बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा फिटनेस जेवढा जबरदस्त आहे, तेवढाच तिचा फॅशन सेन्सदेखील उत्कृष्ट आहे. शिल्पाची कपड्यांची स्टाईल, हेअरस्टाईल, मेकअप या बाबतीत नेहमीच चर्चा होत असते. जेवढं उत्तम पद्धतीने ती वेस्टर्न ड्रेस कॅरी करते, तेवढ्याच सहजतेने ती साडी आणि इतर पारंपरिक ड्रेसही घालू शकते. त्यामुळे फॅशनच्या बाबतीत नेहमीच शिल्पाकडे पाहिले जाते. शिल्पाचे साडी ड्रेपिंगचे आणि साडीचा पदर कसा घ्यावा, याबाबतीतले काही फोटो नुकतेच सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. यापैकी काही प्रकार तर अगदी सहज सर्वसामान्य मुली कॅरी करून शकतात.
अशी आहे शिल्पाची स्टाईल
१. उजव्या खांद्यावरून पदर
सामान्यपणे उलटा पदर घेण्याच्या एक- दोन साडी ड्रेपिंगच्या पद्धती सोडल्या तर बहुतांश साडी पॅटर्नचा पदर डाव्या खांद्यावरून घेतला जातो. शिल्पाने थोडा लूक बदलला असून तिने उजव्या खांद्यावरून पदर घेतला आहे. यामध्ये तिने कंबरेला कंबरपट्टा लावला असून पदराच्या छोट्या छोट्या प्लेट्स घातल्या आहेत आणि पदर उजव्या खांद्यावरून मागे सोडला आहे. डिझायनर साडी नेसली असेल, तर तुम्हीदेखील असा लूक करू शकता. थोडासा वेगळा लूक आहे, तरी पण छान वाटतो.
२. दोन्ही खांद्यावरून पदर
दोन्ही खांद्यावरून पदर असं वाचल्यावर तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच काठपदर साडी नेसलेली एक स्त्री आली असेल. पण शिल्पाने हा लूक एका डिझायनर साडीवर केला आहे. शिल्पाची या साडीवरची स्टाईल खूपच वेगळी आहे. तरीही आपण आपल्याकडे ज्या साड्या आहेत, त्यानुसार पण पदर ड्रेपिंगची अशी स्टाईल करू शकतो. यामध्ये शिल्पाने डाव्या खांद्यावरून पदर घेऊन तो मागे सोडला आहे आणि त्यानंतर तो उजव्या खांद्यावर अशा पद्धतीने घेतला आहे की तो पदर म्हणजेच उजव्या हाताची बाही आहे, असा भास होतो. यामध्ये ट्रॅडिशनल आणि मॉडर्न असे दोन्ही लूक साधता येतात. एखाद्या पार्टीसाठी तुम्ही असा लूक नक्कीच करू शकता.
या व्यतिरिक्त असेही पदर ड्रेपिंग करू शकता
१. स्कार्फ किंवा नेक रॅप साडी
थंडीचे दिवस सुरु झाले की अशा पद्धतीचा लूक छानही दिसतो आणि तुमचे थंडीपासून संरक्षणही करतो.
असा पदर घ्यायचा असेल तर नेहमीप्रमाणे डाव्या खांद्यावरून फ्लोटींग पदर घेऊन तो मागे सोडा. यानंतर हा पदर गळ्याभोवती घेऊन पुढच्या बाजूने गुंडाळा. यामध्ये तुमचे दोन्ही हात कव्हर होतील. गळ्यातले नाही घातले तरी या ड्रेसिंगवर चालते. फक्त कानातले मोठे आणि ट्रेण्डी घाला. यामुळे नक्कीच तुम्ही अधिक आकर्षक आणि स्टाईलिश दिसाल.
२. बेल्ट स्टाईल
तुम्ही जर एकदम स्लिम आणि उंच असाल तर तुम्हाला ही स्टाईल नक्कीच छान दिसेल. यामध्ये नेहमी जशी साडी नेसतो, तशी साडी नेसा. साडीच्या पदराच्या प्लेट्स अतिशय बारीक घाला. डाव्या खांद्यावर हा पदर पिनअप करा आणि माग सोडा. यानंतर बारीक खडे असणारा नाजूक बेल्ट तुमच्या कंबरेभोवती गुंडाळा. असा लूक नक्कीच तुमची फिगर हायलाईट करणारा ठरतो. जाड असणाऱ्या किंवा उंचीने कमी असणाऱ्या महिलांनी असा लूक करणे टाळावे.