गौरी-गणपती म्हणजे छान नटून थटून मिरवण्याचे दिवस. आपल्या घरात गौरी-गणपती असतील तर किंवा आपल्याला कोणाकडे जायचे असेल तर आपण छान आवरुन-तयार होऊन जातो. सगळ्यांमध्ये आपण छान उठून दिसावे असे आपल्याला वाटत असते. यासाठी आपण छानसे कपडे, दागिने, हेअरस्टाईल अशा सगळ्या गोष्टींची तयारी करतो. पण मेकअपमधील मात्र आपल्याला काहीच कळत नाही. अशावेळी घाईघाईत आपण काजळ आणि लिपस्टीक किंवा आय लायनर आणि लिपस्टीक लावतो आणि बाहेर पडतो (How to get Ready for Ganpati in 10 Mins). मात्र मेकअपच्या काही सोप्या स्टेप्स आपल्याला माहित असतील तर आपण आहोत त्याहून आणखी छान दिसू शकतो. पाहूया अशाच काही मेकअपच्या सोप्या टिप्स (Makeup Tips For Ganpati Festival)...
१. चेहरा स्वच्छ हवा - क्लींजर
मेकअप करताना सर्वात आधी आपला चेहरा साफ करणे गरजेचे आहे. अन्यथा चेहऱ्यावर धुळीचे किंवा अन्य कसले कण राहून चेहऱ्याला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. म्हणूनच सगळ्यात आधी चेहरा चांगल्या क्लीन्जरने स्वच्छ करावा. बाजारात वेगवेगळी क्लींजर मिळतात, त्यातील आपल्याला सूट होणारे एखादे क्लींजर निवडावे. बाजारातील केमिकल असलेली क्लींजर वापरायची नसतील तर कच्च्या दुधाचाही वापर करता येतो.
२. त्वचेत ओलावा राहण्यासाठी - सीरम किंवा मॉइश्चरायजर
त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी सीरम अतिशय गरजेचे असते. सीरममुळे त्वचा मेकअपसाठी तयार होते आणि त्वचेला एक चांगला बेस मिळतो. सीरम नसेल तर एखादं मॉइश्चरायजरही आपण त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी लावू शकतो. आपल्या त्वचेच्या पोतनुसार चांगलं मॉइश्चरायजर निवडावं.
३. मेकअप बेस तयार करण्यासाठी - प्रायमर आणि फाऊंडेशन
मेकअप चेहऱ्यावर नीट बसावा यासाठी त्वचेला प्रायमर लावणं गरजेचं असतं. आपली त्वचा कोरडी असेल तर ऑईल बेस आणि त्वचा तेलकट असेल तर वेगळा प्रायमर मिळतो. त्यानंतर ठिपक्यांनी चेहऱ्यावर लिक्वीड फाऊंडेशन लावावे. आपल्या त्वचेचा पोत लक्षात घेऊन फाऊंडेशन लावायला हवे. ते योग्य प्रमाणात लावले तरच चेहरा चांगला दिसतो. यावर तुम्ही थोडी फाऊंडेशन पावडर लावून ती ब्रशने सगळीकडे एकसारखी फिरवू शकता.
४. डोळे हायलाईट होण्यासाठी- आय मेकअप
डोळे उठून दिसण्यासाठी डोळ्यांचा मेकअप अतिशय गरजेचा असतो. यामध्ये आयशॅडो, आयलायनर आणि मग मस्कारा अशा क्रमाने डोळ्यांना हायलाईट करावे. आयशॅडो आणि आयलायनर यांचे रंग आपल्या कपड्यांच्या रंगानुसार ठरवू शकतो.
५. सगळ्यात शेवटची पण महत्त्वाची स्टेप - लिपस्टीक
ही स्टेप सगळ्यात शेवटची असली तरी सगळ्यात महत्त्वाची असते. आधी लिपबाम लावावे. त्यानंतर लिपलायनरने ओठांना छानसा आकार द्यावा. मग आपल्याला आवडणारी किंवा आपल्या कपड्यांना सूट होईल अशी एखादी छानशी लिपस्टीक लावावी. हीच लिपस्टीक थोडीशी बोटाला लावून ती गालावर पसरावी.