दिवाळी असो एखादा समारंभ असो किंवा एखादी पार्टी असो. अशा कार्यक्रमांसाठी तयार होताना आपल्यात अगदी अपूर्व उत्साह संचारलेला असतो. अगदी मस्त नटून थटून, प्रसंगानुसार कमी- जास्त मेकअप करून आपण रेडी होतो. सगळा कार्यक्रम छान एन्जॉय करतो. जेव्हा कार्यक्रम संपतो तेव्हा मात्र आपण पार गळून गेलेलो असतो. काही जणींना तर एवढा थकवा येतो की आपण केलेला मेकअप आधी काढून टाकायला हवा. चेहरा स्वच्छ करायला हवा, हे देखील त्या विसरुन जातात. मैत्रिणींनो तुम्हालाही अशी सवय असेल आणि मेकअप रात्रभर चेहऱ्यावर राहिला तर त्याने काय एवढे मोठे नुकसान होणार आहे, असे वाटत असेल, तर सावधान. कारण अशी सवय तुमच्या त्वचेसाठी अतिशय घातक असून यामुळे त्वचेचे खूप जास्त नुकसान होऊ शकते. त्यामुळे कितीही थकलात तरी makeup remove करूनच झोपा.
मेकअप काढताना या चुका करू नका......- मेकअपसाठी वापरण्यात येणाऱ्या कॉस्मेटिक्समध्ये खूप जास्त केमिकल्स असतात. आपली त्वचा अशा केमिकल्सचा मारा काही तासच सहन करू शकते. त्यानंतर जर हे कॉस्मेटिक्स आपल्या चेहऱ्यावर तसेच राहिले तर मात्र त्वचेवर पुरळ येणं, त्वचा काळवंडणे असे प्रकार होऊ शकतात.
- मेकअप करण्याच्या आधी आपण त्वचेवर मॉईश्चरायझर लावतो. या मॉईश्चरायझरमुळे काही काळ आपल्या त्वचेला संरक्षण मिळते. पण ठराविक तास झाले की मॉईश्चरायझरचा परिणाम होणे बंद होते. असे झाल्यामुळे कॉस्मेटिक्समधील रसायने थेट आपल्या त्वचेत मिसळली जातात. यामुळे त्वचेवर सुरकुत्याही येऊ शकतात.
- लिपस्टिक हळू हळू कमी होत जाते. म्हणून अनेक जणींना वाटते की ती आपोआप जाईल. पण असे केल्यास ओठांची त्वचा काळी पडते. ओठांवर काळे- पांढरे डाग तयार होतो. काह जणींचे ओठ तर खपल्या आल्याप्रमाणे दिसतात. ओठांचे असे नुकसान टाळण्यासाठी लिपस्टिकदेखील संपूर्णपणे काढून टाकावी.
- मेकअप काढायचा म्हणजे हातावर फेसवॉश घेऊन खसाखर चेहऱ्यावर चोळायचे, असे मुळीच करू नका. असे केले तर आधीच मेकअपमुळे संवेदनशील झालेल्या त्वचेचे अधिकच नुकसान होईल. मेकअप करण्याची जशी एक पद्धत असते, तशीच मेकअप रिमुव्ह करण्याची देखील विशिष्ट पद्धत आहे.
- मेकअप काढण्यासाठी मेकअप रिमूव्हर वाईप्सचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. अशावेळी वाईप्स खरेदी करताना काळजी घ्या. ज्या वाईप्समध्ये अल्कोहोल नाही, असे वाईप्स खरेदी करा.
- क्लिंजिंग ऑईल किंवा बेबी ऑईल एका कापसावर घेऊन त्याने देखील तुम्ही मेकअप काढू शकता. पण असे करताना तेल किंव निघालेला मेकअप डोळ्यात जाणार नाही, याची काळजी घ्या. या दोन्ही गोष्टी जेव्हा चेहऱ्यावर लावाल तेव्हा पुढचा एखादा मिनिट शांत बसून रहा. कारण एखाद्या मिनिटात या गोष्टी चेहऱ्यावर सेट होतात आणि त्यानंतर मेकअप पुसणे सोपे जाते.
- मेकअप काढल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुण्यास विसरु नका. चेहरा धुतल्यानंतर टोनर आणि मॉईश्चरायझर या दोन स्टेप्स अतिशय महत्त्वाच्या आहेत. या दोन स्टेप्स पुर्ण केल्याशिवाय चेहऱ्याला पोषण मिळणार नाही.
- मेकअप काढताना कानाचा मागील भाग, गळा, मान, कपाळावरील हेअरलाईन या भागांना विसरू नका. बऱ्याचदा या भागांकडे दुर्लक्ष होते आणि मग मेकअप तसाच राहिल्याने त्या भागात पॅचेस तयार होतात.
डोळ्यांचा मेकअप काढताना खूप काळजी घ्या- डोळे हा आपल्या चेहऱ्यावरचा सगळ्यात नाजूक भाग. त्यामुळे मेकअप काढताना डोळ्यांची खूप काळजी घ्या. अतिशय सावधगिरी बाळगून चेहऱ्याचा मेकअप स्वच्छ करा. - लेन्स वापरत असल्यास मेकअप काढण्यापुर्वी लेन्स काढून टाका.
- डोळ्यांचा मेकअप काढण्यासाठी व्हॅसलिन किंवा पॅराशूट तेलाचा वापर करणे टाळा. यामुळे मेकअप डोळ्यात जाण्याची शक्यता अधिक असते. - वाईप्सचा वापर करून डोळ्यांचा मेकअप काढण्याचा पर्याय अतिशय उत्तम आहे. अशा पद्धतीने मेकअप काढायला थोडा वेळ निश्चित लागतो. पण हा पर्याय डोळ्यांसाठी सगळ्यात सुरक्षित मानला जातो.