लग्नसराई असो किंवा एखादे लहानसे फंक्शन असो आपण आवर्जून मेकअप करतो. डिसेंबर म्हणजे पार्टी आणि सेलिब्रेशनसाठी खास असा महिना. अशावेळी बाहेर जाताना तुम्ही आपण छान आणि सगळ्यांमध्ये उठून दिसायला हवे असे प्रत्येकाला वाटते. अशावेळी मेकअप करताना काही किमान गोष्टींची आपल्याला माहिती असायला हवी. मेकअप करताना त्याआधी चेहऱ्यावर काय लावावे, ते कसे लावावे याबाबत समजून घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन आपला मेकअप चेहऱ्यावर चांगला बसायला मदत तर होईलच पण हा मेकअप दिर्घकाळ टिकण्यासही त्यामुळे मदत होईल. प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. जयश्री शरद यांनी याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याशी शेअर केल्या आहेत. इन्स्टाग्रामवर एका व्हिडिओच्या माध्यमातून त्या आपल्याशी या टिप्स शेअर करतात, पाहूया या गोष्टी कोणत्या (Order of layering Skincare Products Before Makeup)...
१. सिरम
सगळ्यात आधी चेहऱ्यावर सिरम लावायला हवे. बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांची सिरम मिळतात, त्यापैकी आपल्या त्वचेला सूट करणारे चांगल्या प्रतीच्या सिरमची निवड करणे आवश्यक असते. सिरम त्वचेच्या एकदम आतल्या लेअरपर्यंत लवकर शोषले जाते. तसेच त्वचेला काही समस्या असतील तर त्या दूर होण्यास सिरमचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे चेहऱ्याला सगळ्यात पहिला लेअर सिरमचा लावावा.
२. मॉईश्चरायजर
मॉईश्चरायजर याचाच अर्थ त्वचेतील मॉईश्चर म्हणजे आर्द्रता टिकून राहण्यासाठीचे लोशन. थंडीच्या दिवसांत किंवा एरवीही आपली त्वचा काही कारणाने रुक्ष होते अशावेळी त्यावर मॉईश्चरायजर लावणे अतिशय आवश्यक असते. त्वचेचे बाहेरील धूळ, प्रदूषण यांसारख्या गोष्टींपासून रक्षण करण्यासाठीही मॉईश्चरायजर अतिशय उपयुक्त असते. त्यामुळे आपल्या आवडीचे आपल्याला सूट होईल असे मॉईश्चरायजर सिरमनंतर लावावे.
३. सनस्क्रीन
आपण ज्या गोष्टीकडे फारसे गांभिर्याने पाहत नाही ती गोष्ट म्हणजे सनस्क्रीन लोशन. अनेकदा आपण घराबाहेर पडताना हे लावण्याचा खूप कंटाळा करतो. पण त्यामुळे त्वचेच्या बहुतांश समस्या उद्भवताना दिसतात. सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण होण्यासाठी सनस्क्रीन लोशन अतिशय आवश्यक असल्याने घरात असताना किंवा बाहेर जाताना मेकअपच्या आधी तिसरा कोट हा सनस्क्रीनचा लावावा.