लग्नसराई म्हटली की लग्नाचे वेगवेगळे विधी आणि मुख्य लग्नाचा दिवस म्हणजे भरजरी सिल्कची साडी नेसणे आले. घरातील लग्न असेल तर मग या साडी नेसण्याला काही पर्यायच नसतो. वेगवेगळे विधी आणि शुभ कार्य असल्याने छान सिल्कची साडी नेसायची असते. पण दिवसभर कामं करताना आणि वावरताना ही साडी सुटणार तर नाही ना अशी भिती मनात सारखी पिंगा घालत असते. पैठणी, कांजिवरम, तसर, नारायणपेठी, प्युअर सिल्क अशा एक ना अनेक प्रकारांमध्ये मिळणारी आणि तितकीच खुलून दिसणारी सिल्क साडी. ही साडी बराच वेळ परफेक्ट, चापूनचोपून राहावी यासाठी काही खास टिप्स पाहूया...
१. सिल्कची साडी नेसताना परकर व्यवस्थित घट्ट बांधला आहे ना याची खात्री करा. तसेच परकर खूप खाली बांधू नका, कारण काही वेळाने साडी तिच्या वजनामुळे खाली घसरण्याची शक्यता असते.
२. साडी नेसायला सुरुवात करताना सर्वात आधी खोचताना त्याठिकाणी एक गाठ मारा, त्यामुळे साडी कितीही ओढली गेली तरीही सुटणार नाही. या एका गाठीमुळे तुम्ही सेफ राहाल.
३. लग्नसमारंभ असल्याने आपण थोडी हेवी साडी नेसणार असलो तर सिल्कच्या साडीचा काठ थोडा जाड असण्याची शक्यता असते. अशावेळी साडी खोचताना एकदम एकसारखी खोचा, जेणेकरुन ती फुगल्यासारखी वाटणार नाही.
४. साडीच्या पुढच्या बाजुच्या निऱ्या घातल्यानंतर वरती हातात असलेला भाग आपण आतमध्ये खोचतो. त्यावेळी त्या भागाला पीन लावून मगच आत खोचा म्हणजे तो एकसारखा आत जाईल आणि पोटापाशी बोंगा आल्यासारखे दिसणार नाही.
५. निऱ्यांच्या डावीकडे साडी सुळसुळीत असल्याने काही प्लेटस आलेल्या असतात. पण एरवी आपण ज्याप्रमाणे या प्लेटस अॅडजस्ट करतो त्याप्रमाणे सिल्कच्या साडीचे करता येत नाही. त्यामुळे पाठीमागून काठ डाव्या कंबरेवर परफेक्ट येईल असे बघा. हाच काठ निऱ्यांच्या आतल्या बाजुने उजव्या बाजूला वर काढा आणि परकरमध्ये खोचून टाका. यामुळे साडी चोपून नेसल्यासारखी दिसेल आणि हलणारही नाही.
६. सिल्कची साडी असल्याने ती जास्त सुळसुळीत असेल तर पदराला पीन लावली तरी पुढच्या बाजुने पदर सतत खाली येण्याची शक्यता असते. अशामुळे पदराच्या छातीवरील प्लेटस नीट दिसत नाहीत. त्यावेळी छातीपाशी दोन ते तीन पदर एकत्र घेऊन लक्षात येणार नाही अशी एखादी पीन लावा. त्यामुळे पदर जागेवर राहायला मदत होईल.
७. सिल्कची साडी कधीकधी थोडी फुगल्यासारखी होऊ शकते त्यामुळे ती क़डक इस्त्रीची असणे गरजेचे असते. साडी नेसण्यापूर्वीच तुम्ही पदरीच्या निऱ्या घालून त्याला पीन लावून इस्त्री करुन ठेवू शकता. त्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि साडी झटपट नेसून होईल.