Join us  

लांबसडक - सुंदर - मऊ केसांसाठी माधुरी दीक्षित सांगते १० टिप्स; वाचा माधुरीचा स्पेशल सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2022 2:28 PM

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आपल्या ब्यूटी केअरची माहिती आपल्या यू ट्यूब चॅनलवरुन देत असते. अशाच एका व्हिडीओद्वारे माधुरी दीक्षित केसांची काळजी घेण्याठी, केस लांबसडक, मऊ मुलायम करण्यासाठी (hair care tips) घरच्या घरी कोणते उपाय करता येतील आणि कोणते नियम पाळयला हवेत याबद्दलच्या टिप्स (Madhuri Dixit hair care secrets) सांगितल्या आहेत. 

ठळक मुद्देकेस हेअर प्रोडक्टसने नव्हे तर संतुलित आहार घेतल्यास , दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास चांगले राहातात.केसांना पोषण मिळण्यासाठी माधुरी दीक्षित खोबऱ्याचं औषधी तेल घरी तयार करते. केसांना चमक येण्यासाठी , ते मऊ मुलायम होण्यासाठी माधुरी केळे, दही आणि मध यांचा लेप केसांना लावते. 

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)  55 वर्षांची झाली तरी तिनं तिचं सौंदर्य टिकवून ठेवलं आहे. चेहेरा, केस, फिगर या प्रत्येक गोष्टीची ती बारकाईनं काळजी घेत असल्यामुळे तिच्या सौंदर्यात आजही काही उणं झालेलं नाही. बायका तिशी चाळीशी नंतरच चेहेऱ्यावरच्या सुरकुत्या, गळणारे केस याबाबत तक्रारी करत असतात. त्या सर्वांसाठी माधुरी दीक्षित आदर्श आहे. आपल्या सौंदर्याची काळजी घेण्यासाठी वेळ काढणं, नियम पाळणं, घरगुती उपाय करणं या सर्व गोष्टी माधुरी नेटाने करते. माधुरी दीक्षित आपल्या यू-ट्यूब चॅनलवर तिचे ब्यूटी सीक्रेटस (Madhuri Dixit beauty secrets)  सांगणारे व्हिडीओ टाकत असते. या व्हिडीओद्वारे माधुरी दीक्षित त्वचा , केस यांची घरच्याघरी काळजी घेतल्यास वय वाढलं तरी त्यांच्या सौंदर्यात कशी काहीच बाधा येत नाही याबद्दल मार्गदर्शन करते. अशाच एका व्हिडीओद्वारे लांबसडक. काळ्याभोर केसांसाठी ( hair care tips)  काय काळजी घ्यायला हवी, घरातल्या घरात काय उपाय करायला हवेत याचं मार्गदर्शन  ( Madhuri Dixit hair care secrets) केलं आहे. हा व्हिडीओ जुना असला तरी तो आता पुन्हा व्हायरल झाला आहे. 

Image: Google

काय म्हणते माधुरी?

1. माधुरी म्हणते केस जपण्यासाठी पहिला नियम म्हणजे आपली जीवनशैली आरोग्यदायी असावी. दिवसभरात पुरेसं पाणी पिणं हा त्वचा आणि केस जपण्याचा मुलभूत नियम आहे. पुरेसं पाणी पिल्यानं शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. 

2, आपण काय खातो याचा परिणाम आपल्या केसांवर आणि त्वचेवर लगेच दिसतो. केस जपण्यासाठी संतुलित पोषणयुक्त आहार असायला हवा. आपल्या रोजच्या आहारातून शरीराला जीवनसत्वं, खनिजं यासोबतच ॲण्टिआक्सिडण्ट्स, ओमेगा 3 केसांसाठी उपयुक्त घटक मिळायलाच हवेत.  केस केवळ हेअर प्रोडक्टसने नव्हे तर योग्य आहारानेच चांगले राहातात असं माधुरी म्हणते. 

3. केस चांगले वाढण्यासाठी केसांची टोकं नियमित कापत राहिली पाहिजे. केस कापल्यानं खराब झालेली केसांची टोकं निघून जातात आणि केस वाढतात. 

4. केसांसाठी कायम हेअर ड्रायर आणि हाॅट आयर्न यांचा वापर करणं टाळायला हवं. ही उपकरणं केसांवर सारखी वापरल्यास केस खराब होतात, कमजोर होतात. 

Image: Google

5. केस पुसण्यासाठी आपला नेहमीचा टर्किश टाॅवेल न वापरता मायक्रोफायबर रुमाल वापरावा. माधुरी दीक्षितच्या मते टर्किश टाॅवेलने केस पुसल्यास केस नीट सुकत नाही आणि केस घासले जावून गळतात. त्यामुळे केस कोरडे करण्यासाठी मायक्रोफायबर रुमाल वापरणं हा योग्य उपाय आहे. 

6. केस गळत असल्यास, केसात कोंडा असल्यास केसांसाठी गरम पाणी वापरु  नये. केस धुण्यासाठी खूप गरम पाणी वापरल्यास केशतंतूवर वाईट परिणाम होतात. केस कमजोर होवून तुटतात. केस कायम कोमट किंवा थंड पाण्यानं धुवावेत. 

7. केस धुतल्यानंतर ओले असतानाच विंचरणे, ओल्या केसातून कंगवा किंवा ब्रश फिरवल्यानं केस तुटतात. तसेच केस विचरताना केसांमधून हळूवार ब्रश/ कंगवा फिरवावा. यामुळे केस तुटत नाही. 

8. उन्हाप्रमाणेच केस ओले  होण्यापासून आणि थंड हवामानातही जपायला हवेत. थंड हवामानात बाहेर पडताना केसांना रुमाल किंवा स्कार्फ गुंडाळलेला हवा. 

Image: Google

9. केसांचं योग्य पोषण होण्यासाठी केसांना नियमित तेल लावायला हवं. माधुरी दीक्षित केसांचं पोषण करण्यासाठी घरी तयार केलेलं एक खास तेल वापरते. हे तेल कसं तयार करायचं हे ही तिनं सांगितलं आहे. केसांसाठी घरगुती तेल तयार करताना अर्धा कप खोबऱ्याचं तेल, 15-20 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा मेथी दाणे, 1 छोटा कांदा किसून घ्यावा. एका भांड्यात खोबऱ्याचं तेल घ्यावं. तेलात सर्व जिन्नस घालून तेल चांगलं उकळू द्यावं. तेल उकळलं की गॅस बंद करावा. तेल थंड झाल्यावर ते गाळून एखाद्या बाटलीत भरावं. हे तेल लगेच न वापरता दोन दिवसांनी वापरावं. या तेलानं आठवड्यातून किमान 2 केसांना मसाज करायला हवा असं माधुरी म्हणते. 

10. केस मऊ मुलायम आणि काळेभोर राहाण्यासाठी माधुरी केसांना घरी तयार केलेला एक खास लेप लावते. या लेपासाठी 1 केळे, 2 चमचा दही आणि 1 चमचा मध घ्यावं. एका खोलगट वाटीत केळे कुस्करुन घ्यावं. नंतर यात दही आणि मध घालून ते एकजीव करावं. हा लेप मग केसांना लावावा. केसांवर शाॅवर कॅप घालून केस झाकावेत. 30-40 मिनिटं हा लेप केसांवा ठेवावा. नंतर केस शाम्पू लावून धुवावेत. केस धुतल्यानंतर कंडिशनर वापरु नये.  या लेपामुळे केस मऊ मुलायम होतात. काळेभोर दिसतात. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीमाधुरी दिक्षित