दिवाळीची साफसफाई आता शेवटच्या टप्प्यात आली असेल. भिंती, कपाटे, कानेकोपरे असे सगळे साफ करुन झाले असेल तर आता तुमचा मोर्चा घरातील आरशांकडे वळवायला हरकत नाही. सकाळी उठल्यावर ब्रश करण्यापासून ते रात्री झोपताना आरशात बघून झोपणारे अनेक जण असतात. बाथरुममधल्या आरशांवर टुथपेस्ट किंवा दाढीचे क्रिम उडाल्यामुळे त्यात चेहरा दिसेनासा होतो. तर ड्रेसिंग टेबलच्या आरशाला हाताचे किंवा सौंदर्यप्रसाधनांचे डाग लागलेले पाहायला मिळतात. हे डाग वेळच्या वेळी काढले नाहीत तर नंतर ते काढण्यासाठी खूप कष्ट पडतात. त्यामुळे ज्याच्यात घरातील प्रत्येक जण स्वत:ला न्याहाळतो तो आरसा स्वच्छ नको का करायला. दिवाळीत आपण सजल्यावर आपल्याला जसेच्या तसे दाखवणारा हा आरसा साफ करायचा तर त्यासाठी काही ट्रीक्स माहित असायला हव्यात. आरसा पुसला की त्यावर कपड्याची तुसे राहतात आणि तो कितीही साफ केला तरी म्हणावा तितका स्वच्छ दिसतच नाही. मग आपण असंख्यवेळा त्यावरुन हात फिरवत राहतो आणि तरीही त्यावर बारीकसारीक कण दिसतच राहतात. पाहूयात आरसा साफ करायच्या काही सोप्या टिप्स...
१. आरसा कापडाने पुसण्याऐवजी कागदाने पुसा. कागद कापडाइतका नाही तर थोडा ओला करा आणि एकसारखा वरच्या बाजुने खाली पुसत या. कागद जास्त ओला झाल्यास त्याचा चिकदा होईल. त्यामुळे थोडाच ओला करा.
२. घरगुती क्लिनर किंवा साबणाच्या पाण्यानेही तुम्ही घरातील आरसे पुसू शकता. परंतु डागांचे प्रमाण जास्त असल्यास ते निघणे थोडे अवघड होते.
३. स्प्रे बाटलीमध्ये पाणी आणि व्हिनेगर मिक्स करा आणि ते आरशावर मारत हलक्या हाताने स्पंजने किंवा कॉटन पॅडने पुसावे.
४. आरशावर जास्त प्रमाणात पाणी शिंपडू नका कारण त्यामुळे बाजूला लाकडी फर्निचर असेल तर ते खराब होण्याची शक्यता असते. तसेच जास्त पाणी मारल्यानंतर ते पुसलेही जात नाही.
५. लिंबाचा रस आरशावरील डाग निघण्यासाठी अतिशय उपयुक्त असतो. लिंबू अॅसिडीक असल्याने त्याने आरशावरील डाग निघण्यास मदत होते. लिंबाच्या रसात पाणी एकत्र करुन ते आरशावर स्प्रे करा. टिशू पेपर किंवा कागदाने हळूवारपणे पुसून घ्या.
६. टूथपेस्ट ही ज्याप्रमाणे दात साफ करण्यासाठी उपयुक्त असते, त्याचप्रमाणे आरशावरील डाग काढण्यासाठीही टूथपेस्टचा उपयोग केला जाऊ शकतो. टूथपेस्ट आरशावर लावून काही काळ तशीच ठेवावी. त्यानंतर मायक्रोफायबर कापडाने आरसा स्वच्छ पुसून घ्यावा. त्यामुळे आरसा चकचकीत होण्यास मदत होते.
७. कच्चे बटाटे हा आरसा साफ करण्यासाठी एक उत्तम उपाय ठरु शकतो. बटाटा कापून तो आरशावर चोळा. थोड्या वेळाने ओल्या फडक्याने आरसा पुसून घ्या. बटाट्यातील घटकांमुळे आरशावरील चिकटलेल्या गोष्टी निघून येण्यास मदत होऊ शकते.
८. क्लोरीन पावडर हा आरसा साफ करण्याचा एक उत्तम उपाय असू शकतो. क्लोरीन पावडरमध्ये पाणी मिसळून ते आरशावर फवारा. त्यानंतर कागदाने आरसा हळूवार पुसून घ्या.
९. सगळ्यात शेवटी आरसा कोरड्या फडक्याने किंवा कापडाने पुसून घ्या