केसांचं सौंदर्य आणि केसांची काळजी घेण्याचा मुद्दा येतो तेव्हा मेहंदी ही खूपच परिणामकारक ठरते. एरवी केसांची काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही म्हणून मिळालाच कधी वेळ तर केसांना मेहंदी लावली जाते. पण वेळ मिळाला म्हणून केसांना घाईघाईत मेहंदी लावायला गेलात तर मेहंदीचा रंग केसांवर चढत तर नाहीच पण केसांचा पोतही बिघडतो.
Image: Google
केसांसाठी मेहंदी भिजवण्याचे, केसांना लावण्याचे , मेहंदी लावल्यानंतर केस धुण्याचे नियम असतात. ते पाळले गेले नाहीत तर मग कितीही चांगल्या गुणवत्तेची आणि ब्रॅण्डची मेहंदी लावली तरी काहीच उपयोग होत नाही.
चांगल्या ब्रॅण्डची मेहंदी लावूनही केसांना मेहंदीचा रंग चढत नसेल तर दोष मेहंदीचा नसून मेहंदी भिजवण्याचा आहे हे समजावं, मेहंदी भिजवताना हमखास काही चुका होतात, यामुळे मेहंदीची परिणामकारकता, त्यातील गुणवत्ता कमी होते आणि केसांना मेहंदी लावूनही काहीच उपयोग होत नाही . यामुळे वेळ आणि मेहनत दोन्हीही वाया जातं. हे टाळायचं असल्यास मेहंदी भिजवताना होणाऱ्या सामान्य पण मेहंदीची परिणामकारकता घालवणाऱ्या चुका टाळायला हव्यात.
Image: Google
मेहंदी भिजवताना होणाऱ्या चुका..
1. आज वेळ आहे म्हणून भिजवली मेहंदी आणि लावली केसांना तर त्या मेहंदीचा काहीच उपयोग होत नाही. मेहंदी नीट भिजली तरच ती केसांवर रंगाचा असर दाखवते. मेहंदी किमान 10 ते 12 तास भिजवायला हवी. यासाठी रात्री मेहंदी भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी ती केसांना लावावी. यामुळे मेहंदी भिजायला पुरेसा वेळ मिळतो.
2. मेहंदीची गुणवत्ता वाढावी म्हणून मेहंदी भिजवताना त्यात अंडं आणि दही घातलं जातं. पण हेअर एक्सपर्ट म्हणतात, मेहंदीमधे नैसर्गिक प्रथिनं असतात, जी केसांसाठी महत्त्वाची असतात. पण दही आणि अंड्यामुळे मेहंदीतील प्रथिनांवर नकारात्मक परिणाम होतात. ते टाळायचं असल्यास मेहंदी भिजवताना त्यात अंडं आणि दही घालू नये.
Image: Google
3. मेहंदी लावल्याने केस कोरडे होतात असा समज आहे. त्यामुळे आधीच कोरड्या केसांची समस्या असणारे मेहंदी लावण्याआधी केसांननातेल लावतात. पण तेलकट केसांमुळे मेहंदी केसांवर चढत नाही. कोरड्या/ रुक्ष केसांची समस्या असल्यास हेअर एक्सपर्ट सांगतात त्याप्रमाणे मेहंदी केसांना लावण्याआधी किमान दोन दिवस आधी केसांना तेल लावावं. तेल लावताना केवळ केसांच्या मुळाशी थोडं लावावं. त्यामुळे केसांमधे नीट तेल शोषलं जातं आणि मेहंदीचा रंग केसांवर चढण्यात केसांना लावलेल्य तेलाचा अडथळा निर्माण होत नाही.
4. लिंबाच्या रसानं केसातला कोंडा जातो असं म्हणून मेहंदी भिजवताना त्यात लिंबाचा रस घातला जातो. पण लिंबाच्या रसात सायट्रिक ॲसिड असतं. या ॲसिडमुळे डोक्यातील कोंडा जातो हे बरोबर पण त्यामुळे केसांचा पोत बिघडतो. लिंबाचा रस घालून भिजवलेली मेहंदी लावल्यास केस निस्तेज आणि रुक्ष होतात.
Image: Google
5. मेहंदी भिजवतान साधं किंवा थंडं पाणी वापरु नये. चहा किंवा काॅफीच्या कोमट पाण्यात भिजवावी. यामुळे मेहंदीचा रंग केसांवर चांगला चढतो. किंवा पाणी गरम करावं. ते कोमट झालं की त्यात मेहंदी भिजवावी. पांढऱ्या केसांच्या समस्येसाठी केसांना मेहंदी लावायाची असल्यास मेहंदी लोखंडी कढईत/ लोखंडी खलबत्त्यात / लोखंडी तव्यावर भिजवावी.