जायफळ (nutmeg) म्हणजे स्वयंपाकघरातला सुगंधी मसाला. खीर, बासूंदी, शिरा, लाडू या गोडाच्या पदार्थांना विशिष्ट स्वाद देणारा हा मसाला औषधी गुणांनी समृध्द आहे. आयुर्वेदात जायफळाचा उपयोग(nutmeg benefits) औषधं तयार करण्यासाठी होतो. आरोग्यासाठी फायदेशीर असलेलं जायफळ सौंदर्यसमस्या सोडवण्यातही उपयुक्त आहे. त्वचेशी निगडित अनेक समस्या जायफळाच्या मदतीनं (nutmeg benefits in skin problem) कमी करता येतात. चेहेऱ्यावर काळे डाग किंवा वांगाचे डाग असतील तर जायफळाच्या लेपाचा (nutmeg face pack) चांगला परिणाम होतो.
Image: Google
जायफळामधील गुणधर्मांमुळे त्वचेशी निगडित समस्या सहज सुटतात. जायफळात ॲण्टिऑक्सिडण्टस आणि सूज आणि दाहविरोधी घटक असतात. त्यासोबतच तांबं, फायबर, मॅग्नेशियम, मॅग्नीज यासारखी खनिजं , ब1 आणि ब6 ही जीवनसत्वं असतात. जायफळात असलेले हे सर्व घटक त्वचेसाठी पोषक असतात. या गुणधर्मामुळे त्वचेचं पोषण होवून त्वचा निरोगी राहाते.
Image: Google
त्वचेच्या समस्या आणि जायफळ
तीव्र उन्हामुळे, चेहेऱ्यावर केमिकल्सयुक्त ब्यूटी प्रोडक्टस जास्त प्रमाणात वापरल्यानं , तणाव, भीती या मानसिक आजारांमुळे चेहेऱ्यावर काळ्या डागांची समस्या निर्माण होते. काळे डाग आणि त्वचेशी संबंधित इतर समस्यांमध्ये जायफळच्या लेपाचा चांगला परिणाम दिसून येतो.
1. जायफळातील गुणधर्मांमुळे चेहेऱ्यावरील वांगाचे डाग, काळे डाग कमी होतात. तसेच सूर्याच्या अति नील किरणांमुळे, हार्मोन्स बदलांमुळे निर्माण झालेल्या त्वचेच्या समस्या जायफळमुळे बऱ्या होतात. जायफळाचा लेप चेहेऱ्यास लावल्यास वाढत्या वयानुसार चेहेऱ्यावर पडणारे काळे डाग, वांगाचे डाग या समस्यांचा धोका टळतो.
2. चेहेऱ्यावरील रंध्रं मोठी होतात. यामुळे सीबम ग्रंथी जास्त तेल निर्माण करुन त्वचा तेलकट होते. या समस्येवरही जायफळचा उपाय प्रभावी ठरतो. जायफळमुळे त्वचेची रंध्रं आंकुचन पावतात. जायफळामधील सूज आणि दाहविरोधी गुणधर्मांमुळे चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या या सौंदर्य समस्यांना अटकाव होतो.
3. जायफळामध्ये ॲण्टिऑक्सिडण्टस आणि ॲण्टि एजिंग घटक असतात. हे घटक त्वचेस तरुण राखतात. जायफळामधील ॲण्टि एजिंग गुणधर्म पेशींचं नुकसान करणाऱ्या आणि पेशींच्या दाहास कारणीभूत असणाऱ्या मुक्त मुलकांचं अर्थात फ्री रॅडीकल्सचं नियंत्रण करतात. चेहेरा तरुण दिसण्यासाठी सौंदर्योपचारात जायफळचा अवश्य समावेश करायला हवा.
Image: Google
जायफळचा लेप कसा करावा
जायफळचा लेप तयार करण्यासाठी जायफळ पावडर, लिंबाचा रस आणि दह्याची आवश्यकता असते. एका वाटीत जायफळची पावडर घ्यावी. त्यात लिंबाचा रस आणि दही एकत्र करुन घ्यावं. हे मिश्रण ब्रशनं किंवा बोटानं चेहेऱ्याला लावावी. 10-15 मिनिटं सुकू द्यावी. लेप सुकल्यानंतर हात ओले करुन चेहेऱ्याला हलका मसाज करावा आणि चेहेरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवावा. ओला चेहेरा रुमालानं टिपून घ्यावा आणि चेहेऱ्याला माॅश्चरायझर लावावं. जायफळाचा लेप आठवड्यातून तीन वेळा चेहेऱ्यास लावल्यास चांगले परिणाम दिसतात.