Join us  

चेहऱ्यावरचं तारुण्य टिकवण्यासाठी ना वेळ हवा ना पैसा, 5 मिनिटं फेस टॅपिंग करा, बघा जादू..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2022 4:27 PM

चेहऱ्यावरचं तारुण्ट टिकवण्यासाठी करा फेस टॅपिंगचा उपाय! काय आहे हे फेस टॅपिंग?

ठळक मुद्देसौंदर्य तज्ज्ञांच्या मते केवळ फेस टॅपिंगच नाही तर सांधे, मान, कंबर या ठिकाणीही टॅपिंग केल्यास अर्थात बोटं नाचवत मसाज केल्यास त्या त्या भागांना ऊर्जा आणि चेतना मिळते.

वय वाढतं तशी त्वचेची लवचिकता कमी होते. चेहऱ्यावर सुरकुत्या,  फाइन लाइन्स दिसायला लागतात. यामुळे चेहऱ्याचं सौंदर्य कमी होतं. हे सौंदर्य मिळवून देण्याचे दावे करणारे अनेक उत्पादनं बाजारात असतात, महागड्या उपचारपध्दती आणि सौंदर्योपचारही असतात. याचाच अर्थ चेहऱ्यावरचं तारुण्य टिकवणं ही सोपी आणि स्वस्तातली बाब नाही. त्यासाठी वेळ आणि पैसे दोन्ही खर्च करावे लागतात. हे वरवर दिसणारं सत्य असलं तरी अशा अनेक न दिसणाऱ्या बाबीही आहेत ज्या या गोष्टीतला अवघडलेपणा, अशक्यपणा दूर करतात.  तशीच एक बाब असून तिची चर्चा यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर सुरु आहे.  सौंदर्यतज्ज्ञ चेहऱ्यावरचं तारुण्य टिकवण्यासाठी एक फुकटातला आणि अगदीच नगण्य वेळ खर्च करुन करता येणारा उपचार सांगतात तो म्हणजे फेस टॅपिंगचा...

Image: Google

काय आहे हे फेस टॅपिंग?

फेस टॅपिंग म्हणजे चेहऱ्यावर बोटं नाचवत चेहऱ्याचा मसाज करणं. एरवीच्या मसाजपेक्षा हा मसाज वेगळा आहे. बोटं चेहऱ्यावर गोल फिरवत नाही तर चेहऱ्यावर बोटं नाचवत फेस टॅपिंग केलं जातं. फेस टॅपिंगमुळे चेहऱ्याच्या त्वचेखालील रक्तप्रवाह सुधारतो. त्वचेखाली कोलॅजन निर्मितीला चालना मिळते. चेहऱ्यावरची सूज कमी होते. फेस टॅपिंमुळे त्वचेखाली विषारी घटक साचत नाही आणि त्वचेला ऑक्सिजनचा पुरवठाही व्यवस्थित होतो. फेस टॅपिंगमुळे चेहऱ्याच्या त्वचेवर आलेला तणाव दूर होतो आणि छान रिलॅक्सही वाटतं. 

Image: Google

फेस टॅपिंग कसं करणार?

फेस टॅपिंग 5 मिनिटात 6 स्टेप्समध्ये केलं जातं. काॅलर बोन, नेक, जाॅलाइन, चीकबोन, आयबोन, फोरहेड या स्टेप्सनं केलं जातं.  चेहऱ्यावर टॅपिंग हे दोन्ही हाताच्या बोटांनी करावं. दोन भुवयांच्या मधल्या बाजूने टॅपिंग सुरु करावं.  पूर्ण भुवया ते कानपट्टीपर्यंत पहिले टॅपिंग करावं. नंतर दोन्ही हातांच्या दोन बोटांच्या सहाय्यानं कपाळावर टॅपिंग करावं. एक मिनिट टॅपिंग झाल्यावर गालापासून कानापर्यंत टॅपिंग करावं. नंतर नाकाच्या उभ्या रेषेत मग ओठांवर , ओठांच्या वरच्या खालच्या बाजूस ते कानाचा खालचा आणि मागचा भाग शेवटी हनुवटी आणि मान असं टॅपिंग करावं. संपूर्ण चेहऱ्यावर टॅपिंग करण्यासाठी केवळ 5 मिनिटं लागतात.

सौंदर्य तज्ज्ञांच्या मते केवळ फेस टॅपिंगच नाही तर सांधे, मान, कंबर या ठिकाणीही टॅपिंग केल्यास अर्थात बोटं नाचवत मसाज केल्यास त्या त्या भागांना ऊर्जा आणि चेतना मिळते. हे अवयव सक्रीय होतात. फेस टॅपिंगमुळे चेहऱ्यावरील स्नायुंना आराम मिळतो. कपाळाला फेस टॅपिंग केल्यानं रक्तप्रवाह सुधारतो. ताण कमी होतो. कपाळाकडील रक्तप्रवाह सुधारल्यानं सुरकुत्या कमी होतात. हलकेपणा जाणवतो.  सौंदर्य तज्ज्ञांच्या मते चेहऱ्यावरचं तारुण्य टिकवण्याचा यापेक्षा सोपा आणि किफायतशीर असा दुसरा उपाय नाही. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडी