काही जणांना काकडी, गाजर, बीट, कांद्याची पात यासारखे सॅलड पानात असेल, तर खूप आनंद होतो. पण मुळा ताटात दिसला की तेवढाच राग येतो.. मुळ्याचा उग्र वास अनेक जणांना आवडत नसल्याने, इतर सॅलडला जसं प्रेम मिळतं, तसं प्रेम काही मुळ्याच्या वाट्याला येत नाही. त्यामुळे तो सरसकट सगळ्यांकडूनच खाल्ला जात नाही. पण हा मुळा मात्र तुमच्या केसांसाठी अतिशय पोषक आहे.. त्यामुळे कधी मुळा खाण्याचा कंटाळा आला असेल, किंवा पानातला मुळा (use of raddish for hair care) नको असेल, तर त्याचा असा उपयोग करा..
मुळ्यातून आपल्याला खूप जास्त प्रमाणात प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फायबर, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंक, कॉपर, मँगनीज, फ्लोराईड यासारखी खनिजे तर मिळतातच, पण त्यासोबतच व्हिटॅमिन सी, ए आणि के देखील मोठ्या प्रमाणात मिळते. त्यामुळे केसांसाठी मुळ्याचा हेअर मास्क खूप उपयुक्त ठरतो. मुळ्याच्या हेअर मास्कमुळे केस मजबूत आणि घनदाट होतात. त्यांची चांगली वाढ होते.
केसांना मुळ्याचा ताजा रस लावण्याचे फायदे
- केस गळती होत असल्यास मुळाचा ताजा रस लावणे खूप फायद्याचे ठरते. मुळ्यामध्ये असणारे ॲण्टीऑक्सिडंट्स केसांची मुळे पक्की करण्यास मदत करतात.त्यामुळे केस खूप गळत असल्यास हा उपाय करून बघावा..
- मुळ्याचा ताजा रस काढा आणि केसांच्या मुळाशी हळूवार हाताने लावा. मुळ्यामध्ये असणारे व्हिटॅमिन्स केसांसाठी पोषक ठरतात आणि त्यामुळे केसांची चांगली वाढ होते.
- हिवाळ्यात त्वचा कोरडी होऊन अनेक जणांच्या डोक्यात खूपच जास्त कोंडा होतो. साहजिकच कोंड्याचे प्रमाण वाढले की केसही जास्तच गळायला लागतात. हे थांबविण्यासाठी मुळ्याचा रस करा आणि तो केसांना लावा. अर्ध्या तासाने केस धुवून टाका. कोंड्याचे प्रमाण कमी होईल.
- केस अकाली पांढरे होत असल्यास देखील मुळ्याचा रस उपयुक्त ठरतो.
- मुळ्याचा रस केसांसाठी नॅचरल माॅईश्चरायझर म्हणून काम करतो. त्यामुळे केस जर रुक्ष, कोरडे झाले असतील, तर केसांना मुळ्याचा रस लावा. मऊ आणि चमकदार केस मिळविण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे.