Join us  

नवरात्र विशेष : पार्लरमध्ये जायला वेळच नाही? घरीच करा फेशियल, ३ स्टेप-चेहरा करेल ग्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2024 1:46 PM

How to do facial at Home for Navratri festival skin care tips : काही स्टेप्स केल्या तर नवरात्रीत आपण स्वत:चा लूक खुलवू शकतो.

नवरात्र हा देशभरात साजरा होणारा मोठा सण असल्याने महिला या सणाच्या तयारीला एव्हाना लागल्या आहेत. नवरात्रातील धार्मिक गोष्टींबरोबरच, उपवास, साफसफाई, येणार-जाणार यांसारख्या सगळ्याच गोष्टींकडे महिलांना लक्ष द्यावे लागते.  हे करताना हळदीकुंकू, भोंडला, सवाष्ण म्हणून एकमेकींकडे जाताना किंवा अगदी देवीच्या दर्शनासाठी जातानाही आपण छान दिसावे असे प्रत्येकीलाच वाटते (How to do facial at Home for Navratri festival skin care tips). 

पण घरातली रोजची कामे, नवरात्रीची तयारी, ऑफीस हे सगळे करताना स्वत:कडे पाहायला वेळ मिळतोच असे नाही. त्यामुळे पार्लरमध्ये जाणे तर कित्येकदा मागे पडते. एकीकडे चेहऱ्यावर ग्लो तर हवा असतो आणि दुसरीकडे वेळ नसतो. अशावेळी घरच्या घरीच विकेंडला किंवा अगदी रात्री झोपताना फेशियलच्या सोप्या काही स्टेप्स केल्या तर नवरात्रीत आपण स्वत:चा लूक खुलवू शकतो. त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूया...

१. क्लिंजिंग

फेशिअल सुरूवात करण्याआधी केस नीट बांधून घ्या. फेशियलची सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली स्टेप म्हणजे क्लिंजिंग. चेहरा क्लिंजर लावून स्वच्छ धुवून घ्या. क्लिंजर नसेल तर २ चमचे दही, १  चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस हे मिश्रण वापरा. हा लेप चेहऱ्यावर लावा आणि १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावर प्रदूषण, धूळ यांमुळे जमा झालेली घाण निघून जाण्यास मदत होईल.तसेच टॅनिंग निघण्यासही याचा चांगला उपयोग होईल. 

२. स्क्रबिंग

यानंतर तुमच्याकडे एखादं स्क्रब असेल तर त्याने चेहऱ्याला मसाज करा. चेहरा जोरजोरात न रगडता हलक्या हाताने मसाज करा. घरी स्क्रब नसेल तर सरळ दोन चमचे दूध घ्या, त्यात एक चमचा बेसन पीठ किंवा मसूर डाळीचे पीठ घाला. थोडा मध घालून हे सगळे चांगले एकत्र करा आणि या स्क्रबरने चेहरा स्वच्छ करा. डाळीचे नको असेल तर कॉफी आणि मध एकत्र करुनही चेहरा स्क्रब करु शकता. त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका.चेहऱ्यावरचे ब्लॅकहेडस, व्हाईटहेडस निघण्यासाठी आणि त्वचेचा तेलकटपणा कमी होण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. 

३. फेसपॅक

चेहरा स्क्रब केल्यानंतर तुमच्या नेहमीच्या मॉईश्चरायझरने चेहऱ्याला मसाज करा. नंतर बाजारात मिळणारे मुलतानी माती, कोरफड किंवा आणखी कोणते फेसपॅक असेल तर तो चेहऱ्याला १० मिनीटांसाठी लावून ठेवा. विकतचा फेसपॅक नसेल तर दुधामध्ये डाळीचे पीठ, गुलाबजल घालून घरच्या घरी फेसपॅक तयार करु शकता. फेसपॅक वाळायला लागला की चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि पुन्हा मॉईश्चरायझर लावा. यानंतर लगेच उन्हात, धुळीच्या ठिकाणी जाणे टाळा.   

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीनवरात्री