पिंपल्स आणि त्वचेवर फोड येण्याचे कारण क्वचितच लोकांना माहित असेल. आजकालचं चुकीचं खानपान, शारीरिक सक्रियता कमी असणं, ताण तणाव यामुळे त्वचा रोगांचा सामना करावा लागतो. यामुळे त्वचेवर पिंपल्स येतात. कोणी शरीरावरच्या तर कोणी तोंडावरील पुळ्यांनी हैराण असते. आज आम्ही तुम्हाला या दोघांमधील फरक सांगणार आहोत.
पिंपल्स काय असतात? (What is Pimple)
त्वचेवर लहान लहान छिद्र असतात ज्यातून तेल बाहेर येत असते. जेव्हा छिद्र भिजलेले असतात म्हणजे तेल, बॅक्टेरिया आणि घाण त्यांच्यात जमा होते. ज्यामुळे पिंपल्स किंवा मुरूम त्वचेवर येतात. पिंपल्स आल्यावर त्वचेवर काळे डाग पडतात. काहीवेळा पिंपल्समुळे कायमस्वरुपी चट्टे येतात. ज्याच्यात पू सुद्धा असू शकतो.
पिंपल्स येण्याची कारणं
पिंपल्स कोणत्याही वयोगटातील लोकांना येऊ शकतात. परंतु बहुतेक ते पौगंडावस्थेतच पाहिले जाते. पौगंडावस्थेतील हार्मोनल बदलांमुळे पिंपल्स येणे सामान्य आहे. परंतु आपल्याला लहान वयात पिंपल्स असल्यास, आपण थोडं सतर्क राहायला हवं. यासाठी आपण त्वचारोग तज्ञांचा सल्ला घ्या. उपाय करूनही पिंपल्स बराच काळ टिकून राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हार्मोनल बदल होणं
गर्भावस्थेतील बदल
गर्भनिरोधक गोळ्याचे अतिप्रमाणात सेवन
टेस्टोस्टेरॉन हार्मोनची वाढ होणं.
उपाय
तोंडावरील पिंपल्स घालवण्यासाठी तुम्ही स्किन केअर रूटीनवर अधिक लक्ष द्यायला हवं. कारण साध्या वाटत असलेल्या पिंपल्सना बरं होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. रोज सकाळी आणि संध्याकाळी त्वचेला साफ, स्वच्छ पाण्यानं धुवायला हवं. क्लिंजर तुमच्या स्किन टाईपनुसार असायला हवं. त्वचेवर माईल्ड माईश्चरायजरचा वापर करायला हवा. त्यामुळे त्वचेवरील कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी आठवड्यातून एकदा सौम्य स्क्रबरनं त्वचा एक्सफोलिएट करायला हवी. यादरम्यान पिंपल्स फोडू नका.
फोड म्हणजे काय?
फोड शरीराच्या कोणत्याही भागावर येऊ शकते. ही एक गाठ आहे जी सुजेमुळे येते आणि हळूहळू त्वचा लाल होत जाते. फोडाचा आकार हळूहळू वाढत जातो. आपल्या ज्या ठिकाणी जास्त घाम येतो तिथे फोड होण्याची शक्यता जास्त असते. जास्तीत जास्त फोड हे मान, अंडरआर्म्स, मांड्या, चेहरा आणि मागच्या भागावर येतात. अनेकदा एकासह अनेक पुळ्या येतात नंतर पुळ्यांच्या संख्येत वाढ होत जाते. या अवस्थेला कार्बुनकल असंही म्हणतात. ही स्थिती खूप वेदनादायक असून अनेकदा थकवा आणि तापाची लक्षणंही दिसून येतात.
कारणं
फोड होण्याच्या बहुतेक समस्या पौगंडावस्थेमध्ये आणि तारुण्यात येतात. पुरुषांमध्ये पुळ्या येणं सर्वात सामान्य आहे. हे बर्याच घटकांमुळे होऊ शकते. कधीकधी घामामुळे, कधीकधी आपल्या वैयक्तिक वस्तू इतरांसह शेअर केल्यानं पुळ्या येऊ शकतात. याशिवाय जास्त घाम आल्यामुळेही फोड येऊ शकतात.
उपाय
सुरूवातीला फोडांची तीव्रता कमी असल्यास तुम्ही या प्रकारच्या उपायांचा अवलंब करू शकता पण जर जास्त प्रमाणात त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. फोडी आलेल्या जागेच्या आजूबाजूला शेका. कोमट पाण्यानं अंघोळ केल्यासही आराम मिळू शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही एंटबायोटिक क्रिमसुद्धा लावू शकता. नेहमी फोड आलेला भाग आणि त्याच्या आजूबाजूची त्वचा कोरडी ठेवा. इतरांसह आपल्या पर्सनल वस्तू, कपडे शेअर करू नका.