Join us

आधीच तेलकट त्वचा त्यात घामानं वाढतो चिकटपणा, उन्हाळ्यात या दोन गोष्टी लावून दिसाल फ्रेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 12:19 IST

Oily Skin Care: तुम्हीही तेलकट त्वचेमुळे हैराण असाल आणि घरगुती उपायांनी ही समस्या दूर करायची असेल तर आम्ही तुम्हाला दोन उपाय सांगणार आहोत.

Oily Skin Care: तेलकट त्वचा ही अनेकांसाठी मोठी चिंतेची बाब असते. तेलकट त्वचेमुळे वेगवेगळ्या समस्या होत होतातच, सोबतच मेकअपही बिघडतं. चेहऱ्याची चमक कमी होते. आता तर उन्हाळा लागलाय अशात तेलकट त्वचा आणखी त्रास देते. कारण या दिवसात जास्त घाम येतो. अशात तुम्हीही तेलकट त्वचेमुळे हैराण असाल आणि घरगुती उपायांनी ही समस्या दूर करायची असेल तर आम्ही तुम्हाला दोन उपाय सांगणार आहोत. हे नॅचरल उपाय करून तुम्ही त्वचेचा तेलकटपणा आणि घामामुळे झालेला चिकटपणाही कमी करू शकता.

तेलकट त्वचेसाठी नॅचरल उपाय

कोरफड

कोरफडीच्या गरापासून त्वचेला अनेक फायदे मिळतात. तेलकट त्वचेसाठी तर कोरफड खूप जास्त फायदेशीर मानली जाते. कोरफडीच्या गरामधील अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण त्वचेवर अतिरिक्त तेल येण्यापासून रोखतात. तसेच यानं अॅक्नेची समस्याही दूर होते.

कोरफडीच्या गराचा वापर करून त्वचेवरील बंद झालेली रोमछिद्रे मोकळी होतात. त्यामुळे त्वचा आणखी साफ होते आणि चमकदार होते. यासाठी सकाळी आणि सायंकाळी नियमितपणे चेहऱ्यावर कोरफडीचा गर लावा. कोरफडीचा गर तुम्ही रात्रभर चेहऱ्यावर लावून ठेवू शकता. हा उपाय केल्यास त्वचा जास्त तेलकट आणि चिकट दिसत नाही.

काकडी रस

काकडी आरोग्यासाठी किती फायदेशीर असते. हे सगळ्यांनाच माहीत आहे. काकडीमध्ये पाणी भरपूर असतं. त्यामुळे काकडी आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर असते. काकडी रस त्वचेवर लावल्यास त्वचेला व्हिटॅमिन आणि खनिज मिळतात. काकडी किसून त्याचा रस वाटीमध्ये काढा. हा रस असाच तुम्ही त्वचेवर लावू शकता. हवं तर यात थोडा लिंबाचा रसही टाकू शकता. काही वेळ हा रस असाच त्वचेवर राहू द्या आणि नंतर चेहरा धुवून घ्या. काकडीचा रस तुम्ही सकाळी टोनर म्हणूनही लावू शकता. काकडीतील गुणांमुळे त्वचेचा तेलकटपा कमी होईल आणि त्वचा हायड्रेट सुद्धा राहील.

इतर काही उपाय

- त्वचेचा तेलकटपणा दूर करण्यासाठी तुम्ही मुलतानी मातीचाही वापर करू शकता. यात गुलाब जल मिक्स करा आणि चेहऱ्या १५ मिनिटांसाठी लावा. नंतर चेहरा धुवून घ्या.

- त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी आणि चिकटपणा कमी करण्यासाठी तुम्ही कॉफी स्क्रबही वापरू शकता. 

- दह्याचेही त्वचेला अनेक फायदे मिळतात. पातळ दही चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर चेहरा धुवून घ्या.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स