Join us  

कमी वयात केस पांढरे झाले? वयस्कर दिसू नये म्हणून काय करावं? तज्ज्ञ सांगतात…

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2023 12:07 PM

Premature Hair Graying hair care tips : कोणत्या कारणांमुळे केस पांढरे होण्यास सुरुवात होते याविषयी...

केस पांढरे होणे हे वयस्करपणाचे लक्षण असते. त्यामुळे केस पांढरे व्हायला लागला की अमुक एका व्यक्तीचे आता वय झाले असं आपण अगदी सहज म्हणतो. पण आजकाल अगदी शालेय वयापासूनच केस पांढरे होण्याची समस्या उद्भवते. तरुणपणात केस पांढरे होण्याच्या समस्येने तर असंख्य जण ग्रासलेले दिसतात. मग एकतर यावर काहीतरी घरगुती उपाय करणे किंवा चक्क पार्लरमध्ये जाऊन डाय करण्याशिवाय पर्यायच राहत नाही. कारण पांढरे केस दिसायला लागले की आपल्या आजुबाजूचे सगळे आपल्याला चिडवण्याची शक्यता असते. असे होऊ नये आणि केस अकाली पांढरे होण्यापासून आपण वाचवू शकतो का? कोणत्या कारणांमुळे केस पांढरे होण्यास सुरुवात होते अशा काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आपण समजून घेणार आहोत. प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. आंचल पंथ यांनी याविषयी माहिती दिली असून केस पांढरे होण्याबाबत त्या काय म्हणतात पाहूया (Premature Hair Graying hair care tips)... 

रुक्ष-कोरडे झालेले केस सिल्की-मुलायम होण्यासाठी करा फक्त ३ गोष्टी; महिन्याभरात दिसेल फरक...

केस पांढरे न होण्यापासून आपण त्यांना वाचवू शकतो का? 

वय झाल्यामुळे किंवा अनुवंशिकतेमुळे केस पांढरे झाले असतील तर त्यांना काळे करणे किंवा पांढरे होण्यापासून वाचवणे अवघड असते. दुसरीकडे निरोगी जीवनशैली आणि संतुलित आहाराच्या मदतीने केस पांढरे होण्यापासून वाचवता येऊ शकतात. यासाठी आपण तणावमुक्त असणेही तितकेच गरजेचे आहे. तसेच एकदा पांढरे झालेले केस नैसर्गिक उपायांनी पुन्हा काळे होऊ शकत नाहीत. त्यामुळे ते झाकण्यासाठी डाय करण्याशिवाय पर्याय नसतो. हा डाय घरगुती, हर्बल किंवा केमिकल्स असलेला असा कोणत्याही पद्धतीचा असू शकतो. 

कोणत्या कमतरतांमुळे पांढरे होतात केस?

व्हिटॅमिन्स आपल्या शरीरात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. पण या व्हिटॅमिन्सची कमतरता असेल तर मात्र केस पांढरे होण्याची शक्यता असते. लोह, फोलेट, व्हिटॅमिन बी ६, व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन डी आणि ई यांसारख्या मायक्रोन्यूट्रीयंटसची कमतरता असेल तर केस पांढरे व्हायला सुरुवात होते. पण आहारात हे सगळे घटक योग्य प्रमाणात घेतले तर काळ्या केसांची संख्या वाढण्यास मदत होते. मेलानिनचे उत्पादन करणाऱ्या पेशींना मेलानोसाइटस असे म्हटले जाते. यामुळेच आपले केस काळे राहण्यास मदत होते. मात्र या मेलानिनची कमतरता झाली की केस पांढरे व्हायला सुरुवात होते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी