Join us  

नव्या वर्षात केस काळेभोर, घनदाट, सिल्की हवेत? हिवाळ्यात खा ८ पदार्थ, केसांसह शरीराचेही पोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 12:24 PM

नियमित संतुलित आहाराने आरोग्य उत्तम राहीलच, सौंदर्यही मिळेल...

ठळक मुद्देसौंंदर्यासाठी संतुलित आहारही तितकाच महत्त्वाचा...थंडीत केसांच्या तक्रारींपासून दूर राहायचे असेल तर आहारात काही गोष्टींचा समावेश हवाच

थंडीच्या दिवसांत त्वचा, केस रुक्ष होतात, गळतात अशा तक्रारी आपण नेहमी करत असतो. केसांचे चांगले पोषण झाल्यास या समस्या उद्भवत नाहीत. त्यामुळे केस लांब, घनदाट आणि चमकदार व्हावेत यासाठी बाह्य सौंदर्याबरोबरच आपण घेत असलेला आहारही महत्त्वाचा असतो. केसांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी आवश्यक असणारे घटक अन्नातून मिळाल्यास केसांची चांगली वाढ होण्यास मदत होते. मात्र त्यासाठी थंडीच्या दिवसांत आहारात काही ठराविक पदार्थांचा आवर्जून समावेश असायला हवा. या पदार्थांमुळे केसांचा पोत सुधारण्यास मदत होईलच पण शरीरालाही ऊर्जा मिळू शकेल. थंडीच्या दिवसांत बाजारात भाज्या आणि फळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने आपण आरोग्यासाठी त्याचा फायदा करुन द्यायला हवा...पाहूयात आहारात असायला हवेत असे घटक कोणते....

१.  पालक 

आयुर्वेदानुसार पालक ही थंडीच्या दिवसांत खाण्यासाठी सर्वोत्तम भाजी आहे. पालक उष्ण असल्याने थंडीच्या दिवसांत पालक खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते. तसेच पालकात लोह मोठ्या प्रमाणात असल्याने केसांच्या वाढीसाठी पालक खाणे फायदेशीर ठरते. त्यामुळे पालकाची भाजी, दाल-पालक, पालक राईस, पालक पराठा यांसारखे पदार्थ तुम्ही आहारात नियमित घेऊ शकता. 

२. दही 

दही केसांच्या आरोग्यासाठी नेहमीच उत्तम उपाय आहे. दह्यामुळे शरीराला प्रोटीन, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, सी, चांगले बॅक्टेरीया मिळतात. मात्र थंडीच्या दिवसांत दही कायम दुपारच्या जेवणात खावे म्हणजे सर्दी-कफ होण्याची शक्यता नसते. दह्याचा आहारात उपयोग करण्याबरोबरच केसांना दही लावल्यानेही केसांना मॉइश्चरायझर मिळण्यास मदत होते. त्यामुळे नियमित आहारात दही आवर्जून खायला हवे. 

३. डाळी

डाळींमध्ये प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक असते त्यामुळे लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आहारात डाळीचा आवर्जून समावेश असायला हवा. घनदाट केसांसाठी प्रोटीन अतिशय आवश्यक असल्याने डाळ खाणे फायदेशीर ठरते. यामध्ये आपण तूर डाळीबरोबरच मसूर, मूग, उडीद डाळ तसेच राजमा, छोले, हरबरा यांसारख्या कडधान्यांचाही समावेश करु शकतो. वरण, आमटी यांबरोबरच डाळीचे वडे, डाळीचे डोसे यांसारखे वेगवेगळे पदार्थ तुम्ही करु शकता. यामुळे शरीराचे पोषण तर होईलच पण केसांचे पोषण होण्यासही मदत होईल. 

४. सुकामेवा 

थंडीच्या दिवसांत शरीरात ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी सुकामेवा आवर्जून खायला हवा. यामध्ये बदाम, काजू, आक्रोड, अंजीर यांसारख्या सुकामेव्याचा समावेश करायला हवा. तसेच शेंगदाणे, फुटाणे, खरबूजाच्या बिया यांसारख्या गोष्टीही खायला हव्यात. आपल्याला अनेकदा येताजाता खायला किंवा तोंडात टाकायला काहीतरी लागते. त्यासाठी हे उत्तम पर्याय असू शकते. बदाम आणि सुकामेव्यातील इतर गोष्टींमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स असल्याने केस गळणे कमी होते. 

५. आंबट फळे 

थंडीच्या दिवसांत बाजारात भरपूर फळे उपलब्ध असतात. यात आवळा, संत्री, अननस, लिंबू, किवी, द्राक्ष अशा स्थानिक फळांचा समावेश असतो. क जीवनसत्त्व असणाऱ्या या सगळ्या फळांचा आहारात आवर्जून समावेश असायला हवा. यामुळे शरीराला आवश्यक असणारे सायट्रीक अॅसिड मिळते आणि केस दाट होण्याबरोबरच त्यांची चमकही वाढते. 

६. मूळा 

मुळ्याची भाजी डोळ्यांच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असणारी भाजी आहे. मूळ्यात लोह मोठ्या प्रमाणात असते. पोट साफ ठेवण्यासाठी या भाजीचा उपयोग होतो. थंडीच्या दिवसांत केस वाढावेत यासाठी रोजच्या जेवणात मूळ्याच्या भाजीचा समावेश करा. मूळ्याची भाजी, पराठा, कोशिंबीर असे वेगवेगळे पदार्थ करता येऊ शकतात. मात्र मूळा कधीही रात्री न खाता दिवसा खायला हवा. रात्रीच्या वेळी मूळा खाल्ल्यास गॅसेसची समस्या उद्भवू शकते. 

(Image : Google)

७. केळी 

केळी हे अनेक व्हिटॅमिन्सनी युक्त असलेले आणि कुठेही सहज उपलब्ध होणारे फळ आहे. याबरोबरच केळ्यात लोह आणि खनिजे पुरेशा प्रमाणात असतात. दररोज एक केळे खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते. केसांच्या वाढीसाठी केळ्यातील पोषकतत्त्वे अतिशय उपयुक्त ठरतात.

८. मध 

मधाला भारतीय आहारात अतिशय महत्त्व आहे. आपल्या नियमित आहारात मधाचे सेवन केल्यास त्याचा केस, त्वचा आणि इतर आरोग्यालाही फायदा होतो. केसांची आणि त्वचेची चमक वाढविण्यासाठी मध अतिशय उपयुक्त ठरतो. मध सुकामेवा, दाणे, दूध, दही, फळे यांसोबत खाऊ शकता.    

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीआहार योजना