सौंदर्य क्षेत्रात माधुरी दीक्षित ही केवळ चाळीशी पन्नाशीच्या टप्प्यातील महिलांचीच आदर्श नाहीये. तरुण मुलीही माधुरीला आपला आदर्श मानतात आणि तिला फॉलो करतात. तिचा स्क्रीनवरचा अॅपिरिअन्स हा कधीही हेवी मेकअपचा नसतो. तिच्या चेहऱ्यावर मेकअपचे केकी थर नसतात , आजही माधुरी तिच्या नैसर्गिक सौंदर्यासाठीच ओळखली जाते. शरीर आणि त्वचेवरचं हे सौंदर्य जपण्यासाठी माधुरी काय करत असेल असं कुतुहल सगळ्यांनाच असतं. सोशल मीडियावर वेळोवेळस वेगवेगळ्या व्हिडीओजच्या माध्यमातून माधुरी दीक्षित तिच्या फिटनेसबद्दल, त्वचेच्या काळजीबद्दल सांगत असते.
त्वचा ही फ्रेश आणि निरोगी असेल तरच आपण नैसर्गिकरित्या सुंदर दिसू यावर माधुरीचा विश्वास आहे. पण अनेक कारणांमुळे कधी कधी चेहेरा थकलेला, निस्तेज दिसतो याचाही तिला अनुभव आहे. आणि अशा वेळेस केवळ मेकअपखाली चेहेरा झाकून चालत नाही हे माधुरी स्पष्ट सांगते. याबाबत आपला अनुभव शेअर करताना ती म्हणते की कुठे कार्यक्रमाला बाहेर जायचं आहे आणि त्यावेळेस आरशात बघितलं तर चेहेरा काही कार्यक्रमाला जाण्यासारखा नसतो. त्वचा थकलेली , निस्तेज दिसत असते. अशा वेळेस मी पंधरा मिनिटांची झटपट जादू माझ्या चेहेऱ्यावर करते आणि तयार होते. ही जादू खूप कामाची असल्याचंही ती सांगते.
काय आहे ही पंधरा मिनिटांची झटपट जादू?
माधुरी आपल्या व्हिडीओमधे सांगते की, चेहेरा हा उदास, निस्तेज दिसत असला तर पंधरा मिनिटं स्वत:साठी काढावेत. घरात काकडी असतेच. काकडी गोल काप करुन चिरुन घ्यावी आणि मग हे काकडीचे काप गुलाबपाणी किंवा दुधात भिजत घालावेत. ते फ्रीजमधे पंधरा वीस मिनिटं ठेवावेत. तेवढ्या वेळात काकडी दुधात किंवा गुलाबपाण्यात छान भिजते . पंधरा मिनिटानंतर हे भिजवलेले काकडीचे काप काढून चेहेऱ्यावर ठेवावेत. पुढचे पंधरा मिनिटं छान डोळे मिटून बसून राहावं. नंतर चेहेरा थंड पाण्यानं धुवावा. या उपायानं त्वचेवर तात्काळ चमक येते. चेहेरा एकदम ताजा तवाना दिसतो. केवळ कूठे बाहेर जायचं असेल तेव्हाच हा उपाय करावा असं नाही. जेव्हा केव्हा आपल्याला आपली त्वचा ही निस्तेज दिसेल तेव्हा हा उपाय केल्यास आपल्या त्वचेला आणि ती आरशात पाहून आपल्या मनाला छान वाटतं.
सौंदर्य जपायचं असेल तर माधुरी सांगते....
चेहेरा हाच सौंदर्याचा घटक नसतो. आपलं शरीर , बांधा, केस यांची देखील नीट निगा राखली तर आपण खऱ्या अर्थानं सुंदर दिसतो असं माधुरी म्हणते. बाह्य उपचार करुन त्वचा तजेलदार करण्याचा मार्ग आहे पण ती नैसर्गिकरित्या तजेलदार असायाला हवी . यासाठी माधुरी दिवसभरात भरपूर पाणी पिण्याचा , तेलकट आणि अति गोड पदार्थ न खाण्याचा सल्ला देते. ज्यूस पिणं ही आजकालची फॅशन आहे. पण माधुरी ज्यूस टाळून फळं खाण्यावरच भर देते. कारण फळांमधे असलेलं फायबर ज्यूसमधे नसतं. आणि ज्यूसमधील साखर शरीर लगेच शोषून घेते, त्याचा नकारात्म्क परिणाम त्वचा आणि शरीरावर होतो. त्यामुळे ज्यूसपेक्षा फळं खा असं माधुरी सांगते. ती म्हणते फळांमुळे पोट दीर्घकाळपर्यंत भरलेलं राहातं,
आरोग्यदार्यी खाण्या पिण्यासोबतच रोजचा व्यायाम हा आरोग्य, त्वचा आणि शरीराचा बांधा उत्तम ठेवण्यास आवश्यक असतो असं माधुरी म्हणते. माधुरी म्हणते की मला फिट राहायला आवडतं. पण म्हणून मी जिमवर अवलंबून राहात नाही. मी त्यासाठी तीन दिवस कथ्थक करते आणि उरलेले दोन दिवस व्यायाम करते. नृत्य किंवा व्यायाम कोणत्याही स्वरुपातील शारीरिक कृती ही फिट राहाण्यासाठी खूप महत्त्वाची असल्याचं माधुरी म्हणते.
माधुरीचं एएम -पीएम रुटीन आणि घरगुती उपचार
त्वचेची निगा राखण्यासाठी माधूरी एएम आणि पीएम रुटीन पाळते. तिच्या एएम रुटीनमधे क्लिन्जर, अल्कोहोलविरहित टोनर, मॉश्चरायझर आणि एसपीएफ असतं. हाच नियम ती रात्रीही पाळते. आधी ती चेहेऱ्यावरचा मेकअप काढते, मग क्लीन्जरने चेहेरा स्वच्छ करते, टोनर लावते मग चेहेऱ्यावर काळे डाग पडू नये , चेहेरा काळा पडू नये म्हणून व्हिटॅमिन सी सिरम लावते आणि शेवटी मॉश्चरायझर लावते.
माधुरीला त्वचेची काळजी घेताना हे एएम -पीएम रुटीन पाळणं खूप महत्त्वाचं वाटतं. पण त्यासोबतच घरगुती लेप लावण्यावरही तिचा भर असतो. आपल्या आईकडून मिळालेला हा सल्ला आणि युक्त्या माधूरी आजही पाळते. बेसन पीठ, लिंबू आणि मध या स्वयंपाकघरातल्या तीन घटकांवर माधुरीचं विशेष प्रेम आहे. या घटकांपासून बनवलेले लेप ती वरचेवर लावत असते. . ती म्हणते बेसनामधे नैसर्गिक अॅस्ट्रिजेन्ट असतं . त्यामुळे स्क्रब करण्यासाठी बेसनाचा छान उपयोग होतो तसेच मधात आर्द्रता खूप असते. चेहेरा ओलसर ठेवण्यास मध मदत करतं आणि लिंबाच्या रसात अॅसिडिक गुणधर्म असल्यानं त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी लिंबाची मदत होते.
माधुरीला आवडतो मॅट मेकअप
सध्या चमकदार त्वचेचा ट्रेण्ड आहे. माधुरी वयाच्या ज्या टप्प्यात आहे त्या टप्प्यात त्वचेला मॅट मेकअप फॉर्म्युला शोभून दिसतो हे तिला माहित आहे. आणि म्हणूनच यासाठी ती शीन/ शाइन मेकअप टाळून मॅट मेकअप करते. यासाठी ती मॅट फिनिश असलेलं फाऊंडेशन, प्रायमर, आणि कन्सिलर वापरते. केकी फेस टाळण्यासाठी मेकअप करताना ती या साधनांचा मर्यादित वापर करते.
त्वचेची काळजी घेताना, स्वत:चा लूक जपताना आणि मेकअप करताना माधुरी दीक्षित घेत असलेली काळजी कोणालाही मार्गदर्शक अशीच आहे.