हिवाळा सुरू झाला. या थंडीच्या मौसमात अनेकांची त्वचा कोरडी, निस्तेज पडते. अधिक करून स्किन ड्रायनेसचा सामना लोकांना करावा लागतो. मात्र, असे देखील काही लोकं आहेत, ज्यांचे पाय हिवाळ्यात देखील ओलसर राहतात. पायांना घाम फुटतो. अधिक काळ पायांचे तळवे ओलसर राहिले की दुर्गंधी पसरू लागते. जर आपण तलव्यांच्या ओलसरपणामुळे त्रस्त असाल तर काही घरगुती उपायांचा वापर करून पाहा. ज्याने तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
तुरटीचा करा असा वापर
तुरटीमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, ज्याचा वापर करून पायांपासून घाम येण्याची समस्या दूर करू शकता. याशिवाय पायांना उठणारे फंगल इन्फेक्शन देखील टाळू शकता. यासाठी कोमट पाण्यात एक चमचा तुरटी पावडर टाका. त्यात १५ ते २० मिनिटे पाय बुडवून ठेवा. यामुळे पायाला घाम येणे आणि दुर्गंधी येणे या दोन्ही समस्या दूर होतील.
मीठाचे पाणी ठरेल उपयुक्त
एका टबमध्ये कोमट पाणी घ्या. त्यात पाच ते सात चमचे मीठ टाका आणि अर्धा तास पाय पाण्यात बुडवून ठेवा. पाण्यातून पाय बाहेर काढल्यानंतर, पाय पुसू नका, पायांना स्वतःच कोरडे होऊ द्या. मिठाच्या पाण्यामुळे त्वचा कोरडी होते तसेच घाम येणे थांबते.
तमालपत्राचा वापर
ज्या लोकांच्या पायांना जास्त घाम येतो त्यांनी तमालपत्रचा वापर करून पाहावा. यासाठी काही तमालपत्र पाण्यात चांगले उकळवून घ्या. पाणी थंड झाल्यावर पायांना लावा. असे रोज केल्याने घाम येणे बंद होईल.
ऍपल सायडर व्हिनेगर
पाय स्वच्छ करण्यासाठी ऍपल सायडर व्हिनेगर हा एक उत्तम पर्याय आहे. कोमट पाण्यात अर्धा कप व्हिनेगर घाला आणि त्यात काही वेळ पाय ठेवा. यामुळे पायाची दुर्गंधी निघून जाईल. यासोबतच फंगल इन्फेक्शनसारख्या समस्याही दूर होतील.