मसाबा मसाबा (Masaba Masaba) या वेब सीरिजमुळे नीना गुप्ता आणि मसाबा या माय लेकींच्या नात्याची ( Neena Gupta and Masaba Gupta) गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचली. मसाबा मसाबाचा दुसरा सीझन मागील महिन्यात प्रदर्शित झाला. या दुसऱ्या सीझनची चर्चा होत असतानाच मसाबा मसाबाचा तिसरा सीझनही येणार असल्याच्या बातम्या प्रसिध्द होवू लागल्या. नीना आणि मसाबाच्या नात्यातले बारकावे वेब सीरिजमध्ये टिपले गेले असले तरी त्या दोघींमधल्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अजून कोणाला माहितीच नाहीये. अशाच एका गोष्टीबद्दल नीना गुप्ता बोलल्या आहेत. फॅशन डिझायनिंगमध्ये (fashion designer) स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या, फिटनेसबाबत तरुणींचा आदर्श असणाऱ्या मसाबा गुप्ता हिला सौंदर्याशी निगडित समस्यांचा (beauty probelms) सामना करावा लागला. त्या केवळ समस्याच नव्हत्या तर तो एक संघर्ष होता असं नीना गुप्ता 'हार्पर्स बझार' या मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणतात.
Image: Google
'हार्पर्स बझार' मासिकाला दिलेल्या या मुलाखतीत नीना गुप्ता लेकीच्या त्या संघर्षाबद्दल सविस्तर बोलल्या आहेत. मसाबाचे केस इतके कुरळे होते की ते बांधता येणं, वेणी घालणं अशक्य होतं. मसाबाच्या केवळ केसांचीच समस्या होती असं नाही तर तिला त्वचेच्याही समस्या होत्या. चेहेरा मुरुम पुटकुळ्यांनी भरलेला असायचा. आपल्या आईचा रंग, तिची त्वचा, आईचे लांबसडक केस याकडे आश्चर्यानं पाहाणाऱ्या मसाबाला प्रश्न पडायचा की आपले केस, आपली त्वचा आपल्या आईसारखी का नाही? आपण तिच्यापेक्षा वेगळे का दिसतो असा मोठा प्रश्न असणाऱ्या मसाबाला चेहेऱ्यावरील मुरुम पुटकुळ्यांमुळे इतरांना आपला चेहेरा दिसू नये असं वाटायचं.
Image: Google
मसाबाला मुरुम पुटकुळ्यांची समस्या लहानपणापासूनच होती. नीना गुप्ता यांनी मसाबाच्या चेहेऱ्यावरील मुरुम पुटकुळ्यांवर उपाय शोधण्यासाठी तिला मुंबईमध्ये अनेक डाॅक्टरांकडे नेले. डाॅक्टर मसाबाला मुरुम पुटकुळ्यांवर गोळ्या औषधं लिहून द्यायचे. पण मुलीच्या कोवळ्या वयात तिनं अशी औषधं घेणं हे आई म्हणून नीना गुप्ता यांना खूप जड गेलं. त्या काळात मसाबाचा चेहेरा मुरुम पुटकुळ्यांनी इतका भरलेला असायचा की तिला आपल्या खोलीमधूनही बाहेर पडावंसं वाटायचं नाही. एकेकाळी मुरुम पुटकुळ्यांंमुळे चारचौघांपासून आपला चेहेरा लपवणारी मसाबा आज फॅशन इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करुन आत्मविश्वासानं उभी आहे. सोशल मीडियावर फिटनेसबाबतचे तिचे विविध व्हिडीओ ट्रेण्ड होत असतात.
Image: Google
सौंदर्य समस्येमुळे स्वत:ला एका कोषात बंदिस्त केलेल्या मसाबानं आपला हा संघर्ष 2017 मध्ये समाज माध्यमाद्वारे लोकांसमोर आणला. तिने समाज माध्यमांवर चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या असलेला फोटो पोस्ट केला आणि एक पोस्टही लिहिली. त्यात तिने या मुरुम पुटकुळ्यासोबतचा आपला 14 वषांचा झगडा मांडला. ती त्या पोस्टमध्ये म्हणाली होती की चेहेऱ्यावर सिगारेटचे चटके दिलेले असावेत असे फोड माझ्या चेहेऱ्यावर असायचे. चेहेऱ्यावर आणि कपाळावर मुरुम पुटकुळ्यांचे डाग असायचे. आपल्या चेहेऱ्यावरील कुरुप सत्य कोणाला समजू नये यासाठी खोलीतून बाहेर न पडणं, बाहेर पडताना चेहेऱ्यावर पावडर लावणं हेच पर्याय मसाबाला सोयिस्कर वाटायचे. आपल्या चेहेऱ्यावर प्रसिध्दी माध्यमांच्या कॅमेऱ्याचे लाइट्स पडू नये म्हणून स्वत:ला लपवणारी मसाबा एका टप्प्यावर या संघर्षातून, न्यूनगंडातून बाहेर पडली. स्वत:ला कमीपणाच्या कोषात न दडवता आज मसाबा स्वकर्तृत्वानं फुलपाखरासारखी सुंदर झाली आहे. सौंदर्यसमस्यांमुळे आज तरुण वयात अनेक मुलींना न्यूनगंड येतो. आपण सुंदर नाही ही कमीपणाची भावना त्यांना वर येवूच देत नाही. पण या भावनेवर विजय मिळवून आपण आपल्यातलं सौंदर्य शोधू शकतो, मिरवू शकतो, जगाला आपल्या अस्तित्वाची दखल घेण्यास भाग पाडू शकतो हेच मसाबानं स्वत:च्या संघर्षातून दाखवून दिलं आहे.