Join us  

मिरर स्किन ट्रेंड: कोरियात या ब्यूटी ट्रेंडच्या मुली झाल्यात दिवान्या, पहा हे नक्की आहे काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 4:45 PM

कोरियातील महिलांच्या डागरहित, चककणाऱ्या त्वचेचं रहस्य कोणत्या एका किंवा अनेक ब्यूटी उत्पादनांमधे नसून  त्यांच्या नैसर्गिक उपाय आणि जीवनशैली बाबतच्या पथ्यांमधे आहे. यातूनच निर्माण झालेल्या कोरियन ब्यूटी ट्रेंडची सध्या खूप चर्चा आहे.

ठळक मुद्दे‘मिरर स्किन ट्रेंड  ’ हा कोरियन ब्यूटी ट्रेंड आहे. मिरर स्किन ट्रेंड म्हणजे आरशासारखी चमकणारी, डागरहित त्वचा.कोरियन महिला डागरहित त्वचेसाठी तांदळाचं पाणी वापरतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी तांदळाचं पाणी वापरण्याची त्यांची जुनी  परंपरा आहे.आठवड्यातून एकदा कोरियन महिला चेहेऱ्याला क्ले मास्क लावतात. यामुळे चेहेऱ्याची छिद्र स्वच्छ होतात.

 जग जवळ आलं आहे. कुठे काय खातात? कुठे कशाला जास्त मागणी आहे हे सहज शोधून जाणून घेता येतं. आणि शोधण्याचीही गरज नाही. हल्ली जगातल्या कानाकोपऱ्यातली बातमी मिनिटात आपल्य समोर असते. कुठल्या जगात कुठला फॅशन ट्रेंड आहे सहज जाणून घेता येतं अपडेट राहाता येतं. सध्या कोरियन ब्यूटी ट्रेंडची खूप चर्चा आहे. सौंदर्य उत्पादनांमधे कोरिया जगात पुढे आहे. चित्रपट- पर्यटन यामुळे कोरियन जीवनशैलीचा परिचय झालेला आहे. कोरिया म्हटलं की तेथील महिलांची चकचक चमकणारी त्वचा लगेच डोळ्यासमोर येते. पण याचा संबंध त्या देशातल्या कॉस्मेटिक्स उत्पादनाशी सहज जोडला जातो.  'भारी भारी ब्यूटी प्रोडक्टस वापरत असतील त्या' असा आपला समज असतो. पण सत्य काही वेगळंच आहे. कोरियातील महिलांच्या डागरहित, चककणाऱ्या त्वचेचं रहस्य कोणत्या एका किंवा अनेक ब्यूटी उत्पादनांमधे नसून  त्यांच्या नैसर्गिक उपाय आणि जीवनशैली बाबतच्या पथ्यांमधे आहे. यातूनच निर्माण झालेल्या कोरियन ब्यूटी ट्रेंडची सध्या खूप चर्चा आहे.

हा कोरियन ब्यूटी ट्रेंड आहे तरी काय?  ‘मिरर स्किन ट्रेंड ’ हा कोरियन ब्यूटी ट्रेंड आहे. मिरर स्किन ट्रेंड म्हणजे आरशासारखी चमकणारी, डागरहित त्वचा. तेथील महिलांचा चेहेरा दीर्घकाळपर्यंत तरुण दिसतो. त्यावर सुरकुत्या पडत नाही. आज त्यांच्या ब्यूटी ट्रेण्डची चर्चा जगभरात होत आहे. पण याविषयी चर्चा आज होत असली तरी आपल्या नैसर्गिक सौंदर्याबद्दल प्रयत्न करण्याची त्यांची सवय आज कालची नसून वर्षानुवर्षांपासूनची आहे. त्याचा परिणाम म्हणजे त्यांची त्वचा आरशासारखी चमकदार, डागरहित , तरुण आणि घट्ट दिसते. आपल्या त्वचेची काळजी घेणं, जीवनशैली नैसर्गिक ठेवणं हा त्यांच्या जगण्याचा भाग आहे.

मिरर स्किन ट्रेंड मागचे तीन नियम

  1.  त्वचा ही निरोगी होण्यासाठी खाणं पिणं हे उत्तमच हवं. आहारात प्रथिनं, जीवनसत्त्वं, झिंक यासारखी पोषक तत्त्वं असायला हवीत. जंक फूड, प्रक्रिया केलेलं अन्न टाळणं हा त्यांचा नियम. इतर देशांच्या तुलनेत कोरियामधे गोड पदार्थ, साखरेचे पदार्थ कमी खाल्ले जातात. साखरेमुळे शरीरात दाह सारख्या समस्या निर्माण होतात. त्याच परिणाम म्हणजे चेहेरा मुरुम पुटकुळ्यांनी खराब होतो. पण कोरियामधे गोड पादार्थ किंवा चॉकलेट खाण्याऐवजी , कोल्ड ड्रिंक्स पिण्याऐवजी फळं खाण्याला महत्त्व दिलं जातं. याचा थेट परिणाम त्यांच्या चेहेऱ्यावर दिसतो.
  2. आंघोळीच्या वेळेस चेहेरा चांगला धुतला आणि स्वच्छ केला की नंतर एक दोनदा वरचेवर चेहेरा धुतला जातो. पण कोरियन महिला दिवसततून दोनदा चेहेरा व्यवस्थित स्वच्छ करतात. आणि रात्री झोपताना चेहेरा स्वच्छ करताना त्या ऑइल बेस्ड क्लीन्जर वापरतात.
  3. आठवड्यातून एक वेळा आपली त्वचा एक्सफोलिएट करतात. त्यासाठी होममेड क्लीन्जर किंवा सौम्य रासायनिक घटक असलेले क्लीन्जर व वापरतात. आणि  त्वचेची काळजी घेण्यासाठी त्वचा नियमित मॉश्चराइज करायला महत्त्व देतात.या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे कोरियन महिलांची मिरर स्किन.

कोरियामधील ब्यूटी सीक्रेटस आपणही फॉलो करु शकतो!

  • कोरियन महिला बार्ली म्हणजे जवाचा चहा पितात . या जवाच्या चहामधे भरपूर प्रमाणात अ‍ॅण्टिऑक्सिडण्टस असतात. त्याचा परिणाम रक्ताभिसरण सुधरण्यावर होतो. हा जवाचा चहा बनवताना जव थोडे भाजून घेतात. जव भाजले गेले की गॅस बंद करतात. नंतर एका भांड्यात पाणी गरम करुन त्यात भाजलेले जव घातले जातात. हे पाणी २० मिनिटं उकळलं जातं आणि मग गाळून चहा म्हणून प्यायलं जातं. हा चहा पोट आणि त्वचा दोन्हींसाठी उत्तम असतो.
  •  कोरियन महिला डागरहित त्वचेसाठी तांदळाचं पाणी वापरतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी तांदळाचं पाणी वापरण्याची त्यांची जून परंपरा आहे. तांदळाच्या पाण्यानं चेहेरा धुणं ही तिथे अगदी सर्वमान्य आणि सर्वसामान्य बाब आहे. हा उपाय आपणही वापरु शकतो. त्यासाठी तांदूळ शिजवायलाच हवे असं नाही . तर तांदूळ पाण्यात थोडा वेळ भिजवावेत. आणि मग ते उपसून त्या पाण्याने चेहेरा धुवावा. किंवा तांदूळ पाण्यात उकळून ते पाणी गाळून थंड करुन चेहेऱ्यासाठी वापरता येतं. तांदळाच्या पाण्यानं चेहेरा धुतल्यानंतर चेहेरा स्वच्छ पुसून मॉश्चरायजर लावावं. -
  • आठवड्यातून एकदा कोरियन महिला चेहेऱ्याला क्ले मास्क लावतात. यामूळे चेहेऱ्याची छिद्र स्वच्छ होतात. चेहेरा उजळतो आणि चेहेऱ्या वरची मृत त्वचाही निघून जाते. आपणही चेहेऱ्याला आठवड्यातून दोन ते तीन वेळा मुतानी माती लावू शकतो. मुलतानी माती लावल्यानंतर चेहेऱ्याला टोनर लावणं गरजेचं असतं.
  •  त्वचा राखण्यासाठी मसाज करणं हा कोरियन महिलांचा सौंदर्य नियम आहे आणि ही तिथली परंपराही आहे. हा मसाज ते घरच्या घरी नियमित करतात. आपणही त्वचा नीट ठेवण्यासाठी मसाज करु शकतो.
  • अंगाला लावलेला रुमाल चेहेऱ्याला लावू नये असा नियम आहे. पण हा नियम आपण पाळत नाही. पण तिकडे कोरियामधे महिला अंग पुसण्यासाठीचा टर्किश टॉवेलनं चेहेरा पुसत नाही. कारण त्यानं चेहेऱ्याची त्वचा रगडली जाते. त्याऐवजी त्या मऊ सूती कपड्यानं चेहेरा पुसतात चेहेरा सूती कापडानं पुसल्यानंतर त्या चेहेऱ्याला टोनर लावतात.
  • दक्षिण कोरियात त्वचेची काळजी घेण्यासाठी फेस शीट मास्क लावतात. त्वचा चमकदार करण्यासाठी त्या नियमित शीट मास्क वापरतात.  कोरियन महिलांप्रमाणे आपणही सहज आपल्या त्वचेच्या प्रकाराप्रमाणे शीट मास्क वापरु शकतो.

कोरियन महिला त्वचा जपण्यासाठी जे करतात ते आपणही आपल्या पातळीवर सहज करु शकतो. त्या जे करतात ते करुन पाहाण्यात अवघड काय आहे?