Join us  

केसांना घेऊ द्या मोकळा श्वास, करा हेअर डिटाॅक्स; घरच्या घरी हेअर डिटाॅक्सचे 6 पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2022 4:25 PM

डिटाॅक्स ही संपूर्ण शरीराची गरज आहे, हे आपण मानतो. पण संपूर्ण शरीराचा विचार करताना केसांचा विचार मात्र केला जात नाही. केस आणि केसांचं सौंदर्य तेव्हाच टिकेल जेव्हा केस निरोगी असतील. निरोगी केसांसाठी ' हेअर डिटाॅक्स' हे महत्त्वाचे आहे.

ठळक मुद्देघरच्याघरी हेअर डिटाॅक्स करणं सोपं आहे. केसांच्या पोषणाची गरज घरच्याघरी हेअर डिटाॅक्सचे उपाय केल्यास भागवली जाते. केवळ शाम्पूनं केस धुणं म्हणजे हेअर डिटाॅक्स नव्हे. त्याच्यापलिकडे जाऊन उपाय करणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञ म्हणतात. 

वजन कमी करण्यासाठी, शरीराला ताजेपणा मिळण्यासाठी  आणि उत्साह वाढण्यासाठी 'बाॅडी डिटाॅक्स' हा उपाय परिणामकारक आहे. त्वचा सुंदर दिसण्यासाठी, त्वचा मऊ मुलायम आणि चमकदार दिसण्यासाठी 'स्किन डिटाॅक्स' करणं ही बाबही परिचयाची झाली आहे. डिटाॅक्स ही संपूर्ण शरीराची गरज आहे, हे आपण मानतो. पण संपूर्ण शरीराचा विचार करताना केसांचा विचार मात्र केला जात नाही. आपल्या सौंदर्यात आणि व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने केस हे खूप महत्त्वाचे आहेत. केस आणि केसांचं सौंदर्य तेव्हाच टिकेल जेव्हा केस निरोगी असतील. निरोगी केसांसाठी ' हेअर डिटाॅक्स' हे महत्त्वाचे आहे असं मुंबई येथील 'रिचफील ट्रायकोलाॅजी' सेंटरच्या संस्थापक डाॅ. अपूर्वा शहा म्हणतात. 

Image: Google

डाॅ. शहा यांच्या मते हेअर डिटाॅक्स म्हणजे केस मुळापासून  खालच्या टोकापर्यंत स्वच्छ आणि निरोगी करणं, टाळू स्वच्छ करणं होय. टाळू जर व्यवस्थित स्वच्छ झाला तर केसांना जे तेल लावलं जातं, त्यातील पोषक घटक केसांच्या मुळापर्यंत पोहोचतात. टाळूच जर अस्वच्छ असेल, टाळूवर दषित घटकांचा थर साचलेला असेल तर केसांना कितीही महागाची उत्पादनं वापरा, परिणाम शून्यच दिसेल. कारण केसांच्या  मुळाकडील त्वचा दूषित घटकांच्या थरामुळे गच्च झालेली असते. हेअर डिटाॅक्समुळे टाळूची त्वचा स्वच्छ होऊन तेथील रंध्र मोकळी होतात. अशा परिस्थितीत केसांना तेल लावल्यास किंवा अन्य मार्गानं केसांचा पोषण करण्यासाठीकेल्यासत्याचा फायदा होतो. हेअर डिटाॅक्समुळे केसांच्या मुळापासूनच्या पोषणाचा मार्ग सुलभ होतो.  हेअर डिटाॅक्समुळे डोक्याला खाज येणं, कोंडा होणं, केस कमजोर होवूण तुटणं, केस कोरडे रुक्ष होणं.. या केसांच्या सौंदर्य आणि आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या समस्या सुटतात म्हणून हेअर डिटाॅक्स करणं महत्त्वाचं. डाॅ. शहा म्हणतात की, हेअर डिटाॅक्ससाठीची उत्पादनं बाहेर मिळतात. पण ती महागडी असतात.  ब्युटी पार्लरमधेही हेअर डिटाॅक्स ट्रीटमेण्ट केली जाते पण तीही स्वस्त नसते. पण केसांच्या आरोग्याचा आणि सौंदर्याचा विचार करता महिन्यातून किमान दोनदा हेअर डिटाॅक्स करणं आवश्यक असतं. हेअर डिटाॅक्सची महागडी उत्पादनं, हेअर ट्रीटमेण्टस टाळून घरच्या घरी परिणामकारक हेअर डिटाॅक्स करणं शक्य आहे असं डाॅ. शहा म्हणतात, त्यासाठी घरच्याघरी करता येणारे हेअर डिटाॅक्सचे सोपे पर्यायही सांगतात.

Image: Google

1. कोरफडीचा गर लावणे

कोरफडीच्या गरामधे अ, क आणि ई जीवनसत्त्वं असतात. या जीवनसत्त्वांमुळे टाळूच्या त्वचेशी मेलेल्या पेशी जाऊन नवीन पेशी निर्माण होण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढतो. यामुळे टाळू अर्थात केसांची मुळं ही निरोगी होतात. केसांच्या मुळाशी खपल्या निघणं, कोंडा होणं या समस्या दूर होतात. केसांच्या मुळाचा रक्तप्रवाह सुधारतो. यासाठी ताजी कोरफडीची पात घ्यावी. ती मधोमध कापावी. गराकडच्या भागानं कोरफड केसांच्या मुळाशी हलक्या हातानं 3-4 मिनिटं घासावी. कोरफड घासून झाल्यावर कोरफडीचा गर केसांमधे जिरु द्यावा. केस धुण्याच्या आधी किमान एक तास आधी केसांच्या मुळाशी कोरफड पाती चोळावी, तासाभरानंतर केस सौम्य शाम्पूनं धुवावेत. 

Image: Google

2. केस धुण्यासाठी ॲपल सायडर

केस डिटाॅक्स करण्यासाठी ॲपल सायडरचा वापर करताना आधी केस नेहमीप्रमाणे शाम्पूनं धुवावेत. नंतर एक मग पाण्यात थोडं ॲपल सायडर घालून ते पाण्यात मिसळून घ्यावे. हे पाणी हाताच्या बोटांनी केसाच्या मुळाशे हलका मसाज करत डोक्यावर हळू हळू ओतावं, यामुळे केसाच्या मुळाशी असलेल्या नैसर्गिक तेल सुरक्षित राहातं आणि केसातला कोंडा निघून जातो. 

Image: Google

3. बेकिंग सोड्यानं मसाज

एका वाटीत थोडा  बेकिंग सोडा घ्यावा. त्यात पाणी घालून बेकिंग सोडा नीट त्यात मिसळून घ्यावा. या बेकिंगसोड्याच्या मिश्रणनानं बोटांच्या पुढच्या भागाचा वापर करत हलका मसाज करावा. 3-4 मिनिटं बेकिंग सोड्याच्या मिश्रणानं मसाज केल्यानंतर केस सौम्य शाम्पूचा वापर करत धुवावेत. या उपायामुळे केसातलं अतिरिक्त तेल निघून जातं.  यामुळे केसाच्या मुळाशी दूषित घटकांचा थर जमा होण्यास मज्जाव होतो. 

Image: Google

4.  मध-डिटाॅक्स-पोषण

डिटाॅक्स करणं म्हणजे हानिकारक, विषारी घटक बाहेर काढण्यासोबतच आवश्यक पोषक घटक मिळवून देणंही गरजेचं असतं. मधाचा उपाय करत डिटाॅक्स आणि पोषण ही केसांची गरज भागवता येते. यासाठी एका वाटीत थोडं मध घ्यावं. त्यात थोडं पाणी घालावं. पाण्यात मध चांगलं मिसळून घ्यावं. हे मधाचं मिश्रण बोटांनी हलका मसाज करत केसांच्या मुळांना लावावं. तसेच संपूर्ण केसांनाही लावावं. या मिश्रणातील आर्द्रता  केसांच्या मुळाकडून शोषली जाण्यास दोन तीन तास लागतात. नंतर केस सौम्य शाम्पूनं धुवावेत.  मधाचं मिश्रण केसांना लावल्यास केसांची मुळं स्वच्छ होतात, केसातला कोरडेपणा कमी होवून केसांचं पोषण होतं. 

Image: Google

5.  काकडी आणि लिंबाचा रस

एका वाटीत ताज्या काकडीचा रस घ्यावा. त्यात थोडा लिंबाचा रस घालावा. दोन्ही रस एकत्र करुन ते मिश्रण केसांच्या मुळाशी हलक्या हातानं मसाज करत लावावं. यामुळे डोक्यातली खाज कमी होते, कोंडा जातो. केस आणि केसांची मुळं स्वच्छ होतात.

Image: Google 

6. योग्य आहार

योग्य आहार घेणं हा वजन कमी करण्याचा , शरीरातील विषारी घटक घालवण्याचा मार्ग आहे. केसांचं डिटाॅक्स करताना योग्य आहार हा महत्त्वाचा उपाय असल्याचं डाॅ. शहा म्हणतात. हेअर डिटाॅक्स करताना टाळूचंपोषण होण आवश्यक आहे. त्यासाठी रोजच्या आहारात क जीवनसत्त्वयुक्त आंबट फळं,  भाज्यांचं सॅलेड, भाजलेले बटाटे, संत्री, हिरव्या रंगाच्या पालेभाज्या, ट्माटे यांचा समावेश असावा. या घटकांच्या समावेशानं शरीराची आहारातून लोह शोषून घेण्याची क्षमता वाढते. शरीरात यामुळे लोहाचं योग्य प्र्माण राखलं जातं. शरीरात लोहाचं योग्य प्रमाण असणं म्हणजे केसांना आवश्यक तेवढ्या लोहाचा पुरवठा करण्याची सोय करणं.

Image: Google

केस मजबूत होवून वाढावे, दाट व्हावे यासाठी झिंक हा घटक महत्त्वाचा असतो. तो मिळण्यासाठी डाॅ. शहा आहारात पिनट बटर, डांगराच्या बिया यांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. ओमेगा 3 केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा घटक. तो मिळवण्यासाठी रोज अक्रोड खाणं,  दिवसभरात 3-4 लिटर पाणी पिणं हे हेअर डिटाॅक्स करण्यासाठी महत्त्वाचं असाल्याचं डाॅ. शहा म्हणतात. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्सहोम रेमेडी