होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी हे महाराष्ट्रात अतिशय आवडीने खेळले जाणारे सण. महाराष्ट्राच्या अनेक भागात धुलीवंदनाच्या दिवशीच मोठ्या प्रमाणात रंग खेळले जातात. मनसोक्त रंग खेळताना आपल्याला मजा येत असली तरी त्यामुळे आपल्या त्वचेला, डोळ्यांना आणि एकूणच आरोग्याला त्रास होण्याची शक्यता असते. रंगांमध्ये वापरले जाणारे विविध रासायनिक पदार्थांचा त्वचेला त्रास होऊ शकतो. त्यामुळे रंग खेळण्याच्या आधी आणि नंतर कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या याविषयी (Skin Care Tips For Rang panchami)...
१. रंग खेळण्याआधी वॅक्सिंग, ब्लीचिंग, फेशियल, लेसर असे त्वचेशी निगडीत कोणत्याही प्रक्रिया करु नका. या प्रक्रियांमुळे त्वचेची रंध्रे ओपन होतात आणि त्यावर केमिकलचे रंग लागल्यास जळजळ होणे, फोड येणे अशा समस्या उद्भवू शकतात.
२. रंग खेळण्यापूर्वी त्वचेला आणि केसांना भरपूर तेल लावा. नारळ तेल, ऑलिव्ह तेल किंवा बदाम तेल त्वचेवर एक संरक्षणात्मक कवच बनवते. अनेकदा अंगावरील रंगांचे डाग जात नाहीत. अशावेळी तेलाचा थर असल्यास हे रंग सहजपणे निघण्यास मदत होते.
३.. घराबाहेर खेळताना एसपीएफ़ 40 प्लस असलेले सनस्क्रीन संपूर्ण शरीराला लावा. ज्यामुळे त्वचा उन्हापासून आणि रंगांपासूनही सुरक्षित राहण्यास मदत होईल. हे सनस्क्रीन वॉटरप्रूफ असेल याची काळजी घ्या. उन्हाने काही वेळा त्वचेची आग होणे, टॅन होणे, काळी पडणे असे होते. पण सनस्क्रीन लावलेले असेल तर असा त्रास होत नाही.
४. रंग खेळल्यानंतर कोमट पाण्याने आंघोळ करा आणि सौम्य साफ करणारा साबण वापरा. तसेच केसांना सौम्य शॅम्पूने धुवा. तसेच कंडिशनर वापरण्यास विसरू नका. त्वचा आणि केस जास्त जोराने स्क्रब करणे टाळा कारण त्यामुळे त्वचेला इजा होऊ शकते. काहीवेळा रंगांवर साबण लावल्यास त्याची आग होऊ शकते.
५. रंगपंचमीनंतर काही दिवस जाऊनही अंगाचा रंग निघत नसेल तर हा रंग काढून टाकण्यासाठी होळीच्या एका आठवड्यानंतर कोणीही डिटॅन किंवा एक्सफोलिएटिंग उपचार घेऊ शकतात.