाचा उपयोग होतो. लिंबामधील पीएचचा स्तर चांगला असल्यानं केसातील तेलकटपणा लिंबाच्या वापरातून टाळला जातो. उन्हाळ्यात तेलकटपणामूळेच केसात कोंडा होतो.
केसांच्या स्वच्छतेसाठी लिंबाचा वापर करताना तो कोरफड सोबत करावा. कोरफडच्या गरामधे लिंबाचा रस मिसळावा. तो चांगला एकत्र करावा. आणि हे मिश्रण केसांना लावावं. वीस मिनिटानंतर केस सौम्य शाम्पूनं धुवावेत. आणि नंतर केसांना कंडिशनर लावावं. यामूळे केसातील कोंडा जाण्यासोबतच केसांची मूळं मजबूत होतात आणि केस गळती कमी होते.
त्वचेवरील अवघड काळेपणा घालवण्यासाठी प्रभावी
हाताचे कोपरे, गुडघे, पायाचे ढोपर यावर काळेपणा साठून तेथील त्वचा खडबडीत आणि कडक होते. हा काळेपण निघून जाऊन तेथील त्वचा मऊ होण्यासाठी लिंबाचा उपयोग होतो, लिंबाचा रस आणि मीठ घालून केलेलं मिश्रण हलक्या हातानं घासल्यास त्वचेवरचा काळेपणा निघून जाण्यास मदत होते. आठवड्यातून दोन तीन वेळा हा उपाय केल्यास अपेक्षित परिणाम दिसून येतात.
ओठांचा कोरडेपणा घालवण्यासाठी परिणामकारक
उन्हाळ्यात ओठ कोरडे होतात, काळे पडतात. ओठ स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस आणि ब्राऊन शुगरचा वापर करावा. लिंबामधील आम्लगुणामुळे ओठ स्वच्छ होतात. तसेच ब्राऊन शुगरमुळे ओठांवरची मृत त्वचा सहजपणे निघून जाऊन ओठ मऊ होतात.
दात स्वच्छ करण्यासाठी
दातांना आलेला पिवळेपणा घालवण्यासाठी बेकिंग सोड्यासोबत लिंबाचा रस वापरावा. बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाचं जाडसर मिश्रण बोटानं किंवा ब्रशंंच्या सहय्यानं दातांवर हलक्या हातानं घासावं. यामुळे दात पांढरे स्वच्छ होतात.