हिवाळ्यात आपली त्वचा हवेतील कोरडेपणामुळे कोरडी पडते. अशावेळी त्वचा तडतडते, आग होते त्यामुळे मॉईश्चरायजर किंवा कोल्ड क्रिम लावल्याशिवाय आपल्याला बरे वाटत नाही. अशावेळी मेकअप केला तरी त्वचा तडतडते आणि या उत्पादनांमुळे चेहरा आणखी कोरडा आणि रखरखीत दिसायला लागतो. थंडीमुळे ओठही फुटलेले असल्याने ओठांची सालपटे निघतात आणि अशात आपण लिपस्टीक लावली तर हे ओठ आणखीनच कोरडे पडण्याची शक्यता असते. मात्र हिवाळ्याचा काळ हा लग्नसराईचा सिझन असल्याने लग्नाला आणि इतर कार्यक्रमांना जाताना आपल्याला मेकअप तर करावाच लागतो. थंडीच्या दिवसांत केलेला मेकअप विचित्र दिसू नये आणि चेहरा छान एकसारखा दिसावा यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्यास थंडीतही मेकअप करुन आपण छान दिसू शकतो. पाहूयात यासाठी नेमकं काय करायचं (Make up tips for dry skin in winter season)...
१. एरवी आपण मेकअप करताना चेहऱ्याला मॉईश्चरायजर लावतोच असे नाही. पण थंडीच्या दिवसांत मेकअप करताना सगळ्यात आधी चेहऱ्याला न विसरता जास्त प्रमाणात मॉईश्चरायजर लावावे. त्यामुळे चेहऱ्याची आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते आणि चेहऱ्यावर मेकअप चांगला बसतो.
२. ज्या दिवशी आपल्याला लग्नाला किंवा एखाद्या कार्यक्रमाला जायचे असेल त्याच्या १ ते २ दिवस आधी चेहरा मऊ होण्यासाठी रात्री झोपताना चेहऱ्याला कोरफडीचा गर किंवा साय लावावी. ज्यामुळे त्वचा मऊ पडण्यास मदत होते आणि चेहऱ्यावर मेकअप चांगला बसतो.
३. एरवी आपण मेकअप करताना पावडर आणि ब्लशर असा पावडर बेस गोष्टींचा वापर करतो. पण अशा गोष्टींमुळे चेहरा आहे त्याहून जास्त कोरडा पडण्याची शक्यता असते. म्हणून थंडीत मेकअप करताना जेल बेस किंवा लिक्विड बेस उत्पादनांचा जास्तीत जास्त वापर करायला हवा.
४. ओठांचा मेकअप करताना ओठांना आधीपासून तूप किंवा लिप बाम लावून ठेवावे. जेणेकरुन ओठांना लिपस्टीक लावताना ओठ कोरडे पडत नाहीत आणि त्याची सालपटेही निघत नाहीत. तसेच लिपस्टीक लावण्याच्या आधी आणि नंतर ओठांना आठवणीने लिप बाम लावल्यास ओठांचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.