Join us  

घरच्याघरी करा गोल्डन ब्लीच, मिळवा पार्लरसारखा ग्लो! ब्लिचमुळे होणारा त्रासही कमी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2022 8:33 PM

विकतचं ब्लीच घरी आणून ते चेहऱ्याला लावणं म्हणजे घरच्याघरी ब्लीच करणं नव्हे..अशा ब्लिचमुळे तोटेच जास्त! घरच्याघरी गोल्डन ब्लीच करुन पार्लरसारखा ग्लो मिळवता येतो. 

ठळक मुद्दे विकतच्या ब्लीचचे त्वचेवर होणारे दुष्परिणाम घरगुती ब्लीचमुळे टाळले जातात. घरच्याघरी नैसर्गिक घटकांनी तयार केलेल्या ब्लिचचा प्रभाव जास्त काळ टिकतो.

आपली त्वचा धूळ, माती, वातावरण यामुळे खराब होते. त्वचेची काळजी घेण्यात कंजुषीपणा केल्यास, दुर्लक्ष केल्यास खराब होते. यासाठी पर्याय म्हणजे ब्यूटी पार्लरमधे जाऊन ब्लीच- फेशिअल करणं. घरच्याघरी छान फेशिअल करता येतं तसंच घरच्याघरी ब्लीच देखील करता येतं . विकतचं ब्लीच घरी आणून ते चेहऱ्याला लावणं म्हणजे घरच्याघरी ब्लीच करणं नव्हे.. अशा ब्लिचमुळे चेहरा सुंदर दिसतो तो तात्पुरता पण त्वचेवर त्याचे वाईट परिणाम होतात, यामुळे त्वचा आणखीनच खराब होते. पार्लरमधे ब्लीच करतानाही त्वचेला त्रास होतो. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांना तर पार्लरमधलं ब्लीचही चालत नाही. घरच्याघरी ब्लीच करुन त्वचा डागरहित, नितळ आणि मऊ-मुलायम करण्यासाठी सौंदर्य तज्ज्ञ पुजा गोयल यांनी सांगितला आहे. 

Image: Google

कसं करायचं घरच्याघरी ब्लीच

सौंदर्य तज्ज्ञ पुजा गोयल म्हणतात, की घरच्याघरी ब्लीच केल्यास ब्लीच मधील रासायनिक घटकांचे त्वचेवर होणारे दष्परिणाम टाळता येतात. तसेच घरच्या घरी नैसर्गिक घटकांचा वापर करुन ब्लीच केल्यास त्याचा प्रभाव दीर्घकाळापर्यंत चेहऱ्यावर टिकतो.

Image: Google

पुजा यांनी सांगितल्याप्रमाणे घरच्याघरी ब्लीच करण्यासाठी मुलतानी माती, मध, बटाट्याचा रस, लिंबू  या घटकांचा वापर करायला हवा.  घरच्याघरी गोल्डन ब्लीचसाठी एका खोलगट वाटीत 1 चमचा मुलतानी माती घ्यावी. त्यात  3-4 थेंब लिंबाचा रस आणि थोडं मध घालावं. नंतर बटाटा किसून त्याच रस काढावा आणि तो मुलतानी मातीच्या मिश्रणात घालावा.  मिश्रण नीट मिसळून घ्यावं. चेहरा स्वच्छ धुवावा. रस काढलेला बटाट्याचा कीस घ्यावा. तो कीस संपूर्ण चेहऱ्याला हलक्या हातानं घासावा. मग अर्धा तास थांबावं. मग तयार केलेलं ब्लीचचं मिश्रण चेहऱ्याला लावावं.ब्लीचचं मिश्रण चेहऱ्याला लावल्यानंतर 15 मिनिटं थांबावं. मग सुती रुमाल ओला करुन त्याने चेहरा पुसून घ्यावा. नंतर चेहरा पाण्यानं धुवावा. चेहरा कोरड्या रुमालानं टिपून घ्यावा. चेहऱ्याला रसायनविरहित माॅश्चरायझर लावावं.

Image: Google

घरच्याघरी ब्लीच केल्यास..

1. घरच्याघरी वरील पध्दतीने ब्लीच केल्यास त्वचा उजळते. स्वच्छ होते. ब्लीचचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो.2.  यातील मुलतानी मातीमुळे चेहऱ्याच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जातं. त्यामुळे मुरुम पुटकुळ्या येत नाही. 3.  मुलतानी माती आणि लिंबाच्या रसातील गुणधर्मांच्या एकत्रित संयोगामुळे चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात. बटाट्याच्या रसात नैसर्गिक ब्लीचिंगचे गुणधर्म असतात. त्यामुळे हे ब्लीच वापरुन त्वचेस जास्त फायदा होतो.

Image: Google

4. निस्तेज त्वचा ताजी टवटवीत होते. चेहऱ्याचा काळवंडलेपणा कमी होतो. 5. मधामुळे त्वचेला ब्लीच करुनही आर्द्रता मिळते. मधामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाही.   

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडी