आतापर्यंत लिपस्टिक, लिपग्लॉस, लिप लायनर ही गोष्ट आपल्याला माहिती होत्या. पण आता त्यासोबतच लीप पेंट या नव्या प्रकाराचाही उदय झाला आहे. या नॅचरल पेंटच्या साहाय्याने आपल्या ओठांवर आकर्षक पेंटींग करता येते.
काही वर्षांपुर्वी नेल आर्ट हा प्रकार आला आणि तरूणींनी तो चटकन स्विकारला. नेल आर्टच्या माध्यमातून नखांवर केलेल्या कलाकुसरी मोठ्या लक्षवेधी असतात. असाच प्रकार आता लीप आर्टमध्ये दिसून येत आहे. इथे फक्त कॅनव्हास बदलला असून नखांऐवजी ओठ आले आहेत.
एखाद्या पार्टीची थीम ठरविताना किंवा आऊटींगला जाताना तरूणी आवर्जून लिप आर्ट करून घेत आहेत. एकदा केलेेले लीप आर्ट ८ ते १० तास चांगले राहू शकते. पण त्यासाठी खाताना आणि पिताना मात्र खूप काळजी घ्यावी लागते.
बीचवर जायचे असेल तर ओशन थीम, निसर्गाच्या सान्निध्यात जाणार असू तर फुले, पाने, पक्षी, फुलपाखरे, डेट वर जायचे असेल तर लाल बदाम आणि गुलाबाची फुले किंवा रोमान्स वाढविणारे एखादे सिम्बॉल, रात्रीच्यावेळी एखाद्या डीजे पार्टीला जायचे असेल तर ग्लिटर्सचा वापर करून केलेले डिझाईन, लग्न, रिसेप्शन यासारख्या प्रसंगात कुंदन किंवा मोत्याचा वापर असे लीप आर्टचे अनेक प्रकार सध्या तरूणींमध्ये इन आहेत. प्रत्येक प्रसंगानुसार लीपआर्टच्या हजारो डिझाईन्स उपलब्ध असून सगळ्याच डिझाईन्स एकापेक्षा एक सरस आहेत. त्यामुळे यातील कोणते डिझाईन आपल्या ओठांवर खुलवावे, हा प्रश्नही अनेकींना पडतो.
कसे करायचे लीप आर्ट
लीप आर्ट करण्यासाठी लिपस्टिक आणि लिप पेंट या दोन गोष्टी प्रामुख्याने वापरल्या जातात. कुंदन, स्टोन किंवा ग्लिटरचाही यासाठी उपयोग केला जातो. लीप आर्ट करताना सगळ्यात आधी ओठांवर आपल्याला लिपस्टिकचा जो शेड हवा असेल, तो लावून घ्यावा. यानंतर ओठांवर जे डिझाईन काढायचे आहे ते लीप पेंटच्या साहाय्याने रेखाटावे. लीप आर्टसाठी आय लायनरचा जसा ब्रश असतो, तसा अत्यंत लहान आकाराचा ब्रश वापरला जातो.