घरोघरी गणपती बसल्यामुळे अनेक अभिनेत्री ट्रॅडिशनल लूक करून गणरायाचे पुजन करत आहेत. पण अभिनेत्री यामी गौतमने तर कमालच केली असून ती चक्क दिड लाखांची साडी नेसून गणेश पुजनासाठी तयार झाली होती. बनारसी प्रकारातली ही साडी अतिशय सुंदर असून यामी यामध्ये खूपच आकर्षक दिसत आहे. तिने तिचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले असून ते तुफान व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये उठून दिसणारे यामीचे सौंदर्य अतिशय लोभस आहे.
यामीने नेसलेली साडी डिप पिंक रंगाची आहे. यावर यामीने पुर्णपणे कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाऊज घातले आहे. थोडेसे पोपटी रंगाचे असणारे हे ब्लाऊज लांब बाह्यांचे आहे. या साडीवर यामीने घातलेले दागिणेही चर्चेचा विषय ठरले आहेत. केसांचा घातलेला अंबाडा यामीला अधिक आकर्षक लूक देणारा ठरला आहे. भारतीय हातमाग लक्झरी ब्रँडने या साडीचे डिझाईन केले असून यामीचे दागिने शिवानी शर्मा यांनी डिझाईन केले आहेत. या साडीची किंमत तब्बल १ लाख ६२ हजार २७५ रूपये आहे, असे सांगितले जाते.
यामीच्या साडीची खासियत
५. ५ मीटर लांबीची ही साडी पुर्णपणे हातमागाने तयार करण्यात आली असून साडीवरचे काम अतिशय सुबक आणि देखणे झाले आहे. साधारणपणे बनारसी साड्या सोनेरी आणि चंदेरी जरीमध्ये विणल्या जातात. यामीच्या साडीवर या दोन्ही जरींनी काम करण्यात आले आहे. बनारसी साड्यांंचे अनेक वेगवेगळे प्रकार असतात. साडीवरचे विणकाम कसे आहे किंवा कोणती नक्षी साडीवर विणण्यात आली आहे, यावरून बनारसी साडीचा प्रकार ठरतो. जामदनी, जंगला, जामवार-तंचोई, टिश्यू, कटवर्क, बुट्टीदार अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बनारसी साड्या मिळतात. या प्रत्येक प्रकारच्या साडीला भारतात आणि परदेशातही प्रचंड मागणी आहे. यामध्ये यामीने नेसलेली साडी ही जामदनी प्रकारातली आहे.
बनारसी जामदनी साडीचे वेगळेपण
बनारसी साड्यांमध्ये असणारा जामदनी हा प्रकार ‘फिगर्ड मस्लीन’ या प्रकारचे विणकामाचे तंत्रज्ञान वापरून तयार केला जातो. साडीवर जी नक्षी विणायची आहे, त्यानुसार त्याचे विणकाम केले जाते. हे सर्वच विणकाम कौशल्यपूर्ण असते. जामदनी साडीमध्ये चमेली, पन्ना हजार, झेंडूच्या फुलांच्या आकाराची बुट्टी, पान बुट्टी, तिरके पट्टे असे पारंपरिक नक्षीकाम केले जाते. साडीच्या कोपऱ्यात आंब्याच्या मोहरासारखे बुट्टे हा पण जमदानी साडी प्रकारातला एक विशेष प्रकार आहे. जामदानी हे पर्शियन नाव आहे. या नावातूनच मुघल शैलीचा प्रभाव दिसून येतो. "जाम" म्हणजे फूल आणि "दानी" म्हणजे फुलदाणी.
म्हणूनच जामदानी प्रकारात मोडणाऱ्या बनारसी साड्यांवर मोठ्या आकाराची फुले प्रकर्षाने दिसून येतात. तुम्हालाही यामी सारखी बनारसी साडी घ्यायची असेल, तर त्यासाठी तुमच्याकडे लाखभर रूपयेच असायला हवेत असं काही नाही. ज्याप्रमाणे पैठणी साड्या अगदी ६- ७ हजारांपासून ते लाखो रूपयांपर्यंत उपलब्ध असतात, तसाच प्रकार बनारसी साड्यांचाही आहे. या साड्यांची रेंज १० हजारांपासून सुरू होते. त्यामुळे तुम्ही देखील पुढे येणाऱ्या सणवारांसाठी यामीसारखा इथनिक, ट्रॅडिशनल लूक करू शकता.