कडुलिंबाला त्यातील औषधी गुणधर्मामुळे विशेष महत्त्व आहे. कडुलिंबाची पानं आणि त्याच्या अर्कात अँण्टिसेप्टिक, दाहविरोधी, अँण्टिऑक्सिडण्ट हे प्रमुख तत्त्वं असतात त्यामुळेच उपचारासाठी कडुलिंबाचा उपयोग होतो. कडुलिंबात फॅटी अँसिड, जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात जी आपल्या त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. कडुलिंबात निम्बिडिन, निम्बोलाइड आणि अझाडायरॅक्टिन हे सक्रिय घटक असतात त्यामुळे कडुलिंब त्वचा आणि केसांच्या समस्यांवर जादूप्रमाणे परिणाम करतो. सौंदर्यवृध्दीसाठी कडुलिंब महत्त्वाची भूमिका पार पाडतो. कोणालाही हेवा वाटावा अशी त्वचा आणि केस कडुलिंबाच्या नियमित उपयोगानं होवू शकतात
त्वचेच्या समस्या आणि कडुलिंब
- कडुलिंबात जीवाणूविरोधी घटक असतात. चेहेर्यावर मुरुम पुटकुळ्या येण्यास जीवाणू कारणीभूत असतात. त्यामुळेच मुरुम पुटकुळ्यांवर उपचार करण्यासाठी आणि चेहेर्यावर मुरुम पुटकुळ्या येवू नये म्हणून कडुलिंबाचा उपयोग होतो. शिवाय त्वचेवर निर्माण होणारं तेल हे देखील मुरुम पुटकुळ्यास कारणीभूत असतं. कडुलिंबाच्या उपयोगानं या जास्तीच्या तेलनिर्मितीला अटकाव होतो.
- कडुलिंबाच्या पानात अँण्टिऑक्सिडण्टस, ट्रिग्लायसेराइडस हे मॉश्चरायजिंग घटक आणि इ जीवनसत्त्व असतं. या घटकांमुळे त्वचेवर सुरुकुत्या पडत नाहीत. वय दर्शवणार्या चेहेर्यावरच्या रेषा, काळे डाग कडुलिंबाच्या उपयोगानं जातात. आणि त्वचा स्वच्छ नितळ होते. त्वचेचा पोत सुधारतो.
- तडतडणार्या त्वचेवर कडुलिंब हा उत्तम उपाय आहे. कारण यात जीवाणूविरोधी आणि दाहविरोधी घटक असतात. जे त्वचेला थंडावा देतात. संवेदनशील त्वचेच्या समस्या सोडवण्यासाठी कडुलिंबाचा उपयोग होतो. कोरडी आणि शुष्क त्वचा कडुलिंबाच्या उपयोगानं मऊ होते.
- चेहेर्यावरील व्हाइटहेडस आणि ब्लॅकहेडस कमी करण्यासाठी कडुलिंबाचा उपयोग होतो. त्यासाठी कडुलिंबाचा नियमित उपयोग करायला हवा. कडुलिंबामुळे चेहेर्यावरील मोठी रंध्र भरुन निघतात आणि रंध्रातील दूषित घटक निघून जातात आणि रंध्र स्वच्छ होतात. रंध्र छोटी आणि घट्ट होण्यासही कडुलिंबाचा उपयोग होतो.
केसांच्या समस्यांसाठी कडुलिंबाची पावडर आणि तेल
- कडुलिंबात बुरशीनाशक घटक असतात. म्हणूनच केसातील कोंडा घालवण्यासाठी कडुलिंबाचा उपयोग होतो. कडुलिंबामुळे डोक्यातील खाज, दाह, चुरचुर कमी होते.
- केस गळती थांबवण्यासाठी केसांसाठी कडुलिंब वापरावं. कारण पुर्नउत्पादक घटक असतात. त्यामुळेच कडुलिंबाच्या तेलानं केसांच्या मुळांशी हलका मसाज केल्यास केसांच्या मुळांशी असलेला रक्तप्रवाह सुधारतो आणि केस भरभर वाढायला बळ मिळतं.
- कडुलिंबात मोठ्या प्रमाणात अँण्टिऑक्सिडण्टस असल्यानं ते केस अवेळी पांढरे करणार्या फ्री रॅडिकल्सला रोखतात. केसांना कडुलिंबाच्या पावडरचा हेअर मास्क लावल्यास किंवा केसांना कडुलिंबाचं तेल लावल्यास केस अवेळी आणि लवकर पांढरे होत नाही.
- केसांचं आरोग्य नीट राखायचं असल्यास केसांना पोषक घटक मिळणं गरजेचं असतं. कडुलिंबात लिनोलेइक, ओलेइक आणि स्टिअरिक अँसिडसारखे महत्त्वाचे फॅटी अँसिड असतात . या फॅटी अँसिडसमुळे टाळुचं पोषण होतं. तसेच केसही मऊ होतात. केसांसाठी कडुलिंब कंडिशनरचं काम करतं.