उन्हाळा सुरु झाला की होणाऱ्या गरम्याने व अंगांवर येणाऱ्या घामोळ्यांमुळे आपण खूपच हैराण होऊन जातो. उन्हाळ्यात घामोळे येणं या समस्येचा अनेकांना सामना करावा लागतो. शक्यतो त्वचेमध्ये घाम अडकून राहिल्याने हा त्रास होतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच उन्हाळा ऋतू तापदायक असतो. या ऋतूमध्ये अन्य आजारांसह गंभीर स्वरुपात त्वचा विकारांचाही सामना करावा लागतो. कितीही काळजी घेतली तरी घामोळ्यांमुळे जीव अक्षरशः हैराण होतो. संपूर्ण शरीरावर लालसर पुरळ आल्यानं असह्य त्रास होतो. गरम-दमट हवेमुळे शरीराला जास्त प्रमाणात घाम येतो. काही कारणांमुळे शरीरातील विषारी पदार्थ घामाद्वारे पूर्णतः बाहेर फेकले जात नाहीत. यामुळे घामोळ्या, लाल पुरळ शरीरावर येतात.
उन्हाळ्यात उष्ण-दमट हवामानामुळे भरपूर प्रमाणात घाम येतो. यामुळे त्वचेवरील छिद्रे बंद होतात. यामुळे शरीरावर लालसर रंगाचे पुरळ येतात. घामोळ्यांमुळे त्वचेवर जळजळ होणे, खाज सुटणे अशा समस्या उद्भवतात. पाठ, छाती, हात, कंबर, मानेवर जास्त प्रमाणात घामोळ्याचा त्रास होतो. योग्य काळजी घेतली तर शरीरावर घामोळे येणार नाहीत. पण याकडे दुर्लक्ष केल्यास त्वचेवर येणार घामोळं आणि लालसर त्वचा यामुळे तुम्ही स्वतः हैराण व्हाल. घामोळ्यांची समस्या टाळण्यासाठी शारीरिक स्वच्छता राखणं आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास त्वचा विकार गंभीर होण्याची शक्यता असते. सोपे घरगुती उपाय करून ही समस्या तुम्ही दूर करू शकता(5 Home Remedies For Prickly Heat And Heat Rash).
घामोळ्या येऊ नयेत म्हणून घरगुती सोपे उपाय कोणते आहेत ?
१. कडुलिंबाची पाने :- अंगावर घामोळ्या येऊ नयेत म्हणून कडुलिंबाच्या पानांचा वापर आपण करु शकतो. कडुलिंबाच्या पानांची बारीक पूड मिक्सरमध्ये वाटून तयार करुन घ्यावी. या पावडरमध्ये थोडेसे पाणी घालून त्याची पातळसर पेस्ट बनवावी. ही पेस्ट घामोळे असलेल्या भागांवर लावून घ्यावी. ही पेस्ट त्या भागांवर किमान १० ते १५ मिनिटे तशीच लावून ठेवावी. आपल्याकडे कडुलिंबाची पाने उपलब्ध नसल्यास तुम्ही मेडिकल स्टोअर किंवा आयुर्वेदिक औषध दुकानातून कडुलिंबाची पावडर खरेदी करून आणू शकता. त्यात दही किंवा बेसन मिसळूनही त्याची पेस्ट तयार करू शकता. यामुळे तुमची त्वचाही सुंदर होईल आणि शरीरावर घामोळंही येणार नाही.
ऊन वाढलं म्हणून घरात किंवा ऑफिसात असतानाही सनस्क्रीन लावावं का? तज्ज्ञ सांगतात...
२. मुलतानी माती :- त्वचा थंड ठेवण्यासाठी मुलतानी माती खूप प्रभावी असते. गुलाबपाणी, दही, दूध, एलोवेरा जेल यांसारख्या गोष्टींमध्ये मुलतानी माती मिसळून या मातीची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट २० ते २५ मिनिटे त्वचेवर लावून ठेवावी आणि नंतर स्वच्छ आंघोळ करावी.
३. लिंबू आणि बीटरूट :- बीटरूट किसून किंवा बारीक करून त्याची पेस्ट बनवा आणि नंतर त्यात अर्धा लिंबू पिळून चांगले मिसळा. ही पेस्ट त्वचेवर २० मिनिटे लावून ठेवावी आणि नंतर स्वच्छ आंघोळ करावी.
तुमच्याही हाताला वर्षाचे बाराही महिने भेगा असतात? ६ टिप्स, हात होतील बरे-मऊसुत...
४. दही व बेसन पीठ :- दह्यात बेसन पीठ मिसळून त्याची घट्टसर पेस्ट तयार करुन घ्यावी. ही पेस्ट घामोळ्यांवर २० ते २५ मिनिटे लावून ठेवावी. त्यानंतर अंघोळ करावी.
५. काकडी व कॉफी पावडर :- सर्वप्रथम काकडी किसून घ्यावी. त्यानंतर या काकडीचा किस मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करुन घ्यावी. आता या पेस्टमध्ये एक चमचा चंदन पावडर आणि एक चमचा मुलतानी माती आणि कॉफी पावडर घालवी. या मिश्रणाचा लेप घामोळ्या आलेल्या भागावर लावून त्यानंतर गार पाण्याने हा भाग स्वच्छ धुवून घ्यावा. यामुळे शरीरावर आलेल घामोळं नाहीस होण्यास मदत मिळते.