त्वचेची काळजी घेण्यासाठी केवळ दिवसाचं स्किन केअर रुटीन पाळून पुरेसं नसतं . रात्री त्वचेची काळजी घेण्यासाठी काय करता हे देखील तितकंच महत्वाच असतं. दिवसा चेहरा स्वच्छ ठेवणं, त्वचेची काळजी घेणारे वेगवेगळे क्रीम्स- लोशन लावणं हे नियम पाळले जातात आणि रात्री झोपण्याआधी साधा चेहराही न धुणं, चेहऱ्याला काहीही न लावता झोपणं या चुकीच्या सवयीमुळे क त्वचा खराब होते. रात्री चेहरा धुतल्यानंतर आपल्या त्वचेस योग्य अशी नाइट क्रीम लावणं आवश्यक असतं. पण ही नाइट क्रीम विकतच आणायला हवी असा काही आग्रह नाही. घरच्याघरी नाइट क्रीम तयार करता येते. बदाम, सफरचंद आणि संत्री यांचा वापर करत 3 प्रकारचे नाइट क्रीम सोप्या पध्दतीनं तयार करता येतात.
Image: Google
बदाम नाइट क्रीम
कोरड्या त्वचेसाठी बदाम नाइट क्रीम लावणं योग्य. ही क्रीम तयार करण्यासाठी 1 चमचा बदामाचं तेल, 1 चमचा मध, 2 चमचे गुलाब पाणी आणि 2 चमचे कोकोआ बटर घ्यावं. एका मोठ्या भांड्यात बदामाचं तेल आणि कोकोआ बटर एकत्र करुन ते गरम करावं. बटर वितळवून घ्यावं. कोकोआ बटर वितळलं की गॅस बंद करावा. नंतर यात गुलाब पाणी आणि मध घालावं. मिश्रण नीट मिसळून घ्यावं. हे मिश्रण फ्रिजमध्ये थंड होण्यास ठेवावं. 3- 4 तासात बदाम तेलापासूनचं हे नाइट क्रीम तयार होतं. हे क्रीम हवाबंद डब्यात काढून फ्रिजमध्ये ठेवावं. बदाम तेलाचं नाइट क्रीम लावल्यानं त्वचा ओलसर राहाण्यासोबतच माॅश्चराईजही होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या , डोळ्याखालील काळी वर्तुळं घालवण्यासाठी , तरुण दिसण्यासाठी या क्रीमचा उपयोग होतो. बदाम तेलाच्या नाइट क्रीममुळे त्वचा लवचिक होते.
Image: Google
ॲपल नाइट क्रीम
ॲपल नाइट क्रीम तयार करण्यासाठी 5 मोठे चमचे गुलाब पाणी, 2 मध्यम आकाराचे सफरचंद, 1 छोटा चमचा ऑलिव्ह ऑइल घ्यावं. क्रीम तयार करण्यासाठी आधी सफरचं धुवून पुसून घ्यावं. सफरचंदाची सालं काढून बारीक तुकडे करावेत. हे तुकडे ऑलिव्ह ऑइल घालून मिक्सरमधून बारीक वाटावेत. एक भांडं घ्यावं. ते गरम करावं. त्यात सफरचंदाचं वाटलेलं मिश्रण घालावं. मंद आचेवर सफरचंदाचं मिश्रण गरम करुन घ्यावं. ते गरम झाल्यावर गॅस बंद करावा. थोड्या वेळानं यात गुलाब पाणी घालावं. ते चांगलं मिसळून घ्यावं. हे क्रीम नंतर हवाबंद डब्यात काढून फ्रिजमध्ये ठेवावं. हे क्रीम 6-7 दिवस फ्रिजमध्ये ठेवता येतं. ॲपल नाइट क्रीममुळे त्वचा उजळून त्वचेवर चमक येते.
ऑरेंज नाइट क्रीम
ऑरेंज नाइट क्रीम तयार करण्यासाठी 4 चमचे संत्र्याचं तेल, 2 संत्रीची साल, 2 चमचे पेट्रोलियम जेली आणि 2 चमचे ग्लिसरीन घ्यावं. हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरमधून वाटून घ्यावं. हे क्रीम एका डब्बीत भरुन ठेवावं. डब्बी फ्रिजमध्ये ठेवली तरी चालते. ऑरेंज नाइट क्रीम लावल्यानं चेहऱ्यावर ग्लो येतो. चेहऱ्यावरील डाग, मुरुम , पुटकुळ्या निघून जातात. चेहऱ्यावरील सुरकुत्या या नाइट क्रीमनं कमी होतात.