फेशिअलमुळे चेहर्याची त्वचा छान होते, त्वचा चमकते, तसेच चेहर्यावर वयाच्या खुणाही दिसत नाही. फेशिअल हा परिणामकारक सौंदर्योपचार असला तरी तो खूप वेळखाऊ आहे. पण घरच्या घरी आपण चेहर्याला फेशिअल ग्लोचा इफेक्ट देऊ शकतो. त्यासाठी खूप काही करायची गरज नसते. फक्त चेहर्याला कच्चं दूध लावावं लागतं.
Image: Google
नैसर्गिक सौंदर्योपचारात कच्च्या दुधाला अतिशय महत्त्व आहे. कच्च दूध हे स्किन टोनर सारखं काम करतं. नुसतं कच्चं दूध चेहरा आणि मानेला लावून दहा पंधरा मिनीटांनी चेहरा गार पाण्यानं धुतला तरी त्वचा छान होते. कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी कच्चं दूध हे फायदेशीर ठरतं. विशेषत: कोरडी त्वचा असलेल्यांनी कच्चं दूध वापरायलाच पाहिजे असा सल्ला सौंदर्य तज्ज्ञ देतात. तसेच उन्हानं काळवंडलेला चेहेरा उजळ करण्यासाठी , चेहर्याची त्वचा मऊ मुलायम करण्यासाठी कच्च्या दुधासारखा दुसरा उपाय नाही.
Image: Google
चेहर्याला कच्चं दूध लावल्यास..
कच्चं दूध चेहर्याला लावल्यास त्यातील गुणधर्म त्वचा सुधारण्याचं काम करतात. कोरडी झालेली त्वचा, फाटलेली त्वचा कच्च्या दुधाच्या नियमित उपयोगानं बरी होते. कच्च्या दुधातील गुणधर्म त्वचेखालच्या पेशींचं पोषण करतात. काळवंडलेला चेहरा उजळ करण्यासाठी सौंदर्य तज्ज्ञ तांदळाच्या पिठात कच्चं दूध मिसळून तो लेप चेहर्यास लावण्याचा सल्ला देतात. या उपायामुळे घरच्या घरी पर्ल फेशिअलचा इफेक्ट मिळतो.
कच्च्या दुधाचा फेसपॅक
चेहर्याला केवळ कच्चं दूध लावण्यापेक्षा कच्च्या दुधाचा उपयोग करुन लेप लावल्यास त्याचे चेहेर्याच्या त्वचेवर विविध परिणाम दिसतात. तसेच कच्च्या फेसपॅक हा स्क्रबसारखा वापरुन चेहेर्याची त्वचा स्वच्छ करता येते.
Image: Google
कच्च्या दुधाचा लेप तयार करण्यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा चंदनाची पावडर, अर्धा चमचा मध आणि 3 ते 4 चमचे कच्चं दूध घ्यावं. एका वाटीत हे सर्व साहित्य एकत्र करुन ते चांगलं एकजीव करावं. मग हा लेप चेहरा आणि मानेला लावा. लेप साधारणत: 20 ते 25 मिनिटं ठेवावा. लेप सुकला की हातावर थोडं पाणी घेऊन ते चेहर्यास लावून चेहरा ओला करावा आणि चेहर्याला लावलेल्या लेपाच्या सहाय्यानं स्क्रब करावं. हलक्या हातानं स्क्रब करत चेहर्यावरच लेप काढावा. नंतर चेहरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवावा. या लेपाच्या दुहेरी उपयोगानं ( लेप आणि स्क्रब) त्वचेवरील मृत पेशी निघून जातात. त्वचेचं खोलवर पोषण होऊन त्वचेचं कंडीशनिंग होतं. लेप सुकल्यनंतर चेहरा ओला करताना पाण्याऐवजी कच्च्या दुधाचाच उपयोग केल्यास त्याचे चांगले परिणाम चेहर्यावर दिसतात.
आठवडयातून दोन वेळेस कच्च्या दुधाचा लेप लावावा. हा उपाय सलग तीन महिने केल्यास त्वचा मऊ, मुलायम होते. तसेच चेहर्याची त्वचा घट्ट होवून चेहेरा तरुण दिसतो.