Join us  

माधुरी दीक्षितसारखे सुंदर केस हवेत? मग ती स्वत: करते त्या 2 गोष्टी नियमित करा..  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 5:01 PM

वयाच्या 54 व्या वर्षीही पंचवीशीतल्या मोहक तरुणीप्रमाणे त्वचा आणि केस असलेली माधुरी दीक्षित केसांची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक घटकांचा वापर करण्याचा आग्रह धरते. आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढत हे दोन उपाय माधुरी करतेच शिवाय केसांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपल्या दिनचर्येशी निगडित बारीक बारीक गोष्टींची काळजी देखील घेते.

ठळक मुद्देमाधुरी दीक्षित केसांचं सौंदर्य जपण्यासाठी खोबरेल तेल, कढीपत्ता, मेथ्या आणि कांदा वापरुन एक खास तेल स्वत: तयार करते.माधुरी म्हणते केस जपण्यासाठी केवळ तेल आणि शाम्पू एवढंच महत्त्वाचं नाही, केस धुण्याआधी हेअर मास्क लावणंही आवश्यक आहे.आठवडा-पंधरवाड्यातून केसांची टोकं अवश्य कापावीत. केस थोडे कापत राहिल्याने केसांना दोन टोकं फुटत नाही. केसांना उंदरी लागत नाही.

 बदललेली लाइफ स्टाइल, प्रदूषण आणि दुर्लक्ष या तीन गोष्टींमुळे कमी वयातही केसांच्या समस्या निर्माण होतात. केसात कोंडा, केस गळणे, लवकर पांढरे होणे, केसांची वाढ खुंटणे. अशा विविध समस्यांनी केसांचं सौंदर्य हरवतं. या केसांसाठी काय करायचं? असा प्रश्नाचा किडा सतत डोक्यात वळवळत असतो. या अस्वस्थतेतून कॉस्मेटिक्सस्वरुपी मिळालेले उत्तर समस्यापेक्षा उपाय घातक असं ठरण्याची शक्यताच जास्त असते. वयाच्या 54 व्या वर्षीही पंचवीशीतल्या मोहक तरुणीप्रमाणे त्वचा आणि केस असलेली माधुरी दीक्षित केसांची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक घटकांचा वापर करण्याचा आग्रह धरते.

Image: Google

माधुरी दीक्षित सांगत असलेले केस जपण्याचे उपाय हे सांगीव ऐकीव नसून तिचे स्वत:चे आहेत. आपल्या व्यस्त दीनचर्येतून वेळ काढत हे दोन उपाय माधुरी करतेच शिवाय केसांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपल्या दिनचर्येशी निगडित बारीक बारीक गोष्टींची काळजी देखील घेते.

Image: Google

माधुरीचं खास तेल आणि मास्क

माधुरी म्हणते की, शुटिंगमुळे सतत केसांची नवनवी स्टाइल करावी लागते. त्यासाठी वेगवेगळी उपकरणं केसांवर वापरली जातात. याचा केसांवर दुष्परिणाम होतो. केस खराब होण्याची शक्यता त्यातूनच बळावते. असं होवू नये म्हणून माधुरी म्हणते मी एक खास हेअर ऑइल आणि हेअर मास्क वापरुन केसांची काळजी घेते.हे तेल कोणीही सहज करुन वापरु शकतं. माधुरी म्हणते हे तेल तयार करण्यासाठी अर्धा कप खोबर्‍याचं तेल, 15-20 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा मेथी दाणे आणि 1 बारीक चिरलेला कांदा एवढं साहित्य घ्यावं. हे सर्व साहित्य एका भांड्यात एकत्र करावं आणि ते उकळायला ठेवावं. हे मिश्रण काही मिनिटं उकळावं. तेलाचा रंग काळसर पडू लागला की गॅस बंद करावा. हे मिश्रण भांड्यातच थंड होवू द्यावं. थंड झाल्यावर हे तेल एका बाटलीत भरुन ठेवावं. आठवड्यातून दोन दिवस हे तेल केसांना लावावं. हे तेल केसांच्या अनेक समस्यांवर गुणकारक आहे.

Image: Google

हेअर मास्क

 केसांची काळजी घेण्यासाठी केवळ केसांना तेल आणि शाम्पू- कंडिशनर लावून भागत नाही. केस धुण्याआधी केसांना योग्य ते हेअर मास्क लावणंही आवश्यक आहे . घरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक घटकांचा वापर करत हा हेअर मास्क तयार करुन वापरणं अगदीच सहज आणि सोपं आहे.

हे हेअर मास्क तयार करण्याची कृतीही माधुरी सांगते. हेअर मास्क तयार करण्यासठी 1 पिकलेलं केळ बारीक कापून, 2 चमचे घरचं दही आणि 1 चमचा मध ही सामग्री घ्यावी. हे सर्व हातानं किंवा ब्लेण्डरनं कुस्करावं. कुस्करलेलं हे मिश्रण केसांना लावावं. अर्धा ते पाऊण तास ते केसांना लावून ठेवावं. नंतर केस सौम्य शाम्पूचा उपयोग करत धुवावेत. केसांना शाम्पू लावल्यानंतर कंडिशनर लावू नये.

Image: Google

माधुरी सांगते केस जपण्याचे सोपे उपाय

माधुरी म्हणते केस जपण्यासाठी, केसांचं सौंदर्य टिकवण्यासाठी खूप वेळ खाऊ आणि खर्चिक उपाय करण्याची गरज नाही. आपल्या दैनंदिन जीवनात काही पथ्यं केसांच्या दृष्टिकोनातून पाळल्यास केस खराब होत नाही. ही पथ्यं अगदीच सहज, चालता बोलता पाळता येण्यासारखी आहे.1. दिवसभरात शरीराच्या गरजेएवढं पाणी अवश्य प्यावं.2. आहार हा एकवर्णी न ठेवता ताटात संतुलित आहाराचा नियम पाळणारे पदार्थ असावेत.3. डॉक्टरांच्या सल्ल्याने बायोटीन, ओमेगा3, फिश ऑइल यांचं सेवन सुरु करावं.4. आठवडा-पंधरवाड्यातून केसांची टोकं अवश्य कापावीत. केस थोडे कापत राहिल्याने केसांना दोन टोकं फुटत नाही. केसांना उंदरी लागत नाही.5. केस धुतल्यावर ते सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करु नये.6. धुतलेले केस रुमालाने रगडून पुसे नये. घाई असल्यास मायक्रो फायबर रॅप केसात गुंडाळून केस सुकवता येतात.7. शाम्पू लावून केस धुताना जास्त गरम आणि एकदम थंड पाणी वापरु नये. कोमट पाणी घ्यावं.8. केसांना शाम्पू आणि कंडिशनर लावण्याची विशिष्ट पध्दत आहे. शाम्पू हा नेहेमी केसांच्या मुळाशी ,टाळूला आणि मग थोडं केसांना लावायला हवं. तर कंडिशनर हे केसांच्या मुळापासून केसांच्या मध्यापर्यंत वापरावा.9. बोलता, चालताना, शांत बसलेले असताना सारखा केसात हात घालू नये. हाताच्या उष्णतेनं केस लवकर तुटतात.10. केस भराभर न विंचरता हळूवार विंचरावेत.11. हिवाळ्यात, बाहेर ऊन असताना डोक्याला स्कार्फ बांधावा. यामुळे केस लवकर तुट्त नाहीत.12 केसांना तेल लावण्याचा कंटाळा अजिबत करु नये. आठ्वड्यातून दोन वेळा केसांना तेल लावून डोक्याचा मसाज करणं केस चांगले ठेवण्यासाठीचे आवश्यक पथ्यं आहे.