उन्हाळ्यात त्वचा सुरक्षित ठेवण्यासाठी सनक्रीन लोशन किंवा क्रीमची आवश्यकता असते. त्वचा जपण्यासाठी आपण् सनस्क्रीन आणतोही. मात्र सनस्क्रीनचा उपयोग आवर्जून करताना आपल्याकडील नैसर्गिक सनस्क्रीनचा मात्र विसर पडतो. आपल्या त्वचेत असलेलं मेलानिन हे नैसर्गिक सनस्क्रीनसारखंच काम करतं. त्वचेत असलेल्या मेलानिनमुळे डोळ्यांची बाहुली, केस आणि त्वचेला रंग प्राप्त होतो. त्वचेच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी मेलानिन हा घटक महत्त्वाचा असतो.
Image: Google
मेलानिन हा घटक नैसर्गिक रंगद्रव्य म्हणून ओळखला जातो. सूर्यापासून निघणाऱ्या हानिकारक किरणांपासून त्वचेचं संरक्षण होण्यासाठी मेलानिन पुरेशा प्रमाणात असणं आवश्यक असतं. त्वचेचा कर्करोग, एजिंग या समस्यांपासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी त्वचेत पुरेशा प्रमाणात मेलानिनची गरज असते. मेलानिनचं प्रमाण आपण आपल्या आहार विहाराच्या सवयीतून, आहारातल्या महत्त्वाच्या घटकांद्वारे सांभाळू शकतो.
त्वचेतील मेलानिनचं प्रमाण वाढवण्यासाठी
Image: Google
1. त्वचेतील मेलानिन वाढवण्यासाठी ई आणि क जीवनसत्त्व महत्त्वाचे असतात. भरड धान्यं, बिया, फळं, भाज्या यातून ई जीवनसत्व मिळतं. तर संत्री,द्राक्षं याद्वारे क जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळतं. हिरव्या भाज्या, टमाटा, ब्रोकोली या भाज्यांमधून ई आणि क ही दोन्ही जीवनसत्वं मिळतात तसेच ॲण्टिऑक्सिडण्टसही मिळतात. मेलानिनचं प्रमाण वाढण्यासाठी ॲण्टिऑक्सिडण्टस महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे त्वचेची हानी टळते आणि मेलानिनचं प्रमाण योग्य राहातं.
Image: Google
2. त्वचेत ड जीवनसत्व निर्माण होण्यासाठी त्वचेत मेलानिनचं प्रमाण योग्य असायला हवं. मेलानिन आणि ड जीवनसत्व एकमेकांवर अवलंबून असतात. ड जीवनसत्व मिळवून मेलानिन वाढवण्यासाठी पुरेसा सूर्यप्रकाश अंगावर घेणं हा चांगला पर्याय असल्याचं तज्ज्ञ सांगतात. सकाळच्या कोवळ्या उन्हात किमान अर्धा ते एक तास बसण्याचा/ चालण्याचा सल्ला दिला जातो.
Image: Google
3. त्वचेत मेलानिनचं प्रमाण वाढवण्यासाठी केसांना भृंगराज तेलात त्रिफळा चूर्ण मिसळून हे मिश्रण केसांना लावल्यास मेलानिन वाढण्यास मदत होते. त्रिफळा चुर्णात त्रिफळा, बहेडा, आवळा आणि हरड या आयुर्वेदिक घटकांचा समावेश असतो. आणि म्हणूनच भृंगराज तेलात त्रिफळा घालून तयार होणाऱ्या मिश्रणास मेलानिन वाढवण्यासाठीचं नैसर्गिक टाॅनिक म्हटलं जातं. हे मिश्रण नियमित वापरल्यास केसांना त्यांचा मूळ रंग पुन्हा प्राप्त होतो.
Image: Google
4. त्वचेतलं मेलानिन वाढण्यासाठी तांबं आणि लोहयुक्त पदार्थांचं सेवन वाढवायला हवं असं तज्ज्ञ सांगतात. यासाठी आहारात जवस, पालक, डार्क चाॅकलेट याचा समावेश असायला हवं. गुळाच्या पाण्याचं सेवनही मेलानिन वाढण्यास फायदेशीर मानलं जातं.
Image: Google
5. बीटा केरोटीन आणि अ जीवनसत्वामुळे त्वचेतील मेलानिनचं प्रमाण वाढतं. बीटा केरोटिनचं रुपांतर चरबीत होतं. यामुळे त्वचेला नैसर्गिक तजेला मिळतो. तर अ जीवनसत्वात ॲण्टिऑक्सिडण्टस असतात. यामुळे त्वचेत मेलानिनची निर्मिती होण्यास चालना मिळते. बीटा केरोटीन आणि अ जीवनसत्व मिळून मेलानिन वाढण्यासाठी आहारात पालक, ब्रोकोली, संत्री, गाजर, टमाटा, रताळी , पपई, भोपळा या भाज्या आणि फळांचा आवर्जून समावेश करायला हवा.