Join us  

मेहंदी है रचनेवाली. नागपंचमीला हातावर मेहंदी हवीच, पण केमिकलशिवाय नॅचरली मेहंदीचा रंग कसा खुलतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 2:17 PM

नागपंचमी म्हटलं की हातावर मेहंदी काढण्याची इच्छा होतेच. मेहंदी जेवढी रंगेल तितका आनंद आणि उत्साह वाढतो. पण जर मेहंदी रंगली नाही तर सगळा उत्साहच मावळतो. असं होवू नये म्हणून मेहंदी छान कशी रंगेल हे समजून घ्यायला हवं. मेहंदी भिजवण्यापासून सुकलेली मेहंदी हातावरुन काढण्यपर्यंत काही विशेष युक्त्या आहेत त्या केल्या की मेहंदी छान रंगते.

ठळक मुद्देमेहंदी भिजवताना पाण्याच्या ऐवजी चहाचं पाणी वापरावं.मेहंदी सुकवण्यासाठी अनेकजणी फॅन , कुलर किंवा ड्रायरची मदत घेतात. पण मेहंदीसुकवण्याची ही पध्दत चुकीची आहे.मेहंदी जेव्हा पूर्ण वाळेल तेव्हा ती काढताना मोहरीचं तेल वापरावं.

  श्रावण सुरु झाला की सणावारांची चाहूल लागते. सर्वात आधी येते ती नागपंचमी. शहरी भागात गावातल्यासारखं वातावरण नसलं तरी लहानपणीच्या आठवणी तर प्रत्येकीसोबत असतातच. या आठवणींच्या माध्यमातूनच शहरी भागात महिला शक्य होईल ते करत सणवार साजरे करतात आणि पुढच्या पिढीपर्यंत हे सणवार पोहोचवतात. आज शहरात देखील नागपंचमी म्हटलं की हातावर मेहंदी काढण्याची इच्छा प्रत्येकीला होते. आईसोबत मुलींनाही या मेहंदीचं, हातावरल्या नक्षीचं, तिच्या रंगण्याचं आणि दरवळण्याचं खूप कुतुहल असतं. मेहंदी जेवढी रंगेल तितका आनंद आणि उत्साह वाढतो. मागून पुढून मेहंदीने रंगलेले हात कौतुकानं मैत्रिणींना दाखवले जातात. पण जर मेहंदी रंगली नाही तर सगळा उत्साहच मावळतो. असं होवू नये म्हणून मेहंदी छान कशी रंगेल हे समजून घ्यायला हवं.

 छायाचित्र:- गुगल 

सर्वात महत्त्वाचं पहिलं  काम

मेहंदी लावण्याआधी हाताचं वॅक्सिंग करुन घ्यावं. यामुळे हातावरचे केस निघून जातात. तसेच हातावरच्या त्वचेवर जमा झालेल्या मृत पेशीही निघून जातात. अशा स्वच्छ हातांवर मेहंदी मग छान लावता येते. जर वॅक्सिंग करुन दोन तीन दिवसच झाले असतील तर डाळीचं पीठ, हळद, दुधाची साय एकत्र करुन हाताला लावून हात एक्सफोलिएट करुन घ्यावे. यामुळेही त्वचा स्वच्छ होते. हाताच्या त्वचेवरची रंध्रं स्वच्छ होतात आणि त्वचा मेहंदी चांगली शोषून घेते.

 छायाचित्र:- गुगल 

मेहंदी स्वत:च भिजवा

बाहेरुन मेहंदीचे कोन आणण्यापेक्षा घरी भिजवलेल्या मेहंदीचा आनंद आणि समाधान वेगळंच असतं. आपल्या कष्टानं हातावर रंगलेल्या मेहंदीचं कौतुकही खूप असतं. मेहंदी स्वत: भिजवणार असाल तर पाण्याच्या ऐवजी चहाचं पाणी वापरावं. साखर घालून काळा चहा तयार करावा. तो थंड झाला की तो गाळून घ्यावा आणि या चहात मेहंदी भिजवावी.दुसरी पध्दत म्हणजे मेहंदी भिजवताना लिंबाचा रस वापरावा. मेहंदी भिजवताना दोन ते तीन चमचे लिंबाचा रस त्यात घालावा. लिंबाचा रस मेहंदीत घालण्याआधी तो गाळून घ्यावा. चुकून जर लिंबाची बी त्यात गेली तर ती मेहंदीच्या कोनात अडकू शकते.

 छायाचित्र:- गुगल 

मेहंदी लावताना..

* मेहंदी लावताना आधी हात स्वच्छ धुवावेत आणि कोरडे होवू द्यावेत.

* मेहंदी लावण्याआधी एका वाटीत मोहरीचं तेल, पेपरमिंट ऑइल आणि कापूस घेऊन तो जवळ ठेवावा.

* तळहातावर मेहंदी काढून झाल्यावर हातावर मागच्या बाजूने काढण्यआधी लावलेल्या मेहंदीवर कापसाच्या सहाय्यानं पेपरमिंट ऑइल लावावं. पेपरमिंट ऑइलमुळे मेहंदीचा रंग छान गडद उतरतो शिवाय ती अधिक सुगंधीही होते.

* एकदा लावलेल्या मेहंदीवर पेपरमिंट ऑइल लावल्यावर मेहंदी थोडी सुकली आहे असं वाटलं की कापसाच्या सहाय्यानं मोहरीचं तेल लावावं. यामुळे मेहंदी परत ओलसर तर होतेच शिवाय मेहंदीचा रंग त्वचेत उतरण्यास मोहरीचं तेल मदत करतं.

* मेहंदी सुकवण्यासाठी अनेकजणी फॅन , कुलर किंवा ड्रायरची मदत घेतात. पण मेहंदी सुकवण्याची ही पध्दत चुकीची असल्याचं म्हटलं जातं. कारण यामुळे त्वचा मेहंदीचा रंग शोषून घेण्याआधीच मेहंदी सुकते. त्यामुळे मेहंदीचा रंग गडद चढत नाही. नैसर्गिकपणे मेहंदी सुकु द्यायची म्हटलं तर अर्ध ते दीड तास लागतो. पण मेहंदीचा रंग गडद होण्यासाठी एवढा संयम तर हवाच.

* मेहंदी जेव्हा पूर्ण वाळेल तेव्हा ती काढतानाही मोहरीचं तेलच वापरावं. सुकलेली मेहंदी हातावरुन पूर्ण काढून टाकल्यावर हातावर पुन्हा थोडं मोहरीचं तेल घेऊन हळूवार मसाज करत ते हाताला चोळावं.

* मेहंदीचा रंग गडद येण्यासाठी आणखी एक घरगुती उपाय आहे. मेहंदी सुकल्यानंतर मोहरीच्या तेलानं ती काढावी. हात धुण्याआधी सर्दी , डोकेदुखी झाल्यावर जो पेन किलर बाम लावतात तो हातावर लावावा. या उपायनेही मेहंदीचा रंग गडद होतो.

* हातावर मेहंदीचा रंग चांगला चढण्यासाठी मोहरीचं तेल किंवा पेन किलर बाम लावून हाताचा हलका मसाज केल्यानंतर किमान दोन ते तीन तास तरी पाण्यात हात घालू नये.