आरोग्यासाठी दुधाचं महत्त्वं अनन्यसाधारण आहे. एक ग्लास/ एक कप दूध पिण्याचे असंख्य फायदे आहेत हे आपल्याला माहित आहेच पण त्वचेची काळजी घेण्यासाठीही दूध खूप महत्त्वाचं आहे. त्वचेची काळजी आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी एक चमचा दूधही पुरे होतं. कारण दुधात असलेले घटक त्वचेच्या अनेक समस्या सहज दूर करतात. कोणत्याही ॠतूत त्वचेसाठी दूध हे लाभदायक ठरतं. आपल्या त्वचेचं आयुष्य वाढवण्यास दूध हे मदत करत असतं. कच्चं दूध किंवा तापवलेलं दूध कोणत्याही प्रकारे दूध त्वचेसाठी वापरल्यास त्याचा फायदा दिसतो, दुधात असलेल्या घटकांंमुळे त्वचा स्वच्छ होण्यास, त्वचा आर्द्र राखण्यास , सुरकुत्या रोखण्यस , त्वचेचा वर्ण सूधारण्यास आणि सूर्याच्या प्रखर किरणांमुळे झालेलं त्वचेचं नुकसान भरुन काढण्यास दूध खूप उपयुक्त मानलं जातं.
त्वचेसाठी दूध वापरल्यास काय घडतं?
- खरंतर जसं वय वाढतं , त्याचा इतर अवयवांवर जसा परिणाम होतो तसाच परिणाम त्वचेवरही होतं. वयाप्रमाणे त्वचा बदलणं साहजिकच आहे. पण अनेक कारणांमुळे अनेकजणींच्या बाबतीत त्वचेचं वय होण्याची म्हणजेचं एजिंगची प्रक्रिया लवकर सुरु होते . कमी वयात त्वचा खराब होते, सुरकुतलेली दिसते. अशा परिस्थितीत त्वचेसाठी दूध वापरल्यास दुधातील लॅक्टिक अॅसिड हे सुरकुत्या कमी करण्याचं काम करतं. त्याचा परिणाम म्हणजे त्वचा तरुण दिसते आणि चमकतेही.
- एक्सफोलिएशन ही त्वचा स्वच्छ करण्याची प्रक्रिया नियमित होणं खूप गरजेचं असतं. या प्रकियेमुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातात आणि त्वचा मऊ-मुलायम होते. यासाठी केवळ दूध त्वचेला लावलं तरी चालतं किंवा लेपामधे दूध घालून तो लेप चेहेऱ्याला लावल्यास त्याचा फायदा त्वचेला होतो. दुधामूळे त्वचा सहज स्वच्छ होते.
- सतत उन्हात राहिल्याची किंमत सर्वात आधी त्वचेलाच चुकवावी लागते. दुधातील लॅक्टिक अॅसिड सुर्याच्या प्रखर किरणांमुळे त्वचेचं होणारं नुकसान रोखतं. यासाठी थंड दूध घ्यावं. ते कापसाच्या बोळ्यानं संपूर्ण चेहेऱ्याला लावावं.
- दुधात त्वचा नैसर्गिकरित्या आर्द्र ठेवणारे घटक असतात. या आर्द्रतेमुळे त्वचा कोरडी पडून होणारं त्वचेचं नूकसान टळतं. दूधाच्या नियमित वापरानं त्वचा निरोगी आणि सूदृढ होते. त्वचा आर्द्र ठेवण्यासाठी दूध वापरुन वेगवेगळे लेप तयार करुन ते चेहेऱ्यावर लावता येतात.
- दुधात भरपूर जीवनसत्त्वं असतात. त्याचा उपयोग त्वचेची निगा राखण्यास होतो. मुरुम पुटकुळ्या येणाऱ्या त्वचेसाठी कच्च्या दुधाचा उय्पयोग करावा. दूध त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि त्यामुळे चेहेऱ्यावर जमा झालेली घाण काढून टाकतं. दुधातील लॅक्टिक अॅसिड मुरुम पुटकुळ्यांसाठी कारणीभूत असलेल्या सूक्ष्मजीवजंतूपासून त्वचेचं संरक्षण करतं. कच्चं दूध कापसाच्या बोळ्यानं चेहेऱ्याला नियमित लावल्यास चेहेऱ्यावरील मुरुम पुटकुळ्या निघून जातात.
दूध घातलेले लेप
- एका वाटीत थोडं बेसन पीठ आणि कच्चं दूध घ्यावं. त्यात चिमूटभर हळद आणि एक चमचा मध घालावं. चेहेऱ्यावर चमक येण्यासाठी हा लेप पंधरा मिनिटं ठेवावा आणि मग गार पाण्यानं धुवावा. हा लेप आठवड्यातून दोन वेळेस लावावा.
- जेव्हा मध आणि लिंबाच्या रसात कच्च दूध घातलं जातं तेव्हा ते नैसर्गिक ब्लिचचं काम करतं. त्यासाठी एक चमचा कच्च दूध, अर्धा चमचा मध आणि लिंबाचा थोडा रस घ्यावा. हा लेप चेहेरा आणि मानेला लावावा. दहा मिनिटानंतरंंचेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.
- मुलतानी मातीत दूध घालून ते चेहेऱ्यासाठी वापरल्यास त्वचा स्वच्छ आणि मऊ होते. त्यासाठी एक चमचा मुलतानी माती घ्यावी त्यात अर्धा चमचा दूध घालावं. ते निट मिसळून त्याची दाटसर पेस्ट करावी. ती चेहेरा आणि मानेला लावावी. पंधरा-वीस मिनिटानंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. आठवड्यातून दोन वेळेस हा लेप लावल्यास त्वचेवर चांगले ;परिणाम दिसतात.
- चंदन हे त्वचेसाठी उत्तमच असतं. त्यामूळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते. दूधात अनेक जीवनसत्त्वं असतात. त्यामूळे त्वचेचं पोषण होतं. याचा एकत्रित् परिणाम अनूभवण्यासाठी चंदन आणि दूधाचा मिळून लेप करावा. त्यासाठी एक चमचा उगाळलेलं चंदन किंवा चंदन पावडर घ्यवी आणि अर्धा चमचा दूध घ्यावं. ते नीट मिसळून चेहेºयास लावावं. पंधरा मिनिटांनी चेहेरा धूवून टाकावा.
- ओटमीलचा उपयोग नैसर्गिक स्क्रबसारखा होतो. ओटमील जेव्हा दूधासोबत वापरलं जातं तेव्हा ते उत्कृष्ट उटण्याचं काम करतं. त्यासाठी एक चमचा ओटमील आणि त्यानूसार दूध घ्यावं. त्याची दाटसर पेस्ट करावी. आणि हा लेप हलका मसाज करत चेहेऱ्यास लावावा. दहा मिनिटांनी चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.