आपले केस दाट, लांबसडक असतील तर साहजिकच आपल्या सौंदर्यात भर पडते. पण हेच केस रुक्ष आणि निर्जीव झाले असतील तर मात्र ते अतिशय खराब दिसतात. काही वेळा केमिकल्सच्या अतिवापराने, इलेक्र्टीक उपकरणांच्या वापराने तर कधी प्रदूषण आणि इतर समस्यांमुळे केसांच्या समस्या उद्भवतात. केसांचा पोत एकदा खराब व्हायला लागला की पुन्हा तो पूर्वपदावर येण्यास बराच काळ जावा लागतो. मग त्यासाठी पार्लरमधल्या महागड्या ट्रिटमेंटस घेण्यापासून ते महागडी सौंदर्यप्रसाधने वापरण्यापर्यंत असंख्य उपाय करावे लागतात. यासाठी खूप पैसाही लागतोम मात्र घरच्या घरी नैसर्गिक उपायांनी केसांचा पोत सुधारायचा असेल तर स्वयंपाकासाठी वापरला जाणारा कडीपत्ता अतिशय फायदेशीर ठरतो. पाहूयात केस चांगले होण्यासाठी कडीपत्ता कशाप्रकारे वापरायचा आणि त्याने केसांना काय फायदा होतो (Natural Home Remedy For Hair Problems Hair Care Tips).
कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन बी १, बी ३, बी ९ आणि सी असतात. याशिवाय लोह, कॅल्शियम, फॉस्फरसही चांगल्या प्रमाणात असतं. नियमित कडीपत्ता खाल्ल्याने किंवा केसांना लावल्याने केसांना हे घटक मिळण्यास मदत होते. केस वाढण्यासाठी, काळे होण्यासाठी आणि कोंड्याची समस्या दूर होण्यासाठी कडीपत्ता फायदेशीर ठरतो. कडीपत्ता दह्यासोबत वापरला तर तो जास्त प्रभावी ठरतो. केसांत असणारे विविध प्रकारचे इन्फेक्शन्स जाण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे कोंड्याची समस्या दूर होण्यासाठी कडीपत्त्याचा वापर आवर्जून करायला हवा.
कसा करायचा कडीपत्त्याचा हेअरमास्क
एका बाऊलमध्ये ताजी कडीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून घ्यायची. ही पाने मिक्सरमध्ये बारीक करुन घ्यायची. यामध्ये आपल्या केसांच्या लांबीनुसार दही घालायचे. यानंतर ही पाने आणि दोन ते तीन चमचे दही असे एकत्रित करून मिक्सरमधून वाटून घ्यायचे. हा हेअर मास्क डोक्याच्या त्वचेला हलक्या हाताने लावा आणि २० ते ३० मिनिटे तसाच राहू द्या. यानंतर नेहमीप्रमाणे केस स्वच्छ धुवून घ्यावेत. यामुळे कोंडा कमी होण्याबरोबरच केसांची वाढ चांगली होते आणि केसांत कोणत्या प्रकारचे इन्फेक्शन असेल तर ते दूर होण्यास मदत होते. आठवड्यातून २ वेळा हा उपाय केल्यास केल दाट आणि लांब होण्यास मदत होते.