Join us  

National Pollution Day 2022 : प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या त्वचेच्या समस्या टाळा, त्यासाठी करा फक्त ५ गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2022 2:20 PM

National Pollution Day : 2022 प्रदूषणाचा आपल्या आरोग्यासह त्वचेवर परिणाम होतोच, म्हणूनच स्वत:सह पर्यावरणाची काळजी घ्यायला हवी.

वाढतं प्रदूषण ही साऱ्या जगाची समस्या आहे. वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषणामुळे पर्यावरणासह मनुष्याला देखील हानी पोहचत आहे. दरवर्षी २ डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा केला जातो. प्रदूषणाबाबत जनजागृती करत प्रदूषण मुक्तीसाठी प्रयत्न करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. प्रदूषणामुळे माणसाच्या शरीरात विविध आजार उद्भवतात. मुख्य म्हणजे स्कीनवर देखील त्याचा परिणाम होतो. त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्याकडेही लक्ष द्यायला हवे.हवेतील आणि पाण्यातील फ्री-रॅडिकल्स, आपल्या त्वचेवर अकाली सुरकुत्या आणि पुरळ निर्माण करतात. फ्री-रॅडिकल्स त्वचेच्या कोलेजनचे नुकसान करतात. फ्री-रॅडिकल्सचा सर्वात हानिकारक प्रभाव म्हणजे सेल उत्परिवर्तन आणि डीएनएचे नुकसान, जे शेवटी त्वचेच्या कर्करोगात बदलू शकते.

उपाय काय?

१. आपण टू-स्टेप क्लीनिंग प्रक्रियेबद्दल अनेकदा ऐकले असेल, जी त्वचा उत्तम स्वच्छ करण्यास मदत करते. सर्वप्रथम, मेकअप रिमूव्हल पॅडच्या मदतीने त्वचेवर क्लिंजिंग मिल्क किंवा सीरम लावा आणि स्वच्छ करा. त्वचेच्या प्रकारानुसार क्लींजर निवडा आणि त्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचेवर साचलेली धूळ आणि घाण साफ होईल.

२. आपण आहारातून अँटिऑक्सिडंट घेऊ शकता. फ्री रॅडिकल्समुळे त्वचेला होणारे नुकसान अँटिऑक्सिडंट्सच्या मदतीने दुरुस्त करता येते. शरीरातील अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण वाढवण्यासाठी डाळिंब, लिंबूवर्गीय फळे, ग्रीन टी, गाजर आणि बेरी यांचे सेवन करावे.

३. दररोज १० सेकंद त्वचेला स्क्रब केले पाहिजे. जर स्क्रब तुमच्या त्वचेला त्रासदायक ठरत असेल तर तुम्ही एक्सफॉलिएशन सीरम वापरू शकता. परंतु हे सीरम आठवड्यातून दोनदा वापरू नका. या सिरमचा वापर आपण रात्रीच्या वेळेस करू शकता. तसेच, दुसऱ्या दिवशी सनस्क्रीन लावायला विसरू नका.

४. निरोगी आणि सुंदर त्वचेसाठी हायड्रेटेड राहणे सर्वात महत्वाचे आहे. दररोज योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन करण्यासोबतच, त्वचेसाठी योग्य मॉइश्चरायझर वापरणे तितकेच आवश्यक आहे. यामुळे तुमच्या त्वचेवर संरक्षणाचा थर तयार होईल आणि प्रदूषण त्वचेत प्रवेश करू शकणार नाही.

५. हवामान कोणतेही असो, दररोज सनस्क्रीन लावणे फार महत्वाचे आहे. हे केवळ किरणांच्या नुकसानीपासून त्वचेचे संरक्षण करत नाही, तर हानिकारक कणांचा त्वचेत प्रवेश करण्यास रोखते.

टॅग्स :प्रदूषणत्वचेची काळजीहोम रेमेडी