Join us  

पिरिएड्समध्ये व्हॅक्स आणि थ्रेडींग केले तर चालेल का? तुम्हालाही पडलाय का हा प्रश्न...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 4:11 PM

काय करू ? परवा मला एका पार्टीला जायचंय आणि आज नेमके माझे पिरिएड्स सुरू झाले आहेत. आता पार्लरला कसे जाऊ, पाळी चालू असताना हॅण्ड व्हॅक्स, लेग व्हॅक्स, आयब्रोज कशा काय करणार, हा बहुसंख्य महिलांना छळणारा प्रश्न तुम्हालाही कधीतरी पडला आहे का? पाळीत व्हॅक्स आणि थ्रेडींग करू नये, असे तुम्हीही ऐकलेय का ?

ठळक मुद्देज्या महिलांना पाळीत कोणतेही तीव्र स्वरूपाचे त्रास होत नाहीत, त्यांनी पार्लरमध्ये जाताना पाळी चालू आहे की नाही, हे बघण्याची अजिबातच गरज नाही. 

मासिक पाळी म्हणजे दर महिन्याचे ठरलेले चार दिवस. या दिवसात काही जणी खूप फ्रेश आणि ॲक्टीव्ह असतात, तर अनेक जणी थकलेल्या आणि उदास दिसतात. पाळीच्या चार दिवसात काय करायचं आणि काय नाही करायचं, याची एक भली मोठी यादीच आपल्या आजी- पणजी- आई- मावशी- काकू यांच्याकडून आपल्याला मिळत असते. पहिली पाळी येऊन कित्येक वर्षे उलटून गेल्यानंतरही हे करू नको, 'हे चालत नाही, ते चालत नाही,' असे कुणीना कुणी आपल्याला सांगतच असते. ही यादी आता काळानुसार अपडेट झाली आहे आणि चक्क या यादीत आता पार्लरमध्ये जाऊन काय करायचे आणि काय नाही करायचे, या गोष्टीही अनेक महिलांनी स्वत:च ॲड करून टाकल्या आहेत. या यादीत ॲड झालेली आणि कोणताही बेस नसलेली गोष्ट म्हणजे पाळी चालू असताना व्हॅक्स, अंडरआर्म्स आणि आयब्रोज करू नये, असा नवा नियम.

पण पाळी येणे आणि व्हॅक्स, आयब्रोज न करणे यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, असे काही प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे पाळी आली असेल आणि त्याच वेळी पार्लरमध्ये जाणेही तितकेच महत्त्वाचे असेल, तर डोक्यातून सगळे खूळ काढून टाका आणि अगदी बिनधास्तपणे पार्लर गाठून तुम्हाला हव्या त्या ब्युटी ट्रिटमेंट्स करून घ्या, असेही डॉक्टर म्हणतात.

पाळी चालू असताना व्हॅक्स केले तर काय होते

  • पाळीमध्ये अनेक जणींना पोटदुखी, थकवा, पायदुखी, कंबर आणि पाठदुखी असे वेगवेगळे त्रास होत असतात. 
  •  आयब्रोज, अंडरआर्म, व्हॅक्स, अप्पर लीप्स या ब्युटी ट्रीटमेंट्समध्ये आपल्या त्वचेवरील अतिरिक्त केस जवळपास ओढूुनच काढले जातात. यामुळे अनेक महिलांना खूपच त्रास होतो.
  • काही जणींचे अंग व्हॅक्स करताच  लाल होते आणि थोडीफार रॅशही येते.
  • मग पाळी सुरू असताना पाळीचा त्रास सोसायचा आणि वर पुन्हा हा त्रासही सहन करायचा, हे अनेकींना शक्य होत नाही.

त्यामुळे केवळ याच एका कारणासाठी पाळी चालू असताना व्हॅक्स किंवा आयब्रोज अगदी आवश्यक असेल तर करा, असे डॉक्टर सांगतात.

टॅग्स :ब्यूटी टिप्समहिला