केसांची काळजी घेणार्या उत्पादनांच्या यादीत आता बीअरचाही समावेश झाला आहे हे माहिती आहे का? हेअर केअर आणि बीअर. काय संबंध? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण केसांसाठी बीअर वापरण्याचा ट्रेण्ड जगभरात सुरु आहे. केसांसाठी बीअर उपयुक्त का या प्रश्नाचं उत्तर म्हणजे बीअरमधील समाविष्ट घटक. जे घटक केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे तेच बीअरमधे असल्यानं केसांसाठी बीअर ही फायदेशीर आहे असं म्हणून जगभरात केसांना बीअर लावण्याचा ट्रेण्ड सध्या चांगलाच गाजतोय.
जगभरात सेलिब्रेशन म्हटलं की बीअरची बाटली किंवा बीअरने भरलेले फेसाळलेले मग उंचावून जल्लोष करण्याची फॅशन आहे. आता बीअरचा ग्लास फक्त सेलिब्रेशनसाठीच नाहीतर केसांच्या सौंदर्यासाठीही वापरला जातोय. बीअरने केस धुणं, हेअर पॅकमधे बीअरचा समावेश करणं, बीअर शाम्पू अशा विविध पध्दतीनं बीअरचा समावेश ‘हेअर केअर’मधे झालेला आहे.
हेअर केअरमधे बीअर वापरण्याचा ट्रेण्ड का आला असेल?
बीअरने केस चांगले होतात, केस गळणं थांबतात, केसांची वाढ चांगली होते असं म्हटलं जातं. हे खरंच आहे का हे पडताळण्यासाठी अभ्यासक बीअरमधील घटक आणि केसांना आवश्यक असलेले घटक यांचा सहसंबंध लावतात. हा संबंध चांगला जुळतो म्हणून बीअर केसांसाठी चांगली असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच बीअर केसांसाठी वापरली जाते.
* केसांसाठी बीअर चांगली मानली जाण्याचं कारण म्हणजे बिअरमधे प्रथिनं, ब जीवनसत्त्वं आणि फ्लेवोनॉइडससारखे अँण्टिऑक्सिडण्टस असतात. हे घटक केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे मानले जातात.* बीअरमधे सेलेनिअम आणि सिलिकॉन ही दोन महत्त्वाची खनिजं असतात. शरीरात जर सेलेनिअमची कमतराता असेल तर केस अकाली पांढरे होतात तर सिलिकॉनच्या कमतरतेमुळे केस गळतात. बीअरमधे केसांना आवश्यक हे दोन्ही घटक असल्यानं बीअर केसांसाठी उपयुक्त समजली जाते.
* ब आणि ब 12 हे जीवनसत्त्वं केस अकाली पांढरे होवू देत नाही. बीअरमधे ही दोन्ही जीवनसत्त्वं असल्यानं केसांना बीअर लावली जाते.* झिंक, फोलेट, बायोटिन कॅल्शिअम आणि ड जीवनसत्त्वं हे महत्त्वाचे पोषण तत्त्वं केसांसाठी महत्त्वाचे असतात. हे घटक जर शरीरात कमी असतील तर केस मुळापासून तुटणे, तणाव निर्माण होवून त्याने केस झडणे तसेच केस खराब होणे याप्रकारे केसांवर दुष्परिणाम होतात. केस चांगले राखणारे हे सर्व पोषण मुल्य बीअरमधे असल्यानं बीअर केसांसाठी वापरण्याकडे जगभरातील महिलांचा कल आहे. * केस गळती थांबवण्यासाठी बीअरमधील समाविष्ट घटक उपयुक्त आहेत म्हणून केस वाढवण्यासाठीही बीअर वापरली जाते का? असा प्रश्न अनेकींना असतो. तर यावर अभ्यासक म्हणतात की केस गळती रोखण्याचे गुणधर्म बीअरमधे असल्यानं बीअरनं केस चांगले राखले जातात आणि त्यामुळेच केसांच्या वाढीला बीअरमुळे प्रोत्साहन मिळतं.
* केसांसाठी बीअर वापरल्यानं केसातला कोंडा जातो हा अनेकांचा अनुभव आहे. यामागचं वास्तव हे सांगतं की 'मलास्सेझिया' हा यीस्ट सारखा बुरशीजन्य घटक डोक्यातील कोंड्यासाठी कारणीभूत असतो. बीअरमधे बुरशीजन्य घटक विरोधी गुण असल्यानंच डोक्यातला कोंडा जातो असं मानलं जातं. शास्त्रीय दृष्ट्या बीअर आणि केस यांचा अभ्यास सुरु आहे. पण अभ्यासक म्हणतात की बीअरमधे समाविष्ट घटक हे जरी केसांना उपयुक्त असले तरी केस चांगल्या राखण्यासाठी इतर उपाय, पोषक आणि समतोल आहार याला पर्याय बीअर होवू शकत नाही हेही खरंच.