Lokmat Sakhi >Beauty > कपडे बाईचे, निर्णय बाईचा! - हे साधं समीकरण समाजाला का मान्य नाही?

कपडे बाईचे, निर्णय बाईचा! - हे साधं समीकरण समाजाला का मान्य नाही?

बायकांची अंतर्वस्त्र ही खरंतर अत्यंत खाजगी बाब, पण त्याबद्द्लचे निकष रुढ झाले, होतात तेही एकूण बाजारपेठ ठरवते त्या दिशेने आणि समाजात रुजतात त्या संकेतांनी! - हे असं का असावं, असा प्रश्न आता जगभरात विचारला जाऊ लागला आहे.    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 06:27 PM2021-07-13T18:27:10+5:302021-07-13T19:00:39+5:30

बायकांची अंतर्वस्त्र ही खरंतर अत्यंत खाजगी बाब, पण त्याबद्द्लचे निकष रुढ झाले, होतात तेही एकूण बाजारपेठ ठरवते त्या दिशेने आणि समाजात रुजतात त्या संकेतांनी! - हे असं का असावं, असा प्रश्न आता जगभरात विचारला जाऊ लागला आहे.    

no bra movement in the world, why women saying no bra | कपडे बाईचे, निर्णय बाईचा! - हे साधं समीकरण समाजाला का मान्य नाही?

कपडे बाईचे, निर्णय बाईचा! - हे साधं समीकरण समाजाला का मान्य नाही?

Highlightsसल्ली या चळवळीचा सध्या चेहरा बनली आहे. जगभर त्या चळवळीची चर्चा असून अनेक देशातल्या बायका त्यासमर्थनार्थ समोर येत आहेत.

शुभा प्रभू-साटम

‘द जॉय ऑफ नॉट वेअरींग अ ब्रा.’-  ‘द न्यूयॉर्कर’मध्ये २६ ऑक्टोबर २०१७ रोजी एक लेख प्रकाशित झाला.
हिलरी ब्रेनहाऊस ही लेखिका. तिनं ब्रा/ ब्रेसीअर न वापरण्याबद्दल अगदी साध्या शब्दात लिहिलं आहे. खरंतर १९६५/७० मध्ये ब्रा बर्निंगची एक लाट तिकडे आली होती. त्यात स्त्री वादाची भूमिका होती. मात्र तशी कोणतीही भूमिका न घेता, किंवा लेबलं न लावता, कुठल्याही विचार प्रणालीचा अंगिकार अथवा समर्थन न करता हिलरीनं आपण ब्रा का वापरत नाही, न वापरण्याचे फायदे हे अगदी परखड शब्दात मांडलं आहे.
त्यानिमित्तानं विचार करुन पाहिला तर भारतातलं चित्र काय आहे?
भारतात ब्रा/ब्रेसीअर कधी आल्या? त्या कशा होत्या? प्राचीन काळी ज्या कंचुक्या होत्या, त्या या ब्राच्या खापर खापर पणज्या का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्रेसीअर/ब्रा न घालण्यामध्ये जो आनंद, किंवा मोकळेपणाची जी भावना असते का? आणि असते तर बायका ते नाकारुन ही वस्त्रं का घालतात?
बायकांनी कोणते पेहराव करावेत, हे भारतभर आणि अन्य देशात समाज म्हणजेच पुरूषप्रधान समाज ठरवतो. नागर/शहरी आणि उच्चभ्रू समाजात, काही ठिकाणी बायकांना पेहरावाचं जे स्वातंत्र्य असतं, ते अन्य ठिकाणी नसतं, आणि त्यात या ब्रा पण येतात.आता म्हणाल की, हे वस्त्र तर बाईचं, खाजगी, त्यासंदर्भात दुसरं कोण कशाला निर्णय घेईल?
तर तो निर्णय घेतात समाज/कुटुंब आणि प्रसारमाध्यमं. नकळतपणे हा दबाव आणला जातो. मुलगी वयात आली की शारीरिक फरक पडतात, त्यासाठी तिच्या पोशाखावर जे बंधन येणं सुरू होतं ते ब्रा पासून.
तुझ्या शरीराकडे कोण कुठल्याही नजरेनं बघतात/बघतील म्हणून तू आपली स्वत:ला पूर्ण झाकून ठेव कशी, हे बिंबवलं जातं, आणि इथंच या ब्राला अवास्तव महत्व येणं सुरू होतं.
आणि गंमत म्हणजे हे इतकं महत्वाचं वस्त्र गणलं जाऊनही त्यात बाईच्या आरामाचा विचार क्वचित होताना आढळून येतो. तुझे  स्तन हे लटकताना दिसतील, मग ते घाण वाटेल, मग तुझ्यावर टीका होईल, पुढं आणखीन काही. म्हणून तू हा अवयव दाबून ठेव बाई. उगा का कोणाला संधी द्या. या कारणामधून मग हे वस्त्र बाईसाठी अपरिहार्य ठरत गेलं.

(गुगल  छायाचित्र -अभिनेत्री हॅले बैरी)

 

आजही.. अगदी या घटकेपर्यंत जवळपास ६० ते ७५ टक्के बायका चुकीच्या मापाच्या ब्रा वापरत आहेत. ब्रा च्या खरेदीत एक मोकळेपणा आलाय पण एक अपरिहार्यता पण आलेली आहे. अत्यंत चलाखीनं, आणि पूर्ण व्यावसायिक वृत्तीनं, वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रेसीअर बाजारात रोज आणल्या जातात. आपल्या कंपनीचं उत्पादन किती उत्कृष्ट आहे, हे कुठल्या तरी पेड सर्वेक्षणाद्वारे सांगितलं जातं. जोडीला ती विशिष्ट ब्रा परिधान केलेल्या बायकांचे हसरे, मोकळे असे फोटो पण असतात. आधी तुम्ही किती चुकीच्या मापाची ब्रा वापरत होता, हे कथन केलेलं असतं. थोडक्यात ग्राहक गळाला लावण्याची चोख तयारी! ज्याला बायका फशी पडतात.
फशी पडतात हे म्हणायचे, कारण हे की ,अशा ब्रा ही इतकी गरजेची गोष्ट नाही. विशेषत: मध्यमवयीन भारतीय बायकांसाठी तर बिलकुल नाही. कारण बाजारात ज्या ज्या ब्रेसियर्स/ब्रा मिळतात, त्या पूर्ण चुकीच्या डिझाइनच्या असतात. मी हे विधान करतेय ते भारतीय बायकांची ठेवण, अंगकाठी यांचा विचार करून. भारतीय स्त्रियांचे स्तन हे जरा मोठे असतात. त्याला अनुवांशिक, जनुकीय कारणं आहेत. आणि त्या प्रकारच्या स्तनांना व्यवस्थित बसतील अशा ब्रा दुर्दैवानं बाजारात उपलब्ध नाहीत.
आता तुम्ही म्हणाल मग इतकी ढिगानं दुकानं/ ॲप्स आहेत ते कसे?
तर इथं प्रथम भारतीय आणि त्यातही बायकांची मनोवृत्ती समजून घेतली पाहिजे. स्वत:वर म्हणजे स्वत:च्या गरजांवर व्यवस्थित खर्च करणं, यात भारतीय बायकांना विनाकारण अपराध वाटतो. इथे ज्या ज्या बायका मी घेतल्यात त्या निम्न आणि मध्यमवर्गीय घरातल्या त्यातूनही साधारण चाळीशीच्या पुढच्या, सध्याच्या मिलेनिअल्स बद्दल मी इथं बोलत नाही. तो एक स्वतंत्र विषय आहे.
तर अंर्तवस्त्रावर व्यवस्थित खर्च करणं हे अनेकांना वायफळ वाटतं. मग त्या साध्या ब्रेसिअर्स विकत घेतात. १०० रुपयांपासून ५०० पर्यंत त्यांची किंमत असते. जितकी किंमत कमी तितका दर्जा कमी. की मग त्या ब्रा पाच-सहा महिन्यात  विरतात, फाटतात. पण बायका त्याच वापरतात आणि आधी म्हटल्याप्रमाणो मोठ्या स्तनांना या ब्रा व्यवस्थित पेलू शकत नाही. ना त्यांचा आकार योग्य असतो ना रचना. बऱ्याच मध्यमवयीन बायकांना खांदेदुखी ,पाठ दुखी  असते त्यामागील एक कारण आहे ते म्हणजे चुकीच्या रचनेची ब्रा वापरणं हे.
तर मुख्य मुद्दा हा की ब्रा इतकी गरजेची आहे का? आणि असली, तर ती ब्रा आजही भारतीय शरीर रचनेला अनुकूल अशी का नाही? जवळपास ७० ते ८० टक्के बायकांचे स्तन ब्रा मध्ये कोंबलेले असतात. (परत इथे मी मध्यमवयीन बायकांनाच म्हणते) आणि ती तशी ब्रा वापरणं ही शिक्षा ठरते. विशेषत: उष्ण हवामान असणाऱ्या प्रदेशात तर विचारू नका.
मोठ्या स्तनांना व्यवस्थित पेलू शकणाऱ्या सुती, आरामदायक ब्रेसियर्स या आजच्या घडीला भारतात सहजी उपलब्ध नाही. आणि ज्या आहेत, त्यांची किंमत वाचली तरी गरगरेल. मग प्रश्न येतो की ब्रेसिअर्सचं मार्केट इतकं तेजीत कसं? तर ते निव्वळ व्यावसायिक गणित आहे. मुळात स्तन हे जे आहेत, ते मुलाला दूध देण्यासाठी. त्याचे मूळ काम तेच. मात्र पुरुष प्रधान संस्कृतीनं बाईचं दिसणं, घाट, आकारउकार ठरवले. आणि त्यातूनच आल्या त्या उठावदार, डिझाईनच्या आकर्षक रंगाच्या ब्रा, पुरुषांचं कामोत्तेजन व्हावं यासाठीच्या ब्रा. मग म्हणून दिसतात त्या टाचक्या, लेसवाल्या, टोक असलेल्या विरविरीत कापडाच्या ब्रा. बाजारात ज्या पुशप ब्रा /अंडर वायर ब्रा मिळतात, त्या निव्वळ शारीरिक छळ आहेत.
आणि परत इथे मूळ मुद्द्यावर आपण येतो, की ब्रा गरजेची आहे का?
तर ज्या प्रकारे,जाहिराती किंवा माध्यमांमधून बिंबवलं जातं, तितक्या गरजेची बिलकुल नाही. ब्रा घेताना आपला कम्फर्ट किंवा सोय हे प्रथम यायला हवं. बाकी गोष्टी नंतर. म्हणजे खेळाडू, व्यायामपटू, पोलिस, लष्कर, प्रशिक्षक,कलाकार, नृत्य करणाऱ्या, स्तनदा माता अशा स्त्रियांसाठी,एक आधार म्हणून ब्रा ही अत्यावश्यक आहे, प्रश्नच नाही. पण जर तुमची जीवनशैली तशी नसेल, तर साधारण ३५ ते ४० नंतर ब्रा वापरली नाही. तरी काहीही बिघडत नाही, स्वानुभव आहे. तुम्ही साडी किंवा पारंपरिक भारतीय पेहराव करत असाल तर बिलकुल गरज नाही. ब्रा वापरली नाही तर आपण ओंगळ दिसू अशी भीती वाटत असेल, तर ती आधी काढून टाका. कारण ओंगळ म्हणजे काय?आणि कोणाला? हे आधी विचारून घ्या. वयाच्या चाळीस पन्नाशीमध्ये मोकळेपणानं जगता येत नसेल, तर मग मुद्दाच खुंटला. आणि त्यातूनही ज्यांना ब्रा घालायचीच आहे त्यांनी खुशाल घालावी. कारण परत हा पूर्ण खाजगी ,वैयक्तिक स्वातंत्र्याचा मामला आहे. पण दिवसभरानंतर ,ती ब्रा जेव्हा काढून टाकली जाते, तेव्हा जर अगदी मोकळं वाटत असेल, तर मग प्रामाणिकपणे विचार करा.


तळटीप: वरील विचार वाचून कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो की, तुम्ही असा विचार कसा काय मांडू शकता? तर या वर उत्तर एकच..वस्त्र बाईचं, निर्णय बाईचा!

 


 

दक्षिण कोरियात बायकांनी जगजाहीर उचललेलं एक पाऊल!

अगदी काही दिवसांपूर्वीच दक्षिण कोरियात एक हॅशटॅग मोठय़ा प्रमाणात ट्रेंड झाला. त्याचं नाव #NOBRA . दक्षिण कोरियाई अभिनेत्री आणि गायिका सल्लीने आपले ब्रालेस कपडय़ातले फोटो इन्स्टाग्रामवर टाकले. ती अतिशय लोकप्रिय असल्याने आणि तिचे अकाऊण्ट मिलीअन डॉलर्स अकाउण्ट असल्यानं ते फोटो आणि ट्रेण्ड जोरदार पसरले. त्यासोबत अनेक मुलींनीही तिच्या विचाराला पाठिंबा देत आपण ब्रा न वापरण्याचे जाहीरपणो सांगितले. हवासा नावाच्या गायिकेनंही त्याला पाठिंबा दिला.
आपलं शरीर, कपडे, त्यांची निवड आणि मोकळेपणा यावर बाईचाच अधिकार असावा असं म्हणणारी सल्ली या चळवळीचा सध्या चेहरा बनली आहे. जगभर त्या चळवळीची चर्चा असून अनेक देशातल्या बायका त्यासमर्थनार्थ समोर येत आहेत.


(लेखिका स्त्रीवादी कार्यकर्त्या आहेत.)

Web Title: no bra movement in the world, why women saying no bra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Womenमहिला