Lokmat Sakhi >Beauty > दिवाळीसाठी घरच्याघरी करा सुगंधी उटणे, हे घ्या उटण्याचे 9 सुंदर प्रकार

दिवाळीसाठी घरच्याघरी करा सुगंधी उटणे, हे घ्या उटण्याचे 9 सुंदर प्रकार

उटणं बाहेरुन विकत आणण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारचे उटणे घरीच करुन ते लावले तर त्वचा नैसर्गिकपणे सुंदर होण्यास मदत मिळते. घरच्याघरी आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार आणि गरजेनुसार उटणं तयार करणं अवघड नाही. शहनाझ हुसेन यांनी 9 प्रकारचे उटणे तयार करण्याची सोपी पध्दत सांगितली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 06:46 PM2021-10-23T18:46:18+5:302021-10-23T18:52:28+5:30

उटणं बाहेरुन विकत आणण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारचे उटणे घरीच करुन ते लावले तर त्वचा नैसर्गिकपणे सुंदर होण्यास मदत मिळते. घरच्याघरी आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार आणि गरजेनुसार उटणं तयार करणं अवघड नाही. शहनाझ हुसेन यांनी 9 प्रकारचे उटणे तयार करण्याची सोपी पध्दत सांगितली आहे.

Make ubtan at home for Diwali, here are 9 beautiful types of homemade ubtans | दिवाळीसाठी घरच्याघरी करा सुगंधी उटणे, हे घ्या उटण्याचे 9 सुंदर प्रकार

दिवाळीसाठी घरच्याघरी करा सुगंधी उटणे, हे घ्या उटण्याचे 9 सुंदर प्रकार

Highlightsसंत्री-लिंबाच्या सालाचं उटणं सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उत्तम आहे. कमळाच्या फुलांच्या उटण्यानं त्वचेचा कोरडेपणा आणि उन्हानं आलेला काळसरपणा निघून जातो.उन्हानं काळवंडलेला चेहरा स्वच्छ होण्यास्साठी, त्वचा चमकदार होण्यासाठी काकडी आणि पपईचं उटणं लावावं.ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांनी मुगाच्या डाळीचं उटणं अवश्य लावावं.

दिवाळी तोंडावर आहे. दिवाळीच्या खरेदीत आवर्जून उटण्याची खरेदी केली जाते. दिवाळीत अभ्यंग स्नानाला अंगाला तिळाचं तेल आणि उटणं लावून आंघोळ करण्याची पध्दत आहे. पण प्रसिध्द सौंदर्यतज्ज्ञ शहनाझ हुसेन म्हणतात की उटणं हे फक्त दिवाळीतच लावावं हा काही नियम नाही. तसेच उटणं बाहेरुन विकत आणण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारचे उटणे घरीच करुन ते लावले तर त्वचा नैसर्गिकपणे सुंदर होण्यास मदत मिळते. घरच्याघरी आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार आणि गरजेनुसार उटणं तयार करणं अवघड नाही. शहनाझ हुसेन यांनी 9 प्रकारचे उटणे तयार करण्याची सोपी पध्दत सांगितली आहे. ती वाचून यंदा घरीच उटणं करण्याची इच्छा नक्कीच होईल.

शहनाझ हुसेन म्हणतात, त्वचेला काही मिनिटात मऊ मुलायम करण्यासाठी घरगुती उटणं तयार करणं हाच योग्य उपाय आहे. अजून दिवाळीला थोडे दिवस बाकी आहेत. दिवाळीपर्यंत आपल्या त्वचेचा पोत सुधारण्याची ही उत्तम संधी आहे. उटण्यानं त्वचा सुधारता येते, त्यासाठी नऊ प्रकारचे उटणे आहेत महत्त्वाचे .

Image: Google

घरगुती उटण्याचे 9 प्रकार

1. पारंपरिक हळदी बेसनाचं उटणं: हे उटणं तयार करण्यासाठी गव्हाचा कोंडा ( गव्हाचं पीठ चाळून घ्यावं. जे उरतं तो असतो गव्हाचा कोंडा.) बेसन, दही किंवा दूध आणि हळद घ्यावी. साहित्य एक चमचा या प्रमाणात घेतलं तरी चालतं नाहीतर अंदाजानं घ्यावं. हे सर्व साहित्य एका वाटीत एकत्र करुन ते चांगले एकजीव करावं. आधी संपूर्ण अंगाला तिळाचं तेल लावून मॉलिश करुन घ्यावी. नंतर अंगाला उटणं लावावं. उटणं अंगाला लावल्यावर दहा ते पांधरा मिनिटं ते राहू द्यावं. हातावर थोडं पाणी घेऊन हलक्या हातानं अंगाला लावलेल्या उटण्याच्या सहाय्यानं हलका मसाज करावा. आणि नंतर अंगावर कोमट पाणी घेऊन आंघोळ करावी. या उटण्यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते. हे उटणं लावून आंघोळ केल्यानं त्वचेचं उत्तम क्लीन्जिंग होतं. तसेच चेहेर्‍यावरची मृत त्वचा निघून जाते आणि त्वचा चमकदार होते.

2. संत्री-लिंबाच्या सालाचं उटणं: शहनाझ हुसेन म्हणतात की, हे उटणं सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उत्तम आहे. हे उटणं तयार करण्यासाठी एक चमचा उन्हात सुकवलेल्या संत्र्याच्या लिंबाच्या सालाची पावडर, एक चमचा ओटस आणि एक चमचा वाटलेले बदाम घ्यावेत. यात प्रत्येकी एक चमचा मध, दही आणि गुलाब पाणी घालावं. हे उटणं आधी त्वचेवर लावावं. आणि मग लावलेल्या उटण्याच्या सहाय्यानं चेहेर्‍याची आणि शरीराची गोलाकर मसाज करावी. दहा ते पंधरा मिनिटं अंगाला उटण्यानं मालिश करुन नंतर कोमट पाण्यानं आंघोळ अरावी. या उटण्यानं त्वचा एकदम स्वच्छ होते.

Image: Google

3. ओटसचं उटणं: कोरडी त्वचा असलेल्यांसाठी हे उटणं परिणामकारक. हे उटणं तयार करण्यासाठी एका वाटीत एक चमचा ओटस घ्यावेत, त्यात मध, दूध आणि बदामाच्या तेलाचे काही थेंब घालावेत. हे उटणं चांगलं एकजीव करुन घ्यावं आणि मग चेहेर्‍याला लावावं. 15 मिनिटानंतर हातावर थोडं दूध घेऊन त्यानं उटणं लावलेल्या चेहेर्‍याचीा हलक्या हातानं मसाज करावा. त्यानंतर कोमट पाण्यानं आंघोळ करावी.

4. कोरफडीचं उटणं: कोरफडीचा गर म्हणजे उत्तम मॉश्चरायझर मानलं जातं. यात शरीरावरच्या जखमा लवकर भरुन आराम देणारा झिंक हा घटक असतो. हे उटणं तयार करण्यासाठी एक चमचा ओटस किंवा मुलतानी माती घ्यावी. त्यात एक चमचा संत्र्याच्या सालांची पावडर आणि दही घालावं. ते चांगलं एकजीव करावं. नंतर त्यात एक मोठा चमचा अँलोवेरा जेल किंवा कोरफड गर घालून मिर्शण पुन्हा एकजीव करावं. हे उटणं चेहेर्‍याला अर्धा तास लावून ठेवावं आणि मग चेहेरा कोमट पाण्यानं धुवावा.

5. स्ट्रेच मार्कसाठी उटणं: स्ट्रेच मार्क घालवण्यासाठी उटणं हा उत्तम पर्याय आहे. आधी शरीरावर जिथे जिथे स्ट्रेच मार्क्‍स आहेत तिथे ऑलिव्ह तेलानं मसाज करावा. नंतर एका भांड्यात बेसन, दही आणि हळद घालून त्याचा लेप तयार करावा. हा लेप शरीराला जिथे स्ट्रेच मार्क्‍स आहे तिथे लावून थोडा वेळ तसाच ठेवावा. नंतर पाणी हातात घेऊन लावलेल्या उटण्यानं हलका मसाज करावा. कोमट पाण्यानं चेहरा स्वच्छ करावा.

Image: Google

6. कमळाच्या फुलांचं उटणं: फुलांचं उटणं तयार करण्यासाठी 3 ते 4 मोठे चमचे गरम दूध घ्यावं. त्यात ही फुलं एक तासासाठी भिजवावीत. एका तासानंतर ही फुलं बोटांच्या सहाय्यानं कुस्करावीत. नंतर यात तीन चमचे बेसन पीठ घालून पेस्ट तयार करावी. हे उटणं चेहेर्‍याला आणि हाताला लावावं. उटणं लावताना ओठांना किंवा डोळ्यांना लागणार नाही याची काळजी घ्यावी. उटणं लावल्यानंतर 20 मिनिटांनी चेहरा धुवावा. कमळाच्या फुलांच्या उटण्यानं त्वचेचा कोरडेपणा आणि उन्हानं आलेला काळसरपणा निघून जातो.

7. गुलाबाचं उटणं: मूठभर गुलाबाच्या पाकळ्या घ्याव्यात. त्या मिक्सरमधून बारीक वाटून घ्याव्यात. ही पेस्ट एका वाटीत काढून त्यात दोन चमचे दही, मध आणि चंदन पावडर घालावी. हे सर्व घटक मिसळून घ्यावेत . नंतर त्यात 3 मोठे चमचे सुकवलेल्या संत्र्याच्या सालाची पावडर घालावी. ती नीट मिसळून घ्यावी. ह लेप चेहेर्‍याला आणि हाताला लावावा. 15 ते 20 मिनिटं तो तसाच राहू द्यावा. नंतर हात पाण्यानं ओले करुन हळुवार मसाज करावा. मसाज झाल्यानंतर चेहेरा आणि हात कोमट पाण्यानं धुवावेत. हे उटणं प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी उत्तम मानलं जातं. या उटण्यानं दिवसभर अंगाला मंद सुंगंध येतो आणि चेहेर्‍यावरील मुरुम पुटकुळ्याही जातात.

8. काकडी आणि पपईचं उटणं: उन्हानं काळवंडलेला चेहरा स्वच्छ होण्यास्साठी, त्वचा चमकदार होण्यासाठी काकडी आणि पपईचं उटणं लावावं. यासाठी थोडी काकडी किसून घ्यावी. पपई चिरुन पपईचा गर घ्यावा. यात दोन मोठे चमचे ओटस आणि अर्धा चमचा हळद घालावी. यात लिंबाचा रस आणि गुलाब पाणी घालून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहरा, हात, मान यास लावावी. अध्र्या तासानंतर थोडं पाणी हातावर घेऊन लावलेल्या उटण्याच्या सहाय्यानं हलका मसाज करावा. कोमट पाण्यानं आंघोळ करावी. यामुळे चेहेर्‍यावरचा काळवंडलेपणा दूर होवून त्वचा चमकदार होते.

Image: Google

9. मूग डाळीचं उटणं: शहनाझ हुसेन म्हणतात, ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांनी मुगाच्या डाळीचं उटणं अवश्य लावावं. हे उटणं तयार करण्यासाठी चार मोठे चमचे मुगाची डाळ रात्रभर पाण्यात भिजवावी. सकाळी त्यातलं पाणी काढून डाळ वाटून घ्यावी. त्यात दही, चिमूटभर हळद आणि एक मोठा चमचा टमाट्याचा गर घालावा. हे सर्व साहित्य चांगलं एकजीव करुन घ्यावं. हे उटणं चेहेर्‍याला गोलाकार मसाज करत लावावं. 20 मिनीटं ते चेहेर्‍यावर तसंच राहू द्यावं. आणि नंतर कोमट पाण्यानं चेहेरा धुवावा. या उटण्यामुळे चेहेर्‍याच्या त्वचेवरील तेल नियंत्रित होतं आणि त्वचाही चमकदार होते. 

Web Title: Make ubtan at home for Diwali, here are 9 beautiful types of homemade ubtans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.