आपल्या रोजच्या सवयी आपल्या आरोग्याबाबत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आपण कधी झोपतो, कधी उठतो, काय खातो, पितो या सगळ्यांचा परिणाम शेवटी आरोग्यावरच होत असतो. पण आपल्या सवयी या फक्त आपल्या आरोग्यापूरत्याच मर्यादित नसून त्या आपल्या सौंदर्यावरही परिणाम करतात. आपल्या रोजच्या सवयी आणि सौंदर्य यातला संबंध उलगडून बघण्याचा प्रयत्न तज्ज्ञांनी केला . यातून जे निष्कर्ष हाती लागले त्याद्वारे तज्ज्ञ सौंदर्यासाठी आपल्या काही सवयींकडे जागरुकपणे पाहाण्याची आणि या सवयी अंगी बाणवण्याची गरज असल्याचं सांगतात.
सवयी आणि सौंदर्य
१ झोप पूरेशी झाली आहे ना?
रोज सकाळी उठल्यानंतर आरशात चेहेरा पाहावा. आपले डोळे आपल्या झोपेबाबत खूप काही सांगून जातात. झोपेबाबत २०१३ मधे झालेला अभ्यास सांगतो की जर झोप कमी झाली तर डोळे सूजल्यासारखे वाटतात, लाल दिसतात. सतत झोप अपुरी होत असल्यास डोळ्यांखाली काळी वर्तुळं येतात. डोळे झोपाळू दिसतात. कमी झोपेचा परिणाम म्हणजे कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन ताण निर्माण करणारं हार्मोन जास्त प्रमाणात स्त्रवतं. कॉर्टिसॉल वाढलं की त्याचा परिणाम म्हणून कोलॅजन कमी होतं. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी कोलॅजनची गरज असते. म्हणून तज्ज्ञ सुंदर दिसायचं असेल तर पुरेशी झोप झाली आहे ना याकडे लक्ष देण्यास सांगतात.
२ रोज शरीरातून घाम निघतो का?
रोजच्या व्यायामाचं महत्त्व सौंदर्याच्या भाषेत सांगायचं झालं तर रोज व्यायाम करणाऱ्याची त्वचा त्याच्या वयाच्या निम्म्या वयाची दिसते. रोज जास्त नाही पण थोडा व्यायाम केला तरी त्याचे परिणाम दिसतातच. व्यायामामूळे शरीरातून निघणारा घाम हा शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर टाकण्यास फायदेशीर ठरतो.
३) आपण सावलीतूनच चालतोय ना?
ॠतू कोणताही असला तरी सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. पण उन्हाळ्यात सूर्याच्या घातक यूव्ही किरणांपासून वाचण्यासाठी केवळ सनस्क्रीन पुरेसं ठरत नाही. त्यामुळे सकाळी १० ते दुपारी चारच्या दरम्यान घराबाहेर असताना आपण चेहेऱ्याला सनस्क्रीन सोबतच स्कार्फनं झाकलंय ना याची काळजी घ्यावी. प्रखर उन्हातले किरणं टाळण्यासाठी रस्त्याच्या कडेच्या सावलीचा आधार घ्यावा. यूव्ही किरणांमूळे त्वचेखालील कोलॅजन निर्मितीस अडथळा येतो. त्यामुळे हे किरणं टाळणंच जास्त सोयिस्कर.
४) पाणी कमीतर पित जात नाही?
आपल्या त्वचेखाली ह्यालूरोनिक अॅसिड असतं. जे नैसर्गिकरित्या आढळतं. हे आद्रता टिकवून ठेवण्याचं चूंबक आहे. आपण जे पाणी पितो, फळं आणि भाज्या खातो त्यातलं पाणी त्वचेत शोषून घेण्याचं काम हे अॅसिड करतं. पण जेव्हा आपण पुरेसं पाणी पित नाही तेव्हा इतर अवयवांकडे पाणी निघून जातं. आणि त्वचा कोरडी पडते. म्हणून आपण पुरेसं पाणी पितो आहे ना हे बघणं गरजेचं आहे. फक्त पाणीच नाहीतर पाणीदार फळं, भाज्या आपण खातोय ना याकडेही लक्ष द्यावं. त्वचा जेवढी ओलस राहाणार तेवढी ती ताजीतवानी आणि तरुण दिसणार.
५) आपण आनंदी आहोत ना?
काळजी तणाव हे सौंदर्यास मारक ठरणारे घटक आहे. तणाव असला की त्वचेखालील कोलॅजन निर्मितीस अडथळा येतो, २०१३ मधे ताण आणि सौंदर्य याबाबत झालेल्या अभ्यासाचा निष्कर्ष सांगतो की जेव्हा महिलांमधे ताण निर्माण करणारे हार्मोन जास्त क्रियाशील असतात तेव्हा त्या कमी आकर्षक दिसतात. त्यामुळे ताण येत असेल तर तो घालवण्यासाठी ध्यान धारणा हा उपाय फायदेशीर ठरत असल्याचं अभ्यासात आढळून आलं आहे. मसाज, मेनिक्यूअर-पेडिक्यूअर या उपायांनी ताण निवळून आनंद वाटतो. त्यामूळे ताण घालवून आनंदी राहिल्यास चेहेरा सुंदर दिसतो असं अभ्यास सांगतो.
६) चेहेरा स्वच्छ ठेवतोय ना
आपल्या त्वचेखाली पेशींमधे सतत उलाढाल होत असते. पेशींची निर्मिती होत असते. ती जेव्हा कमी होते तेव्हा आपण वयस्कर दिसायला लागतो. त्यामुळे या पेशींची निर्मिती जोरदार होण्यासाठी बाहेरुन उपाय करणंही गरजेचं आहे. यासाठी आठवड्यातून दोनदा त्वचा रगडून स्वच्छ करणं आवश्यक आहे. त्यासाठी मीठ, साखर, मध,आणि खोबऱ्याचं तेल वापरुन पेस्ट तया करावी. या पेस्टनं त्वचा स्वच्छ करावी. यामूळे त्वचेखालील पेशी निर्मितीला उत्तेजन मिळते आणि चेहेरा तरुण दिसतो.