वयाच्या 48 व्या वर्षीही मलायका अरोरा (Malaika Arora) एवढी तरुण कशी दिसते? याचं उत्तर तिचा सुडौल बांधा आणि चमकदार त्वचा (glowing skin) हे आहे. सुडौल बांध्यासाठी मलायका फिटनेस, व्यायाम, योग करुन जशी स्वत: कष्ट घेते तसेच प्रयत्न ती त्वचेचं आरोग्य जपण्यासाठी सुध्दा करते. तरुण, तेजस्वी आणि नितळ त्वचेसाठी पार्लरमधल्या ट्रीटमेण्ट ऐवजी मलायकाचा विश्वास घरच्याघरी केल्या जाणाऱ्या उपायांमध्ये (home remedy for skin care) आहे. मलायका अरोरा आपल्या त्वचेची ज्या प्रकारे काळजी घेते, त्यासाठी ती जी सामग्री वापरते ती इतकी सहज आणि स्वस्त आहे की मलायका करत असलेले उपाय (Malaika Arora skin care regime) आपणही आपल्या घरी सहज करु शकतो.
Image: Google
मलायका त्वचेसाठी काय करते?
1. काॅफी स्क्रब: चेहेऱ्यावरची मृत त्वचा, मृत पेशी काढून टाकल्यास त्वचा नितळ होते. यासाठी मलायका स्क्रब करते. स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या गोष्टीतूनच हे स्क्रब तयार करते. यासाठी मलायका काॅफी पावडर घेते. त्यात ब्राउन शुगर घालून ते एकत्र करते. नंतर त्यात तेल घालते. आपण स्क्रबसाठी खोबऱ्याचं किंवा बदामाचं तेल वापरतो असं मलायका सांगते. या तीन गोष्टी एकत्र करुन तयार होणाऱ्या स्क्रबनं मलायका चेहेऱ्याचा हळूवार मसाज करते. मसाज झाल्यावर थोडा वेळ हा स्र्कब चेहेऱ्यावर ठेवून नंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुते. हा स्क्रब केवळ चेहेऱ्यालाच नाही तर संपूर्ण शरीराला लावला तरी चालतो. मलायका म्हणते घरी हे काॅफी स्क्रब करताना ब्राउन शुगर उपलब्ध नसल्यास नेहेमी वापरतो ती साखर घेतली तरी चालतं.
Image: Google
2. दालचिनीचा लेप: मलायका म्हणते तिलाही चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्यांचा सामना करावा लागला. त्या कमी करण्यासाठी, घालवण्यासाठी मलायका दालचिनीचा लेप तयार करते. दालचिनीचा लेप तयार करण्यासाठी एका वाटीत दालचिनी पावडर. 1 लहान चमचा मध आणि 1 लहान चमचा लिंबाचा रस घेते. या तिन्ही गोष्टी एकत्र करुन हा लेप मलायका चेहेऱ्यावर लावते. हा लेप 15 मिनिटं चेहेऱ्यावर राहू दिल्यानंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुते. मलायका म्हणते की आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा लेप चेहेऱ्याला लावल्यास मुरुम पुटकुळ्यांची समस्या राहात नाही.
Image: Google
3. कोरफड जेल: केसांसाठी, त्वचेसाठी मलायका ताज्या कोरफड जेलचा भरपूर वापर करते. त्यासाठी तिने आपल्या घराच्या बागेत भरपूर कोरफड लावला आहे. कोरफडच्या ताज्या पातीचा मध्यम आकाराचा तुकडा घ्यावा. तो धुवून घ्यावा. कापून त्यातला गर काढावा. हा गर चेहेऱ्याला लावावा. थोड्या वेळानं चेहेरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवावा. कोरफड जेल चेहेऱ्याला नियमित लावल्यास चेहेरा दिवसभर ताजा तवाना आणि त्वचा मऊ राहाते.मलायका त्वचेची काळजी घेताना माॅश्चरायझरचा उपयोगही भरपूर करते. चेहेऱ्यावर कोणताही लेप लावून चेहेरा धुतला की आधी चेहेऱ्याला माॅश्चरायझर लावण्याचा नियम मलायका अवश्य पाळते.