पावसाळा आला की सगळ्यात आधी वेध लागतात बाहेर फिरायला जाण्याचे. पावसात भिजणे, धबधब्याच्या पाण्यात खेळणे, हीच तर आहे पावसाळ्याची खरी मजा. पाऊसात भिजायला, पाण्यात खेळायलाच तर जायचेय, त्यात काय मेकअप हवा, असं म्हणण्याचा ट्रेण्ड आता कधीचाच बाद झालाय. त्यामुळे पावसाळ्यात फिरायला जाताना तुम्हाला स्पेशल मान्सून मेकअप करायला हवा. जेणेकरून पावसात कितीही भिजलं तरीही मेकअप चेहराभर पसरणार नाही आणि चेहरा फ्रेशच राहील.
पावसाळ्याची खरेदी करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आयलायनर, काजळ, मस्कारा या सगळ्या गोष्टी वॉटरप्रुफच असायला हव्या.
फॉलो करा या मेकअप टिप्स
१. मेकअपला सुरूवात करण्याआधी बर्फाने चेहऱ्याला ५ ते १० मिनिटे मसाज करा. यामुळे त्वचा तजेलदार होईल आणि मेकअप जास्त काळ टिकून राहील.
२. यानंतर ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांनी ॲस्ट्रेंजंट आणि ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनी टोनर लावावे. यानंतर सनस्क्रीन लोशन लावा.
३. पावसात फिरायला जायचे असल्यास आणि आपण हमखास ओले होणार हे माहिती असल्यास फाउंडेशन लावू नका. त्याऐवजी मेकअप बेस म्हणून थेट कॉम्पॅक्ट पावडरचा वापर करा
४. फाउंडेशन लावत नसल्यामुळे आपल्याला ब्लशरवर अधिक भर द्यायला हवा. त्यामुळे चेहरा व्यवस्थित ब्लेंड होईल, असेच ब्लशर निवडावे. शिमर ब्लशर पावसाळ्यात वापरू नका.
५. पावसाळ्यात भडक लिपस्टिक लावणे टाळा. हलका पिंक, अबोली, मरून, कॉफी शेड तुम्ही निवडू शकता.
६. ग्लॉसी लिपस्टिक आणि लिपग्लॉस लावणे पावाळ्यात टाळावे. मॅट लिपस्टिक लावूनच पावसाचा आनंद घ्या. लिपस्टिक लावण्याआधी वॉटरप्रुफ लीप लायनर लावायला विसरू नका.
७. वॉटरफ्रुप मस्कारा आणि काजळ लावा. काजळ आणि मस्कारा डार्क लावू नका. केवळ एक- दोनदा ब्रश फिरवा.
८. शक्यतो वॉटरप्रुफ असणारे पेन्सिल आय लायनर निवडा.