मुरुम पुटकुळ्या या चिवट सौंदर्य समस्या बर्या होण्यासाठी पहिला उपाय म्हणजे आपला चेहेरा नीट स्वच्छ करणं. चेहेरा स्वच्छ करताना त्वचेवरची रंध्र खोलवर स्वच्छ व्हायला हवीत. चेहेरा स्वच्छ करण्यासाठी आंघोळीचा साबण सर्वात हानिकारक मानला जातो. यामुळे त्वचा कोरडी होते. म्हणूनच सौम्य पण प्रभावी फेसवॉशनं चेहेरा स्वच्छ करण्याचा सल्ला दिला जातो. पण केवळ किंमतीकडे बघून फेसवॉश घेण्याचं टाळलं जातं. यावर एक प्रभावी उपाय म्हणजे घरच्याघरी नैसर्गिक घटकांपासून फेसवॉश तयार करणं. एकतर यातील नैसर्गिक घटक त्वचा खोलवर स्वच्छ करतात आणि त्वचेचं पोषण करण्यासही सहाय्यभूत ठरतात. घरच्याघरी नैसर्गिक घटकांचा वापर करुन तीन प्रकारचे फेसवॉश अगदी सहजपणे तयार करुन वापरता येतात.
घरच्याघरी फेसवॉश
छायाचित्र:- गुगल
1. कॉफी आणि तांदळाचा फेसवॉश
हा फेसवॉश तयार करण्यासाठी एक छोटा चमचा कॉफी पावडर आणि एक छोटा चमचा तांदळाचं पीठ घ्यावं. ते दोन्ही एकत्र करावं. त्यात गुलाब पाणी टाकून त्याची मऊसर पेस्ट तयार करावी.
ही पेस्ट चेहेर्याला लावावी आणि दोन ते तीन मिनिट चेहेर्याचा मसाज करावा.चेहेरा नंतर थंड पाण्यानं धुवावा.
या फेसवॉशचा वापर केल्यानं तांदळाच्या पिठाचा आणि कॉफीचा फायदा त्वचेस होतो. तांदळाचं पिठ चेहेर्यावरचं अतिरिक्त तेल शोषून घेतं तर कॉफी पावडर स्क्रबसारखं काम करते. यामुळे चेहेर्यावरील मृत पेशी निघून जातात आणि चेहेर्याची त्वचा स्वच्छ आणि मऊ होते.
2. कणिक आणि बेसनाचा फेसवॉश
छायाचित्र:- गुगल
हा फेसवॉश तयार करताना एक छोटा चमचा कणिक आणि एक चमचा बेसन पीठ घ्यावं. दोन्ही एकत्र करुन त्यात गुलाब पाणी/ साधं पाणी किंवा दूध घालून मऊसर पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहेर्यास आणि मानेस लावावी आणि किमान दोन मिनिट हलक्या हातानं मसाज करावा. मसाज करुन झाल्यानंतर पाच मिनिटं थांबावं आणि नंतर चेहेरा पाण्यानं धुवावा.
कणिक आणि बेसन दोन्हीं उत्तम क्लीन्जर म्हणून ओळखले जातात. दोन्हींचा फायदा चेहेर्यावरील घाण स्वच्छ होण्यास होतो. तसेच या दोन्हीतील गुणधर्मांमुळे त्वचा निरोगी राहाते.
3. मध आणि चंदनाचा फेसवॉश
छायाचित्र:- गुगल
हा फेसवॉश करताना एक छोटा चमचा मध आणि एक छोटा चमचा चंदनाची पावडर घ्यावी. दोन्ही एकत्र करुन पेस्ट तयार करावी. आधी चेहेरा ओला करुन घ्यावा. मग चेहेर्यावर ही पेस्ट मसाज करत लावावी. दोन ते तीन मिनिटं हलक्या हातानं चेहेर्यास मसाज करावा. मसाज झाल्यानंतर पाच दहा मिनिटांनी चेहेरा थंड पाण्यानं धुवावा.
या फेसवॉशमधील मधामुळे त्वचा मॉश्चराइज होते शिवाय चेहेर्यावरील मुरुम पुटकुळ्याही कमी होतात. तर चंदन पावडरमुळे त्वचेला थंडावा मिळतो.