Join us  

Hair Problems : कांदा किसा - रस काढा आणि..? केसांच्या सर्व तक्रारींवर घ्या रामबाण उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2022 4:30 PM

Onion For Hair: केसांच्या अनेक समस्यांवर स्वयंपाकघरातला सोपा उपाय... कांदा किसा-  रस काढा अन केसांना लावा. 

ठळक मुद्देकांद्याचा रस केसांना लावणं, विविध तेलांमध्ये कांद्याचा रस मिसळून ते मिश्रण केसांना लावणं आणि कांद्याचं तेल तयार करुन केसांना लावणं या प्रकारे केसांना कांदा लावता येतो.

कांदा स्वयंपाकघरातली एक अत्यावश्यक बाब. कांद्याशिवाय  स्वयंपाक असा विचार करणंही अनेकींना जमत नाही. स्वयंपाक करताना कांदा रडवतो तरीही तो हवाहवासा असतो. कांद्याची ख्याती ही फक्त स्वयंपाकघरापुरती मर्यादित नाही. सौंदर्योपचारातही कांद्याला महत्व आहे. विशेषत: केसांसाठीच्या उपचारात कांदा विशेष महत्वाचा आहे. सेलिब्रेटी हेयर स्टायलिस्ट प्रियंका बोरकर केसांसाठी कांद्याचं महत्व (Onion for hair) सविस्तर सांगतात.  कांद्यामध्ये केटालेस नावाचं ॲण्टिऑक्सिडेण्ट असतं ते केसांच्या वाढीसाठी महत्वाचं असतं. कांद्यामध्ये असलेल्या सल्फरमुळे केसांच्या मुळांचं पोषण होतं. केस मजबूत होण्यासाठी आणि केसांची वाढ होण्यासाठी म्हणूनच कांदा फायदेशीर असतो. ( onion benefits for hair). कांदा विविध पध्दतीनं केसांना लावून केसांना  आवश्यक असलेलं  पोषण देता येतं. कांद्याचा रस केसांना लावणं, विविध तेलांमध्ये कांद्याचा रस मिसळून ते मिश्रण केसांना लावणं आणि कांद्याचं तेल तयार करुन केसांना लावणं या प्रकारे केसांना कांदा लावता येतो. केसांना कांदा कसा लावावा हे समजून घेताना केसांसाठी कांदा का गरजेचा हे समजून घेणंही आवश्यक आहे. 

Image: Google

केसांसाठी कांदा का गरजेचा?

1. केसांना कांदा लावल्याने केस लवकर पांढरे होत नाही. 

2. कांद्यामध्ये जिवाणुविरोधी गुणधर्म असतात. कांदा केसांना लावल्यानं केसांच्या मुळांना संसर्ग होत नाही. 

3. कांद्यामुळे केसांची वाढ होते. 

4. कांद्यामधील गुणधर्म केसात कोंडा होवू देत नाही. 

5. कांद्याच्या रसानं केसांच्या मुळाशी मसाज केल्यास रक्त प्रवाह सुधारतो आणि केस वाढण्यास मदत होते. कांद्यामुळे केसांशी निगडित समस्यांवर योग्य उपचार होत असल्यानं केसांना कांदा लावणं गरजेचा आहे असं प्रियंका बोरकर सांगतात. केसांना कांदा लावण्याचे  विविध मार्ग प्रियंका यांनी सांगितले आहेत. 

Image: Google

कांद्याचा रस केसांना कसा लावावा?

1. कांद्याचा रस केसांना लावण्यासाठी एक मोठा कांदा  आणि कापूस घ्यावा. कांदा किसावा. कांद्याचा कीस सूती कापडानं पिळून  त्याचा रस काढावा. कापसाचा बोळा कांद्याच्या रसात भिजवून तो केसांच्या मुळाशी लावावा. संपूर्ण केसांना कांद्याचा रस लावावा. केसांना कांद्याचा रस लावल्यानंतर एक तासानं केस शाम्पूनं धुवावेत. 

2. ऑलिव्ह ऑइलमध्ये कांद्याचा रस मिसळून लावता येतो. यासाठी 3 चमचे कांद्याचा रस आणि दीड चमचा ऑलिव्ह ऑइल घ्यावं.  तेल आणि कांद्याचा रस चांगला मिसळून घ्यावा. हे मिश्रण केसांच्या मुळाशी गोलाकार मसाज करत लावावं. दोन तासांनी केस सौम्य शाम्पूनं धुवावेत. 

Image: Google

3.  2 चमचे खोबऱ्याचं तेल आणि 2 चमचे कांद्याचा रस घ्यावा. यात टी ट्री ऑइलचे 5 थेंब घालावेत. या तिन्ही गोष्टी एकत्र मिसळून घ्याव्यात. हे मिश्रण केसांना लावून केसांच्या मुळाशी मसाज करावा. मसाज केल्यानंतर अर्धा तास ते केसांवर राहू द्यावं आणि नंतर केस सौम्य शाम्पूनं धुवावेत.

4.  2 चमचे एरड्याचं तेल  आणि 2 चमचे कांद्याचा रस घ्यावा. हे दोन्ही चांगलं एकत्र करुन घ्यावं. हे मिश्रण केसांना मसाज करत लावावं. तासाभराने केस शाम्पूनं केस धुवावेत.

केसांना लावा  कांद्याचं तेल

कांदा केसांना लावण्याचा आणखी एक प्रकार म्हणजे कांद्याचं तेल. कांद्याचं तेल करण्यासाठी कांदा किसून त्याचा रस काढावा किंवा कांद्याची पेस्ट तयार करावी. एका कढईत थोडं खोबऱ्याचं तेल घ्यावं. तेल गरम करावं. गरम तेलात कांद्याचा रस किंवा कांद्याची पेस्ट घालून मंद आचेवर तेल गरम होवू द्यावं. थोड्या वेळानं गॅस बंद करावा. मिश्रण थंडं होवू द्यावं. हे तेल सूती कापडानं गाळून घ्यावं. कांद्याचं हे तेल हवाबंद बाटलीत भरुन ठेवावं. हे 6 महिने चांगलं राहातं. कांद्याच्या तेलाला उग्र वास येतो. त्यामुळे रात्री झोपताना हे तेल लावून सकाळी केस शाम्पूनं धुवावेत.

Image: Google

 

कांद्याचं तेल केसांना का लावावं?

1. कांद्याच्या तेलातील सल्फरमुळे केसांना उंदरी लागणं, केस गळणं या समस्या दूर होतात. कांद्याचं तेल केसांना लावल्यास केस दाट होतात. कांद्याच्या तेलामुळे केसांचा पीएच स्तर राखला जातो आणि केस लवकर पांढरे होत नाही. 

2. वेगवेगळ्या जिवाणू संसर्गामुळे केस गळण्याची समस्या निर्माण होते. कांद्याच्या तेलामुळे केस गळणं थांबतं. केस गळती रोखण्यासाठी कांद्याच्या तेलानं केसांना रोज मसाज करणं आवश्यक आहे. 

3. कांद्याच्या तेलातील ॲण्टिऑक्सिडेण्टसमुळे केसांच्या मुळांचं पोषण होतं. 

4. कांद्याचं तेल केसांसाठी नैसर्गिक कंडीशनरसारखं काम करतं. कांद्याचं तेल केसांना लावल्यानं केस मऊ होतात. कांद्याच्या तेलामुळे रुक्ष केसांची समस्या मिटते.

 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्सकांदाहोम रेमेडी