केसांची निगा राखायची म्हणजे केस आधी स्वच्छ धुतले पाहिजे. केसात कोंडा नको. यासाठी शॅम्पू आवश्यकच. पण खरं पाहिलं तर केसांची स्वच्छता राखण्यासाठी शॅम्पूची अजिबात गरज नसते. तज्ज्ञ म्हणतात की शॅम्पूने केस स्वच्छ होतात, चांगले होतात, केसांच्या समस्या घालवण्यासाठी शॅम्पूच हवा हा गैरसमज आहे. खरंतर शॅम्पूच्या वापरानं केसांच्या समस्या सुटत नाही तर वाढतात. शॅम्पूच्या वापरानं केस कोरडे होतात, गळायला लागतात, पातळ होतात आणि केसांची नैसर्गिक चमकही हरवते. पण यामागचं कारण माहित नसल्यानं या समस्यांवर पुन्हा शाम्पूचा उपाय शोधला जातो. शॅम्पूनं केस स्वच्छ करायचे तर आठड्यातून कमाल तीन आणि किमान दोन वेळा तरी केसांना शॅम्पू लावावा लागतो. पण एक साधा उपाय करुन केसांसंबधीच्या सर्व समस्या दूर होवून केसांची निगा राखली जाते आणि केसांना शॅम्पू फक्त आठवड्यातून एकदाच लावावा लागतो.
Image: Google
केस जर नियमित स्वच्छ धुतले नाहीत तर केसात कोंडा होतो, डोक्यात खाज येते. ज्यांना घाम जास्त येतो त्यांचे केस जास्त खराब होतात. त्यामुळे ते जास्त वेळा शॅम्पू लावतात. पण शॅम्पूने केस सुंदर होत नाही तर केसांचं नैसर्गिक सौंदर्य हरवतं. शॅम्पूचे केसांवरील नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी आठवड्यातून एकदाच शॅम्पू लावावा. आणि दोन वेळेस कोरफडीचा रस केसांना लावून केस धुवावेत.
कोरफडचा रस आणि केसांची निगा
कोरफडच्या रसाद्वारे केसांची चांगली निगा राखता येते. केस सुंदरही होतात. केसांना कोरफडीचा रस लावताना आही केस चांगले विंचरुन घ्यावेत. त्यानंतर एका वाटीत कोरफडचा रस घेऊन केसांना ज्याप्रमाणे आपण तेल लावतो त्याप्रमाणे लावावा. तेल लावल्यानंतर ज्याप्रमाणे आपण हलक्या हातानं मसाज करतो तसा मसाज करण्याची आवश्यकता नसते. केस धुण्याआधी किमान 10 ते 15 मिनिटं आधी हा रस केसांना लावावा. आणि नंतर पाण्यानं केस स्वच्छ धुवावेत.
Image : Google
घरीच करा कोरफडचा रस
अँलोवेरा ज्यूस या नावानं कोरफडीचा रस बाहेर विकत मिळतो. पण केसांवर चांगले परिणाम दिसण्यासाठी हा रस घरीच ताजा ताजा करावा. हा रस करण्यासाठी केवळ दोन मिनिटंच लागतात. पण हा ताजा रसच केसांसाठी उत्तम असतो. यासाठी घरात बागेतल्या कुंडीत कोरफड लावावी. आणि कोरफडीची एक पाती कापून घ्यावी. त्याचे काटे काढून पात सोलून त्यातला गर काढावा. तो मिक्सरमधून फिरवून घ्यावा. हा रस गाळणीनं गाळून घ्यावा आणि केसांना लवावा.
या उपायाचा फरक लगेचच केसांवर दिसतो. शॅम्पूच्या केसांवरील वाईट परिणामांपासून वाचण्याचा हा एक सोपा आणि परिणामकारक उपाय आहे.