Join us  

चेहरा छान आणि मान मळकट? मान काळवंडणे, खरखरीत होणे या समस्येवर करा घरच्याघरी उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 5:52 PM

चेहऱ्याची काळजी घेताना मानेकडे दुर्लक्ष तर होत नाही ना? कारण चेहरा चांगला आणि मान काळीकुट्ट असं झालं, तर चेहऱ्याचं सौंदर्यच नाही, तर आपलं सगळं व्यक्तिमत्त्वच मार खातं...

ठळक मुद्देकच्ची पपई टाकून देऊ नका. कारण मान उजळविण्यासाठी ती खूप उपयुक्त ठरते.

चेहरा तजेलदार, चमकदार व्हावा, म्हणून आपण खूप प्रयत्न करतो. पण बऱ्याचदा अनेक जणींच्या बाबतीत असं दिसून येतं की चेहरा जेवढा छान आहे, तेवढीच मान कळकट झालेली आहे. काळवंडलेली मान अजिबातच चांगली दिसत नाही. अनेक जण आंघोळ करतानाही मानेकडे विशेष लक्ष देताना दिसत नाही. मान घासून, जरा चोळून पुसावी, हे देखील अनेकांच्या गावी नसते. म्हणूनच तर असे दररोजच होत असल्याने मानेची त्वचा काळी पडत जाते. एकदा जर मानेने पक्का रंग घेतला की मग मानेला पुन्हा पुर्वपदावर आणायला खूपच मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे चेहऱ्याकडे जसे लक्ष देतो, तसेच लक्ष आतापासूनच तुमच्या मानेकडेही द्यायला सुरूवात करा. 

 

मान स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय१. लिंबाचा रसलिंबाचा रस चेहऱ्याला लावल्यामुळे त्वचा तजेलदार होते, हे आपण जाणतोच. त्याचप्रमाणे आता लिंबाचा रस मानेसाठीही वापरून पहा. लिंबाची फोड मानेवर घासली तरी चालते. आठवड्यातून दोन वेळा हा प्रयोग केल्यास लगेचच फरक दिसून येतो.

 

२. बटाट्याचा रसबटाट्याला नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखले जाते. बटाटा मिक्सरमध्ये फिरवून किंवा तो किसून त्याचा रस काढून घ्यावा आणि या रसामध्ये एक टेबलस्पून लिंबाचा रस आणि अर्धा टेबलस्पून मध टाकून तो मानेवर चोळावा. १५ मिनिटे हे मिश्रण मानेवर राहू द्यावे आणि त्यानंतर चोळून चोळून धुवून टाकावे. 

३. कच्ची पपईअनेकदा पपई चिरली की ती कच्ची निघते आणि आपण ती टाकून देतो. पण आता इथून पुढे कच्ची पपई टाकून देऊ नका. कारण मान उजळविण्यासाठी ती खूप उपयुक्त ठरते. अर्धी वाटी कच्च्या पपईचा गर घ्या. त्यामध्ये एक टेबलस्पून गुलाबपाणी आणि दही टाका. हे मिश्रण एकत्र करा आणि मानेवर लावा. हे मिश्रण वाळले की थंड पाण्याने मान धुवून टाकावी.

 

४. बेकिंग सोडाचार टेबलस्पून दूध घ्या. यामध्ये एक टीस्पून बेकिंग सोडा टाका. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि मानेवर चोळा. ५- ६ मिनिटांनी थंड पाण्याने मान धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा उपाय करून बघा. दुधाऐवजी साधे पाणी वापरले तरी चालेल. 

५. कोरफडीचा गरकोरफडीच्या गरामध्ये त्वचेला पोषक ठरणारे अनेक घटक असतात. हा गर हलक्या हाताने चोळून मानेला लावा. २० ते २५ मिनिटे मानेवर राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करावा. 

 

६. टोमॅटो आणि दहीटोमॅटोचा रस आणि दही हे समप्रमाणात घेऊन मानेवर चोळावे. दोन्ही पदार्थांमध्ये त्वचेला तजेलदार बनविणारे घटक आणि ॲण्टीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे एक दिवसाआड हा उपाय करून बघावा. हा पॅक १५ ते २० मिनिटे मानेवर ठेवावा आणि त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाकावा.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी