सौदामिनी आधी कुंकू लाव, हा डायलॉग आठवला की हसू येतंच. आपणही तो अशोक सराफ यांच्या आवाजात म्हणून पाहतो. त्याचवेळी आठवत असते, पिकूमधली दीपीका पदूकोण टिकली लावलेली अतिशय सुंदर दिसणारी. तिचे फॉर्मल कपडे, केस आणि टिकली हे फार सुंदर रुप होतं. परंपरा, रीत वगैरे म्हणून सोडा पण आपणही कधीमधी टिकली लावतोच. अर्थात लेगिन्स-कुर्ती, जीन्स-टॉप वापरताना टिकली लावणं फार चांगलं वाटत नसलं तरी आपला लूक आपला आपण ठरवायच्या काळात एक टिकली आपल्या सौंदर्याची आणि लूकचीही शोभा वाढवू शकते. त्यातही मॅचिंग टिकली. आता पुन्हा मॅचिंग टिकली लावण्याचा ट्रेण्ड आलेला आहेच.
सणवार, लग्नसमारंभ यात ट्रेडिशनल लूकच हवा असतो. छान काठपदरी साडी, त्यावर मोजके दागिने, केसात गजरा, हातभर बांगड्या हे सारं करणं छान वाटतं. आता कोरोनाकाळात तर ऑनलाइनच आपण फंक्शन जॉइन करतोय, त्यातही हा लूक उत्तम. हौशीचा. आणि त्यावर चार चांद म्हणजे कपाळावर छानसी टिकली. अगदी काहीच मेकअप केला नाही , नुसतं काजळाची रेघ, लिपस्टिक आणि टिकली एवढ्यानंही आपलं रुप पालटतं. या लूकला आणखी हटके टच द्यायचा असेल तर सध्या मॅचिंग टिकलीचा ट्रेंड आहे.
या ट्रेंडचे श्रेयही द्यायला हवे खरेतर एके काळच्या रेट्रो एव्हरग्रीन अभिनेत्री आशा पारेख, मुमताज, राखी, वहिदा रहमान यांना. रेट्रो काळात म्हणजेच ७० व ८० च्या दशकात या सारयाच अभिनेत्री रुपेरी पडद्यावर साडीच्या रंगाची टिकली लावलेल्या दिसतात. आता रेट्रो ट्रेण्ड परत येत असताना या रंगीत टिकल्याही परत येत आहेत. दीपीका पडूकोण, विद्या बालन, कंगना राणावत, प्रियांका चोप्रा, करिना कपूर मॅचिंग टिकलीलावताना दिसतात. मॅचिंग रंगाच्या टिकलीत गडद निळा, गडद गुलाबी, हिरवा या रंगाच्या टिकल्या छान दिसतात. मॅचिंग रंगाची टिकली शक्यतो गोलाकारातीलच लावली जाते. तरच तिचा लूक छान वाटतो.
मॅचिंग रंगाच्या टिकलीप्रमाणेच मोठ्या आकाराची टिकलीही लावली जाते. दीपिका पदुकोण हिने पिकू चित्रपटात अशी टिकली लावली होती. तिचा हा लूक खूप लोकप्रिय झाला होता. टिकली म्हणजे काकूबाई हे चित्र आता बदलतं आहे.