Join us  

चमचाभर खोबरेल तेल की जादू.. पावसाळ्यात कोरड्या पडणार्‍या त्वचेला लावा, महागडी लोशन्स विसरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 4:42 PM

केसांसाठी परिणामकारक असलेलं खोबर्‍याचं तेल त्वचेसाठीही आहे फायदेशीर. त्वचा मॉश्चराइज करण्यापासून ते डोळ्याखालील काळी वर्तुळ कमी करण्यापर्यंत खोबर्‍याच्या तेलाचे अनेक उपयोग आहेत. त्वचेच्या कठीण समस्यांसाठी एक चमचा खोबर्‍याचं तेलही पुरतं.

ठळक मुद्देखोबर्‍याच्या तेलात सूक्ष्म जीवाणूविरोधी आणि सूज कमी करणारे घटक आहेत.खोबर्‍याच्या तेलात क्लीजिंग घटक असतात. त्यामुळेच खोबर्‍याच्या तेलाच्या मदतीने चेहेर्‍याच्या त्वचेवरील घाण, मृत पेशी निघून जातात.खोबर्‍याच्या तेलात ई जीवनसत्वं असतं, म्हणून डोळ्याखालची काळी वर्तुळं घालवण्यासाठी खोबर्‍याच्या तेलाचा उपयोग केला जातो.

 बाजारात केसांसाठीच्या तेलाचे कितीही वेगवेगळे प्रकार येवोत पण बहुतांश महिला केसांसाठी खोबर्‍याचंच तेल वापरतात. खोबर्‍याचं तेल केसांसाठी जितकं फायदेशीर आहे तितकंच ते त्वचेसाठीसुध्दा परिणामकारक आहे. खोबर्‍याच्या तेलात असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे त्वचेसाठीही हे तेल गुणकारी मानलं जातं.  ‘नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजा इन्फर्मेशन’ या वेबसाइटवर एक अभ्यास प्रसिध्द झाला. हा अभ्यास सांगतो की खोबर्‍याच्या तेलात सूक्ष्म जीवाणूविरोधी आणि सूज कमी करणारे घटक आहेत. एटॉपिक डर्मेटाइटिस या त्वचा विकारावरही खोबर्‍याचं तेल उपयुक्त मानलं गेलं आहे. त्वचा मॉश्चराइज करण्यासोबतच खोबर्‍याच तेल त्वचेला दाह किंवा सूर्याच्या अति नील किरणांपासून सुरक्षित ठेवतं. खोबर्‍याच्या तेलाचा उपयोग सौंदर्य जपण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो. त्वचेसाठी खोबर्‍याचं तेल वापरुन अनेक फायदे मिळवता येतात.

 

 

त्वचेसाठी खोबर्‍याचं तेल फायदेशीर कसं?

*  खोबर्‍याचं तेल चेहेर्‍यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी फायदेशीर असतं. त्वचेतील कोलॅजनचं ( एक प्रकारचं प्रथिनं) प्रमाण कमी झालं की त्वचेवर सुरकुत्या पडतात. एका संशोधनात खोबर्‍याच्या तेलाचा उपयोग कोलॅजन निर्मिती वाढवण्यासाठी झालेला दिसून आला . म्हणूनच चेहेर्‍यावर सुरकुत्या पडू नये म्हणून खोबर्‍याच्या तेलाचा उपयोग करण्याचा सल्ला दिला जातो.

*  चेहेर्‍यावरील मृत त्वचा आणि वातावरणातील प्रदूषित घटक यामुळे चेहेर्‍यावर डाग पडतात. हे डाग खोबर्‍याच्या तेलानं जातात. एका अभ्यासात खोबर्‍याच्या तेलात क्लीजिंग घटक असतात. त्यामुळेच खोबर्‍याच्या तेलाच्या मदतीने चेहेर्‍याच्या त्वचेवरील घाण, मृत पेशी निघून जातात. आणखी एक अभ्यास सांगतो की खोबर्‍याच्या तेलाचा उपयोग करुन तयार केलेल्या साबणाद्वारे चेहेर्‍यावरचे काळे डाग जातात.

*  त्वचेतला ओलावा कमी झाला की त्वचा कोरडी, रखरखीत आणि निस्तेज होते. खोबर्‍याच्या तेलामुळे त्वचा ओलसर राहाते. त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. शिवाय खोबर्‍याच्या तेलानं रखरखीत त्वचा मऊ मुलायम होतो.

* प्रसूतीनंतर पोटावरील स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी खोबर्‍याच्या तेलाचा उपयोग होतो. खोबर्‍याच्या तेलानं स्ट्रेच मार्कवर मसाज केल्यास ते कमी होतात.

 

 

* अकन्थोसिस निगरिकन्स या समस्येमुळे त्वचा काळी पडते. चेहेर्‍यावर मोठ मोठे काळे डाग पडतात. ही समस्या कमी करण्यासाठी खोबर्‍याच्या तेलाचा उपयोग होतो हे एका अभ्यासातून दिसून आलं आहे. त्यामुळेच त्वचा उजळवण्यासाठी खोबर्‍याच्या तेलाचा वापर करण्यास सांगितला जातो.

* खोबर्‍याच्या तेलात क्लीजिंग आणि फोमिंग हे गुणधर्म असतात. त्यामुळे मेकअप रिमूवर म्हणूनही खोबर्‍याचं तेल वापरावं. याच गुणधर्मामुळे डोळ्यांचा मेकअप काढणार्‍या उत्पादनांमधेही खोबर्‍याच्या तेलाचा उपयोग केला जातो.

*  डोळ्याखालची काळी वर्तुळं ही मोठी सौंदर्य समस्या आहे. खोबर्‍याच्या तेलाच्या उपयोगानं ही काळी वर्तुळं कमी होतात. खोबर्‍याच्या तेलात ई जीवनसत्वं असतं. आणि काळी वर्तुळ कमी करण्यासाठी ई जीवनसत्त्वं महत्त्वाचं असतं. म्हणून डोळ्याखालची काळी वर्तुळ घालवण्यासाठी खोबर्‍याच्या तेलाचा उपयोग केला जातो.

* खोबर्‍याच्या तेलात सूजविरोधी घटक असतात. त्यामुळेच चेहेर्‍यावरची किंवा डोळ्याखालची सूज कमी करण्यासाठी खोबर्‍याच्या तेलाचा उपयोग होतो.

* ओठ मऊ मुलायम करण्यासाठी खोबर्‍याच्या तेलाचा उपयोग होतो. कारण खोबर्‍याच्या तेलानं त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. त्वचा मॉश्चराइज होते. शिवाय त्वचेवरील लिपिडचा थर राखण्याचं काम खोबर्‍याचं तेल करतं. याच गुणांमुळे ओठांची काळजी घेण्यासाठी खोबर्‍याचं तेल वापरलं जातं.

 

 

खोबर्‍याचं तेल कसं वापरावं?

ज्यांची त्वचा कोरडी आणि रखरखीत असते त्यांनी त्वचेची काळजी घेण्यासाठी खोबर्‍याचं तेल वापरावं. चेहेरा आधी धुवून स्वच्छ करावा. मग जितकं आवश्यक आहे तितकं किंवा फक्त चमचाभर तेल घेऊन ते हातावर चोळून घ्यावं. आणि मग ते चेहेरा आणि मानेला हलका मसाज करत लावावं. मसाज करुन तेल त्वचेत जिरतं. जे जिरत नाही ते टिश्यू पेपरनं हलक्या हातानं पुसुन घ्यावं. चेहेर्‍याची त्वचा मऊ मुलायम होण्यासाठी नाइट क्रीम ऐवजी खोबर्‍याचं तेल वापरावं. खोबर्‍याच्या तेलानं मसाज केल्यास चेहेर्‍याची त्वचा घट्ट होते. त्यावर सुरकुत्या पडा नाही. शिवाय हाता पायांनाही खोबर्‍याच्या तेलाचा मसाज केल्यास तेही मऊ राहातात. रात्री तेलाचा मसाज केल्यावर ते तसंच राहू द्यावं आणि सकाळी चेहेरा पाण्यानं धुवावा.